‘मनोबोधा’च्या १०३ व्या श्लोकात भावना आणि बुद्धीचा संयोग भगवंताच्या ठिकाणी करण्यास समर्थानी पहिल्या दोन चरणांत सांगितलं. भावना आणि बुद्धीचं हे ऐक्य दृढ झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी अखेरच्या दोन चरणांत ते म्हणतात की, ‘‘परद्रव्य आणीक कांता परावी, यदर्थी मना सांडि जीवीं करावी!’’ भावना आणि बुद्धी जर एका भगवंताच्या ठिकाणी एकवटू पाहत असेल किंवा अध्यात्म मार्गात एकवटू पाहत असेल, तर मग दुसऱ्याकडे जे काही आहे त्याच्याकडे लक्षच जाणार नाही. आता हा जो चरण आहे की, ‘‘परद्रव्य आणीक कांता परावी, यदर्थी मना सांडि जीवीं करावी!’’ त्याचा सर्वसाधारण अर्थ दुसऱ्याकडे असलेल्या द्रव्याचा आणि परस्त्रीचा लोभ धरू नये, हाच प्रचलित आहे. इथं द्रव्य जसं निर्जीव वस्तुमात्र आहे तसं स्त्रीला लेखलं आहे का, असा आक्षेप काही जण घेतात. ‘विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची,’ असं समर्थानी आधीच सांगितलं आहे. तरीही काही अंशी या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. कामिनी आणि कांचन यांची िनदा सर्वच संतांनी केली आहे, पण याचा अर्थ ती िनदा स्त्रीची नाही! संतांमध्ये स्त्री-पुरुष असा भेद करणं चुकीचंच आहे आणि सर्वच संत हे मातृहृदयीच असतात, तरीही सांगतो की, स्त्री संतांनीही ‘कामिनी’ची िनदा केली आहे! ही िनदा स्त्रीची नसून द्रव्य आणि स्त्रीची जी ओढ अंतरंगात पक्की आहे त्या ओढीची आहे. बरं परस्त्रीची लालसा बाळगू नका, हे सांगण्यात जुनाट विचारसरणीचं काय आहे? सामाजिक संकेत आणि नीतिमत्तेला सोडून जो भावनिक गुंता निर्माण होतो त्याची अखेर बहुतांश क्लेशकारकच असते. दोन व्यक्तींचा संपर्क आणि सहवास हा दोन निर्जीव यंत्रांना एका जागी ठेवल्यासारखा नसतो, हे खरं. मन आहे म्हणून मनुष्य आहे आणि हे मन जाणीवरहित नाही. माणसाला भावना आहेत. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये प्रेम वा मत्र निर्माण होण्यात अस्वाभाविक काही नाही; पण जेव्हा सामाजिक संकेत आणि नीतिमत्तेला छेद देणारी ओढ निर्माण होते तेव्हा त्यातून स्थिर, भक्कम असं नातं निर्माण होत नाही. झाल्यासारखं वाटलं तरी ते टिकत नाही. अनिश्चिततेच्या सावटामुळं निदान एकाचं मन तरी भवितव्याच्या भीतीनं खचतं आणि दुराग्रही, हट्टाग्रही होतं. यानं गुंता अधिकच वाढतो आणि आयुष्यातला बहुमूल्य वेळ तर त्यात वाया जातोच, पण अपरिमित भावनिक आणि मानसिक हानीही होते. म्हणून सामाजिक संकेत आणि नीतिमत्तेला सोडून पसा मिळवू नये, तो मिळविण्याची आस बाळगू नये आणि सुखभ्रमाच्या ओढीनं कशातही वा कुणातही गुंतून आयुष्याचं ध्येय विसरू नये. साधकासाठी तर आयुष्यातला क्षणन् क्षण महत्त्वाचा असतो. ज्याला याच जन्मात परम ध्येयशिखर गाठायचं आहे त्यानं तरी अशा ओढींपासून दूर राहावं, यासाठी हे दोन चरण आहेत. दुसऱ्याच्या संपत्तीचा वा परस्त्रीचा लोभ आणि मत्सर साधकानं बाळगू नये, हा या श्लोकाचा रूढार्थ बरोबरच आहे. आता या श्लोकाचा बेळगावचे श्रीकाणे महाराज यांनी जो गूढार्थ सांगितला आहे जाणून घेऊ. ते म्हणतात त्याचा आशय असा की, ‘‘हे मना, भगवान आत्मारामाच्या ठिकाणी हरिकीर्तनाच्या योगाने म्हणजे नामस्मरणाने प्रेम, भक्ती धारण करावी. त्याच्या गुणवर्णनात आणि नामस्मरणात असे रंगून जावे की देहभाव हरपावा. देहाची आठवणही होऊ नये, देहाला विसरून जावे, वासनांची ये-जा खुंटवावी म्हणजे मनाला रोधावे, बांधावे.. मग पर म्हणजे श्रेष्ठ असा आत्माराम हीच द्रव्यसंपत्ती मिळवावी आणि त्याची कांता म्हणजे माया हिचा त्याग करावा.. हे मना या मायेची आसक्ती टाकून दे आणि आत्मारामाचे निरतिशय सुख देणारे नामस्मरण अंत:करणात करीत जा..’’