‘मनोबोधा’च्या १०३व्या श्लोकाचे पहिले जे दोन चरण आपण पाहतो आहोत त्यांची आणखी एक अर्थछटा आहे. पहिल्या चरणात रामाची प्रीती धरायला समर्थ सांगत आहेत (हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी) आणि दुसऱ्या चरणात त्या प्रेमाचं जे निरूपण अंतरंगात सुरु होईल त्यानं देहबुद्धी विसरली जाईल (देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी), असं सांगत आहेत. प्रेम हे भावनेशिवाय नाही. म्हणून पहिला चरण माणसाच्या भावनिक क्षमतेला स्पर्श करतो, तर दुसरा चरण माणसाच्या बौद्धिक क्षमतेला स्पर्श करतो. माणसाचं प्रेम जगावर असल्यानं त्याच्या भावनिक क्षमतेचा संकुचित कारणासाठी गैरवापर सुरू आहे. तसंच त्याचा सर्व जीवन व्यवहार हा संकुचित देहबुद्धीनुसारच सुरू असल्यानं त्याच्या बौद्धिक क्षमतेचाही गैरवापर सुरू आहे. आता देहबुद्धी म्हणजे काय? तर देह म्हणजेच ‘मी’ असं मानून देहाला चिकटलेली, देहाला क्षणोक्षणी जपू पाहणारी, सुख देऊ पाहणारी ती देहबुद्धी. ही देहबुद्धी आहे म्हणूनच संकुचित भावनेतून इतरांवर ‘प्रेम’ आहे आणि द्वेषही आहे, स्वार्थकेंद्रित ‘दयाभाव’ आहे आणि सूडभावही आहे, सापेक्ष ‘मैत्रभाव’ आहे आणि शत्रुभावही आहे, वरपांगी ‘करुणा’ आहे आणि क्रौर्यही आहे.. ही देहबुद्धी आहे म्हणूनच जे आपल्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे आहे, तसंच जे आपल्याला ‘सुखा’चं भासत आहे तेही दुसऱ्याकडे आहे, त्याबद्दल दुसऱ्याविषयी मत्सरभावही आहे. जे त्याच्याकडे आहे ते मिळविण्याची लालसाही आहे. थोडक्यात आपलं पहिलं आणि अखेरचं प्रेम ‘मी’वर आणि या ‘मी’च्या सुखाचा आधार असलेल्या जगावर आहे. पण खरं पाहता जगावरसुद्धा आपलं खरं प्रेम नाही. कारण त्या प्रेमाला देहभावाचा भक्कम पाया आहे. देह म्हणजेच ‘मी’ ही आपली दृढ धारणा आहे आणि हा ‘मी’ सुखी राहावा म्हणून जगावर प्रेम आहे, जगाची मनधरणी आहे! त्यासाठी समर्थ जगाचं प्रेम सोडून रामाचं प्रेम आपल्या अंत:करणात रुजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण एकदा हे व्यापकाचं प्रेम लागलं की संकुचित देहबुद्धी आपोआप लयाला जाईल. भगवंतावर खरं प्रेम जडणं म्हणजे जगाचा मनातून लोप होणं. ही प्रक्रिया काही सहज सोपी नाही. माणसाच्या अंतरंगातलं प्रेमभावनेचं शुद्ध रूप जागं करायचं असेल तर शुद्ध प्रेमस्वरूपाची भक्ती त्याला जडली पाहिजे. जर त्याच्यातील संकुचित देहबुद्धी लोपावी, असं वाटत असेल तर शुद्ध बुद्धी म्हणजेच सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. प्रेमभावना आणि सद्सद्विवेक बुद्धी या दोन्ही गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहेत, पण त्यांचा प्रभाव व्यापक आहे. त्यांच्या अभावी जे जगणं आहे ते सुरुवातीला भले ‘देहसुखा’चं वाटेल, पण अखेरीस ते जीवनात काहीच हाती न लागल्याचं दु:ख माथी मारणारं आहे. जसजशी सद्सद्विवेकबुद्धी जागी होऊ लागेल तसतसं देहबुद्धीच्या हट्टाग्रहाची जाणीव होऊ लागेल. त्या हट्टाग्रहातला, आसक्तीतला फोलपणा उमगू लागेल. संकुचित जगण्याचा उबग येऊ लागेल, व्यापकत्वाची आस वाढू लागेल. एकदा का व्यापकत्वाची ओढ निर्माण झाली, भगवंताचं प्रेम वाटू लागलं की हा संकुचितपणा ओसरू लागेल. देहबुद्धीचा खरंच लोप झाला आहे का आणि भगवंताचं खरं प्रेम लागलं आहे का, हे तपासण्याची मोजपट्टी ‘मनोबोधा’च्या १०३व्या श्लोकाचे अखेरचे दोन चरण समोर ठेवतात! समर्थ म्हणतात की, ‘‘परद्रव्य आणीक कांता परावी, यदर्थी मना सांडि जीवीं करावी’’ वर सांगितलंय की, खरं प्रेम ते ज्यात देहभावच उरलेला नाही. स्वत:च्या देहसुखाची लालसा नाही आणि देहकष्टांची पर्वा नाही. जे आहे त्यात समाधान आहे आणि जे नाही त्याची ना खंत आहे ना लालसा! मग जे दुसऱ्याचं आहे, दुसऱ्याकडे आहे त्याची खंत, मत्सर किंवा लालसा वाटणं म्हणजे भगवंताचं खरं प्रेम नाही!