समर्थ म्हणतात, ‘‘हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी’’ हरीच्या कीर्तनानं, लीला वर्णनानं हृदयात प्रेम उत्पन्न व्हावं आणि आंतरिक प्रेमाचं असं नातं सदोदित राहावं, अशी तळमळ निर्माण व्हावी. आता हा हरी म्हणजे भवदुखाचं हरण करणारा सद्गुरूच! हे भवदुखंच समस्त दुखाचं मूळ आहे. पण प्रथम ते काही जाणवत मात्र नाही. उलट असं काही भवदुख असतं, हेच खोटं वाटतं! भव म्हणजे तरी काय हो? तर आपल्या अवतीभवती पसरलेल्या जगात जिथं जिथं माझी भावना गुंतली आहे ते सारं भवविषय आहे. जे जे मला भावणारं आहे ते ते अखेरीस भोवणारंही आहे. तरीही या भवाची मला आवड आहे, गोडी आहे. त्याबद्दल आत्मीयता आहे. त्याचं प्रेम आहे. अशा या मला रामाची प्रीती धरायला समर्थ सांगत आहेत! म्हणजे जगाची आस आहे तिथं या जगापासून निíलप्त करणारया रामाची आस धरायची आहे! ते कसं साधणार? तर समर्थ सांगतात ‘हरीकीर्तनें’! हरी म्हणजे सद्गुरुंच्या चरित्र-लीला-बोध वर्णनाच्या श्रवणाने.. आता सत्पुरुषांच्या चरित्रातले प्रसंग आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की या प्रसंगांना अशा निर्भयतेनं सामोरं जाणं शक्य आहे का? ते आपल्यालाही साधेल, असं मानून आपण आपल्या जीवनात निश्चिन्त राहू शकू का? एखाद्या सत्पुरुषाला भगवंतानं अगदी अखेरच्या क्षणी कसा आधार दिला, हे वाचून तसा प्रसंग आपल्यावर आला की आपण निश्चिन्त राहू शकू का? तर आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं की हे शक्य नाही! तेव्हा आपण संत-सत्पुरुषाची अनेक चरित्रं वाचतो, पण ती कथा-कादंबऱ्यांसारखी! तसे प्रसंग आपल्याही जीवनात घडू शकतात आणि त्यांना कसं सामोरं जायचं, याची ही शिकवण आहे, असं आपल्याला कुठे वाटतं? बरं जी गत चरित्रांची तीच बोधाची. संतांचा बोध वाचताना तो पटतोही, पण तो आचरणात आणता येतो, हे मनापासून पटत नाही. बरेचदा आपल्या मनातल्या विकल्पाच्या झंझावातानं या बोधाचं वास्तवाशी असलेलं नातंही आपल्याला उमगत नाही. तरीही हे ‘हरीकीर्तन’ म्हणजे सत्संग श्रवण सुरूच ठेवलं पाहिजे. कारण कधीतरी आपल्या जगण्यातल्या एखाद्या प्रसंगात सत्पुरुषांच्या चरित्रातला एखादा प्रसंग, एखादं बोधात्मक वचन मनात प्रकाशमान होतं. अंधारात वीज चमकावी त्याप्रमाणे ते क्षणार्धात मनात प्रकाशमान होतं आणि त्या क्षणातही ते मोठा दिलासा मात्र देऊन जातं, आधार देऊन जातं. पण तरीही या ‘हरिकीर्तना’चं जे सार किंवा जो रोख तो आपल्या पूर्णपणे पचनी पडत नाही. हे सार काय? तर ‘प्रीती रामीं धरावी’! एका रामावर प्रेम करा.. कामना जागविणारं आणि अखेर अपेक्षाभंगाचं ओझं माथी मारणारं प्रेम जगावर करू नका! आता ‘जगाला प्रेम अर्पावे,’ अशी या भूमीची शिकवण आहे. मग जगावर प्रेम नको, हा सल्ला स्वार्थ जोपासणारा नाही का, असा प्रश्न काहींच्या मनात उमटेल. तर थोडा विचार करा, जगावर आपलं जे प्रेम आहे, ते कसं आहे? ते निस्वार्थी आहे का? तर नाही! जगाला प्रेम अíपण्यासाठी आपली हानी सोसण्याची आपली तयारी नाही! सुदूर देशातल्या संकटाबाबत आपण बेफिकीर असतो, पण संकट आपल्या उंबरठय़ापाशी येईल, असं वाटताच आपली जाणीव अधिक सजग आणि तीव्र होते. तेव्हा जगावर आपण प्रेम करतो ते जगानं आपल्यावर प्रेम करावं, याच हेतूनं. जगावरचं हे स्वार्थी प्रेम संपावं, यासाठी समर्थ रामावर प्रेम करायला, भगवंतावर प्रेम करायला सांगत आहेत. आता हा राम म्हणजे तरी कोण? तर हा ‘राम’ म्हणजे प्रभू रामांचा अवतार ज्या तत्त्वांसाठी झाला त्या तत्त्वांचं पालन, आचरण. त्या प्रेमाच्या जाणिवेतूनच जीवनातील माणसांकडे, घडामोडींकडे पाहणं साधेल. मनन अधिक खोलवर होऊ लागेल. जगणं प्रेममय होऊ लागेल. जीवन हेच जणू प्रेमाचं निरूपण होईल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा