आजवरचं आपलं सगळं जगणं कसं होतं? तर जे मनात आहे ते आपण स्वार्थापायी लपवतही होतो. थोडक्यात, मनातला खरा विचार वेगळा आणि प्रत्यक्ष वागणं वेगळं, अशी गत होती. त्यामुळे दुसऱ्याला आपण एक वेळ शरीरानं दुखवत नव्हतो, पण परनिंदा करण्यात आपण किती सहज रमत होतो. अध्यात्माच्या मार्गावर जर खऱ्या अर्थानं चालायचं तर हा आंतर्बाह्य़ भेद संपवावाच लागतो. खरा पालट आंतरिकच असतो, धारणेचाच असतो. आंतरिक धारणा बदलली की आचरणात सुधारणा होते. भगवंत ‘गीते’त सांगतात ना? की नुसतं शरीरानं एका जागी बसणं हे तप नाही! कायिक तपापेक्षा मानसिक आणि वाचिक तपाला महत्त्व आहे. खिरीत तासन्तास आकंठ बुडालेल्या चमच्याला जशी खिरीची गोडी कळूच शकत नाही त्याचप्रमाणे मूर्तीसमोर तासन्तास बसूनही मन जर परमभावात बुडालेलं नसेल, तर त्याला परमात्मप्रेमाची गोडी कशी कळणार? तेव्हा त्या मानसिक आणि वाचिक तपाप्रमाणेच मानसिक आणि वाचिक अहिंसेला खरं महत्त्व आहे. पण होतं कसं की, कायेनं म्हणजे प्रत्यक्ष शरीरानं आपण कुणाला एक वेळ दुखावणार नाही, शारीरिक हिंसा करणार नाही, पण वाचेनं दुसऱ्याचं मन दुखावणं ही हिंसाच आहे, हे आपल्याला जाणवतही नाही. इतकी ही ‘हिंसा’ आपल्या अंगवळणी पडली असते, आपण अंगीभूत केली असते. सहज बोलताना आपण दुसऱ्याचं मन दुखावतो. नामानं सर्वप्रथम घडतं काय? तर आपल्यातले दुर्गुण ठळकपणे दिसू लागतात आणि त्यातला हा मानसिक आणि वाचिक हिंसेचा दुर्गुण सर्वप्रथम दिसतो! ज्या मुखानं आपण नाम घेतो, त्याच मुखानं दुसरा दुखावला जाईल, असं बोलणं योग्य आहे का, हा विचार मनात प्रकटतो. सूक्ष्मातील बदलाची ही सुरुवात असते. आता इथं एक सूक्ष्म मुद्दा येतो तो असा की, कधी कधी दुसऱ्याचं हित साधण्यासाठी त्याला कठोर बोलावं लागतं. मग ही हिंसा योग्य नसते का? कधी कधी मालकाला नोकराशी, वरिष्ठाला हाताखाली कामाला असलेल्याशी, आई किंवा बापाला मुलाशी, शिक्षकाला विद्यार्थ्यांशी कठोरपणे वागावंच लागतं. त्याला बोलावंच लागतं. ही वाचिक हिंसा अटळच नाही का? ती टाळता येईल काय? तर याचं उत्तर एकच आहे. ज्यायोगे खरं हित साधलं जाणार आहे, मग ते व्यक्तीचं असो किंवा समाजाचं असो; त्यासाठी होणारी वाचिक हिंसा चुकीची नाही. आध्यात्मिक धारणेतला गोंधळ दूर करण्यासाठी सत्पुरुषही उग्रावतार धारण करतातच ना? पण इथं एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्राधान्य केवळ खऱ्या हितालाच असलं पाहिजे. अहंकारातून, स्वार्थी हेतूनं होणारी वाचिक हिंसा त्याज्यच आहे. वय, कथित सामाजिक दर्जा, आर्थिक स्थिती, व्यावहारिक ज्ञान या बाबतीत आपल्यापेक्षा जो तोकडा आहे त्याच्याशी आपण किती सहज उर्मटपणे वागतो! त्या वाचिक हिंसेचंही प्रारब्धात रूपांतर होत असतं, हे आपल्याला जाणवतं तरी का? या कायिक आणि वाचिक हिंसेपेक्षा अतिशय सूक्ष्म आणि अतिशय आत्मघातकी आहे ती मानसिक हिंसा! आता मानसिक हिंसा म्हणजे काय? आपल्याला सहजपणे वाटतं की, दुसऱ्याचं मन दुखावणं हीच मानसिक हिंसा आहे. पण वाचिक हिंसेनं दुसऱ्याचं मन दुखावलं जातच की! तेव्हा ही मानसिक हिंसा म्हणजे आपल्याच मनातली हिंसा असली पाहिजे. दुसऱ्याविषयीच्या हीन आणि हिंसक विचारांनी मनाला व्यापून टाकणारी मानसिक हिंसा ही विझलेल्या शेकोटीखाली दबूनही धग असलेल्या निखाऱ्यासारखी असते. अहंकाराचा वारा लागताच हा निखारा फुलतो आणि पाहता पाहता मत्सर, क्रोधाच्या ज्वाळा उफाळून येतात! पुन्हा भडका उडतो आणि त्यानं सर्वाधिक हानी आपलीच होते. ही हिंसा वणव्यासारखी मनात पसरत जाते. मनाला व्यापून टाकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा