मनुष्यजन्माला येऊन ना स्वत:साठी खऱ्या हिताचं कर्म करता येतं ना दुसऱ्याचं खरं हित साधता येतं. स्वत:च्या नावलौकिकात माणूस इतका रममाण असतो की सहजपणे भगवंताचं नामही मुखी येत नाही. प्रत्येक इंद्रियाच्या योगानं माणूस जगाशी जखडला आहे. आता ही बहिर्मुखता जाऊन अंतर्मुखता यावी यासाठी इंद्रियांना बाह्य़ जगाच्या ओढीतून सोडवलं पाहिजे. त्यासाठी आधी या इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही जगाचे कसे दास झालो आहोत आणि आता या इंद्रियांना भक्तीच्या मार्गावर आणून भगवंतापासून असलेलं विभक्तपण कसं दूर करता येईल, हेच प्रत्येक संत-सत्पुरुषानं सांगितलं आहे. शरीर धडधाकट आहे, इंद्रियं सुदृढ आहेत, पण त्या देहाचा वापर जर साधनेसाठी होत नसेल तर तो देह काय कामाचा, असा सवाल समर्थही करतात. एका भजनात ते म्हणतात, ‘असोनि इंद्रियें सकळ। काय करावीं निष्फळ।। नाही कथा निरूपण। तेंचि बधिर श्रवण।। नाहीं देवाचें वर्णन।  तें गे तेंचि मुकेपण।। नाहीं पाहिलें देवासी। अंध म्हणावे तयासी।। नाहीं उपकारा लाविले। ते गे तेचि हात लुले।। केलें नाहीं तीर्थाटण। व्यर्थ गेले करचरण।। काया नाहीं झिजविली। प्रेतरूपची उरली।। दास म्हणे भक्तीविण। अवघे देह कुलक्षण।।’ जी काया भगवंतप्राप्तीसाठी झिजत नाही ती प्रेतरूपच आहे! भक्ती नसेल, तर सगळा देह उत्तम असूनही कुलक्षणीच आहे, असं समर्थ म्हणतात. तेव्हा हा देह जड म्हणजे स्थूल असला तरी सूक्ष्म चैतन्य तत्त्व ग्रहण करण्याच्या प्रयत्नांत तोच साह्य़कारी होऊ  शकतो. शेवटी या सूक्ष्म तत्त्वाचं ग्रहण मन, चित्त, बुद्धी यांद्वारे सूक्ष्म पातळीवर होत असलं आणि सद्गुरुबोधानंच ते स्थिर होत असलं, तरी या कार्यातला देहाचा सहभागही महत्त्वाचा आहे. देहाच्या आधारावर मन जगात अधिक खोलवर गुंतून जाऊ  शकतं आणि याच देहाच्या आधारावर साधनारत राहून मन जगापलीकडे जाऊ  शकतं! आता जगापलीकडे जाणं म्हणजे जगापासून दूर जाणं नव्हे, तर जगाच्या आसक्तीपलीकडे जाणं हे जगापासून खरं अलिप्त होणं आहे. हे साधेल केवळ सद्गुरू प्रदत्त साधनेनंच. त्यासाठी नाम हाच एकमेव उपाय समर्थ सांगत आहेत. नाम कसं आहे? इतर साधनांमध्ये प्राथमिक पातळीवर काही तरी ‘मी करतो’ याचा आनंद घ्यायला वाव आहे! नाम तो वाव देत नाही! ज्ञानमार्गात बुद्धीचाही आनंद आहे. ध्यानमार्गात मनाला, चित्ताला तृप्त भासणारं काही तरी आहे. नाम चिकाटीची कसोटी पाहतं! एखादा यावर म्हणेल, मी रोज साठ माळा जप करतो, तर त्यात ‘मी’पणा आला की सातत्य राखण्यात अनंत अडचणी येतात. तेव्हा नाम प्रथम नामधारकाचा अहंकार घालवायची प्रक्रिया सुरू करतं. इथे अन्य मार्गाना कमी लेखायचं आहे, असं समजू नका. कारण शेवटी सगळे मार्ग एकाचेच आहेत आणि ते एकच होऊन एकातच विलीन होऊन जातात! पण नाम अधिक वेगानं द्वैताचा निरास करू लागतं. आयुष्यातल्या घडामोडी, माणसांचे स्वभाव, प्रारब्धानं त्यांच्याशी आलेले आपले संबंध आणि त्यांच्याप्रतिची आपली कर्तव्यं; याबाबत नाम आपले विचार शुद्ध करू लागतं. आधी या सर्व गोष्टींत आपण भ्रम, मोह, आसक्तीनं गुंतत होतो आणि जगाचे आघात सोसत होतो. आता अधिक मोकळेपणानं जीवनाला सामोरं जाता येतं. नाम विचार अधिक अचूक, अधिक प्रगल्भ करीत नेतं. हे सगळं घडतं मात्र अगदी संथपणे आणि नकळत. नाम साधनेतली ‘प्रगती’ जाणवून न देता थेट मुक्कामाला पोहोचवतं! नाम ‘मी’ला अ-नाम करतं. मनाचं सु-मन करीत अखेर अ-मन करतं! अर्थात मनाची धाटणीच बदलते. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल, तर ते एका नामानंच होईल!’ थोडक्यात जगाच्या आसक्तीचा निरास होताच दृष्टी अंतर्मुख होणारच! शुद्ध आंतरिक यात्रेसाठी म्हणूनच समर्थाचाही नामासाठीच आग्रह आहे. हा नामाधार नसेल, तर काय गत होते, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या १०१व्या श्लोकात सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा