जे सुखाचं भासतं ते मिळालं की माणूस भ्रम-मोहाच्या साखरझोपेत रममाण होतो. मग आसक्तीनं ते ‘सुख’ कायमचं आपल्या ताब्यात ठेवण्याची स्वप्नं पाहात तो वास्तव विसरतो. आपलं जीवन बहुतेक असंच व्यतीत होत असतं. सुखकारक वाटणाऱ्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीला कवटाळून आपण आपल्याच धुंदीत जगत राहातो. एखाद्या ‘दु:खा’चा आघात मात्र स्वप्नातून आणि भ्रमनिद्रेतून खडबडून जागं करतो. जाग आली एवढय़ानं जाण काही लगेच येत नाही. गाढ झोपेतून अचानक जाग आलेल्याला प्रथम आपण कुठं आहोत, हेच पटकन समजत नाही. डोळ्यांवरची सुस्ती गेलेलीच नसते. मग दु:स्वप्नाची जाणीव होते. तरी पुन्हा झोप यावी आणि त्या झोपेत त्या स्वप्नात सुधारणा व्हावी, असंही वाटतं. या ‘सुधारणे’साठी भगवंताचा आधार लाभावा, असं वाटतं. मग असा माणूस नामाकडे वळला तरी ते नामच त्याला भ्रमनिद्रेतून जागवू पाहातं. जागृतीची दीर्घ आणि सूक्ष्म प्रक्रिया सुरू करतं! पण सुरुवातीला या नामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? जणू आपल्याशी त्याचा संबंधच नाही! आजवर आपल्याच नावलौकिकाकडे पाहण्याची आपल्याला सवय होती. जिथंतिथं मी कोण, हे जाणवून देण्याची सवय होती. नाम ज्या परमात्म्याचं आहे त्याचा घोष करण्याची काही आपली सवय नव्हती! ‘मी’चा उद्घोष थांबवून नाम मला ‘तू’चा म्हणजे त्या भगवंताचा घोष करायला लावतं! सवय नसल्यानं त्यात आवड कुठे असते? आणि आवड नसल्यानं नामासाठी सवड कुठे मिळते? मग सद्गुरू काय करतात? समजा एखाद्याला आपण काही हजार रुपयांचं देणं लागत असू आणि ते देता येणं शक्य नसेल, तर त्याची भेट होऊ नये, असं वाटतं ना? तरी समजा तो सकाळी सकाळी घरी आला, मग बाजारात गेल्यावरही समोर आला, नंतर कार्यालयात गेलो तर तिथंही आला, परतताना प्रवासातही, घरी जावं तर तिथंही आला आणि अगदी शांत झोपी जावं, तर स्वप्नातही आला, तर काय करावं? सद्गुरू नामाला असं आपल्या पाठीशी सतत जुंपतात! ज्यानं माणसाचा जन्म दिला त्याचं तू देणं लागतोस, याची आठवण ते नाम सारखं करून देऊ लागतं! ‘आता मी खूप गडबडीत आहे, संध्याकाळी नक्की देतो,’ म्हणून आपण देणेकऱ्याला चुकवतो. संध्याकाळीही हा हजर! मग आपण म्हणतो, ‘दिवसभर किती धावपळ झाली माझी, आता उद्या सकाळी नक्की देतो.’ तर सकाळीही हा हजर.. जे नामाभ्यासाला लागले आहेत, त्यांनाच हा अनुभव कळेल. तर नाम असं सतत समोर येऊन परमात्म्याला मी जे देणं लागतो, त्याचं स्मरण करून देऊ लागतं. सुरुवातीला आपण काय म्हणतो की, नाम घ्यायला वेळ कुठं आहे? तर संत सांगतात, ‘खाता-पिता, चालता-फिरता’ नाम घेता येतं. आपणही मग तसा प्रयत्न करतो. मग नामच हळूहळू प्रत्येक जीवनव्यवहारात क्षीणपणे मनात उमटू लागतं. जगाचं आणि आपलं खरं रूप जाणवून देऊ लागतं. ज्या जगाशी माझा खरा तर केवळ देण्या-घेण्यापुरताच संबंध आहे, त्या जगानं मला केवळ प्रेमच प्रेम द्यावं, सुखच सुख द्यावं, या हेतूनं जगात सुरू असलेल्या माझ्या लाचार वावराची जाणीव नाम तटस्थपणे करून देऊ लागतं. या लाचार जगण्यानं मी मानसिक, भावनिकदृष्टय़ा किती परतंत्र झालो आहे, माझी आत्मप्रतिष्ठा गमावून जगाचा कसा दास झालो आहे, हे ते नाम जाणवून देऊ लागतं. परमात्म्यानं मला माणसाचा जन्म दिला, सर्व क्षमतांनी युक्त असा देह दिला. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही आत्मप्रतिष्ठेनं जगण्याइतपत आत्मभानही खरं तर दिलं, मग आणखी काय हवं? या जोरावर स्वतंत्रपणे न जगता जगाचं दास्य पत्करून मी ते आत्मभान का गमावतो आहे, याची जाण नामच अलिप्त राहून करून देऊ लागतं. अंतर्बाह्य़ पालटाची सूक्ष्म प्रक्रिया अशी सुरू होते. खरा आंतरिक पालट झाला की बाह्य़ पालटाला वेळ लागत नाही, पण अधेमधे उसळणाऱ्या माझ्याच सुप्त विरोधामुळे हा आंतरिक पालटच खूप वेळ घेतो.