आपण जन्मत:च अनित्य आहोत. त्यामुळे आपल्या मनात येणारे विचार अनित्य आहेत. आपल्या मनात येणाऱ्या कल्पना अनित्य आहेत. आपल्या बुद्धीने घेतले जाणारे निर्णय अनित्य आहेत. आपल्या इच्छा, भावना आणि जाणिवा अनित्य आहेत. अनित्याची हीच नित्यस्थिती आहे! अशा अनित्य स्थितीत जगत असताना मी ‘सुख’ मिळवण्यासाठी अनंत धडपड करतो, पण सुख काही लाभत नाही. लाभलं तरी पुरेसं लाभल्याचं वाटत नाही आणि या घडीला ते पुरेसं वाटलं, तरी ते टिकत नाही! अशा मनोदशेतच मी ‘सुखच सुख’ वाटय़ाला येत राहावं, यासाठी अध्यात्माच्या मार्गावर वळतो; पण भौतिक जगात मी जो गोंधळ घालत होतो तोच या मार्गावरही घालत राहतो. या गोंधळाचंच वर्णन समर्थ रामदास यांनी ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १००व्या श्लोकात केलं आहे. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे-
यथासांग रे कर्म तेंही घडेना।
घडे कर्म तें पुण्य गांठीं पडेना।
दया पाहतां सर्वभूतीं असेना।
फुकाचें मुखीं नाम तेंही वसेना।। १००।।
प्रचलित अर्थ : जीवाच्या हातून या कलियुगात शास्त्रानुसार यथासांग कर्म होत नाही. धर्मकृत्य किंवा पुण्यकर्म हातून घडलंच तरी त्यातून काही तरी साधावं, ही सुप्त इच्छा असल्यानं अशा सकाम कर्मानं पुण्यही लाभत नाही. भूतमात्रांविषयी दया वसत नाही की मुखात भगवंताचं सहजपणे येऊ शकणारं नामही वसत नाही.
आता मननार्थाकडे वळू. जन्मापासून माणूस कर्माशिवाय राहत नाही. आता तो कर्म माणूस कसं करतो, कोणत्या भावनेनं करतो यावर ते कर्म त्याच्यासाठी मोक्षकारक होईल की बंधन वाढवणारं होईल, हे ठरतं. वाटय़ाला आलेलं कर्तव्यकर्म माणूस जर कर्तव्यभावनेनं निर्लेपपणे करील, तर त्यात तो गुंतणार आणि अडकणार नाही; पण कर्तव्याची हद्द ओलांडून माणूस जर मोहग्रस्त होऊन आसक्ती भावानं कर्म करील तर त्यात तो गुंतला जाईल आणि यथावकाश मानसिकदृष्टय़ा भरडलाही जाईल. तो पुण्याचं म्हणून जे कर्म करील त्यातून, ‘लोकांनी मला चांगलं म्हणावं,’ इतपत सकाम भावना जरी प्रसवली, तरी ते कर्मच त्याला लोकेषणेत गुंतवून टाकील. अध्यात्माच्या वाटेवर आल्यावर तर लोकेषणेचा धोका फार मोठा असतो. मी जप करतो, मी कित्येक पारायणं करतो, मी सद्गुरूंची खरी सेवा करतो, हा भाव मनात रुतू लागतो. आता ‘मी’पणा गेल्याशिवाय सद्गुरूंची खरी सेवा होऊच शकत नाही. मग ‘माझ्याइतकी त्यांची सेवा दुसरा कोणी करीत नाही,’ हा सुप्त भाव ‘मी’पणाच्या डबक्यात खोल रुतवणाराच नाही का? सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय मी अन्नाचा कणही ग्रहण करत नाही, असं एक साधक म्हणाले. वरकरणी भाव चांगला आहे, पण त्यात ‘मी सेवा करतो,’ हा सुप्त भाव नाही का? धोक्याचे निसरडे रस्ते असे पटकन लक्षात येत नाहीत. अशा निसरडय़ा रस्त्यांनी सात्विक अहंकार कधी उत्पन्न होईल आणि तो आपला कधी पूर्ण ताबा घेईल, हे सांगता येत नाही. तेव्हा ना आपल्याकडून यथासांग म्हणजे विधीवत कर्म घडतं, ना यथायोग्य सेवा घडते. पुण्याचं म्हणून जे कर्म करू जातो त्यानं सात्विक अहंकार वाढतो आणि तेच पुण्यकर्म बाधकच ठरतं. मग समर्थ म्हणतात, “दया पाहतां सर्वभूतीं असेना।” सर्व भूतमात्रांविषयी आपल्यात दयाभाव वसत नाही. आता ही ‘दया’ म्हणजे काय हो? तर दुसरम्य़ाच्या हिताची कळकळ हीच खरी दया आहे. दुसरम्य़ाच्या मनाजोगतं वागणं म्हणजे दया नाही. सर्दी झालेल्या मुलानं थंड पदार्थासाठी हट्ट केला तर तो हट्ट पुरवणं ही दया नव्हे! ज्यानं भक्तांचं अहित होईल ते घडू देणारम्य़ा भगवंताला दयावान म्हणता येणार नाही!