समर्थ रामदास विरचित ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोक’ या साधकाच्या आंतरिक जडणघडणीसाठी अवतरलेल्या ग्रंथाचा महत्त्वाचा असा उत्तरार्ध आता सुरू होत आहे. हे जे नाव आहे ना, ‘श्रीमनाचे श्लोक’ तेही फार अर्थगर्भ आहे बरं का! हे नुसत्या मनासाठीचे श्लोक नाहीत तर ‘श्रीमना’साठीचे श्लोकही आहेत. ‘श्री’ म्हणजे संपन्न, वैभवयुक्त! तर ज्या मनाला आध्यात्मिक वैभवाचा लाभ होणार आहे त्यालाही सावध करणारे आणि सांभाळणारे असे हे श्लोक आहेत आणि त्याचा प्रत्यय या उत्तरार्धाच्या टप्प्यात येणार आहेच. आतापर्यंत खूप काही सांगून झालं आणि आता प्रत्यक्ष कृतीला चालना मिळावी यासाठी समर्थ मार्गदर्शन करणार आहेत. १०३वा श्लोक म्हणजे एक नाजूक टप्पा होता. सगळ्या जगाचा त्याग एकवेळ साधेल, पण द्रव्य आणि कांता यांचा त्याग मनातून साधणार नाही. ‘द्रव्य’ म्हणजे पैसाच नव्हे तर आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा आधार वाटतो आणि ज्या ज्या गोष्टींसाठी आपलं मन द्रवीभूत होतं, त्या सर्व स्थूल गोष्टी. ‘कांता’ म्हणजे पत्नीच नव्हे तर ज्या ज्या गोष्टींना आपण मानसिक, भावनिक आणि दैहिक सुखाचा आधार मानतो आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या देहबुद्धीला चिकटून असतात त्या सर्व गोष्टी. तर माणूस एकवेळ जगाशी फटकून राहील, पण अंतरंगातली सूक्ष्म कामना, वासना आणि भौतिकाचा आधार त्याला सोडवणार नाही.
खरं तर ज्या मनानं भगवंताचं मनन करायचं आहे त्या मनात भगवंताच्या जोडीनं भौतिकाचंही मनन सुरू राहू शकणार नाही. ज्या चित्तानं भगवंताचं चिंतन करायचं आहे त्याच चित्तात भगवंतासह जगाचंही चिंतन एकाचवेळी साधणार नाही. ते साधत नसताना मी ते करीत राहिलो तर काय स्थिती ओढवेल, हे समर्थ आता १०४व्या श्लोकात सांगणार आहेत आणि प्रत्यक्ष कृतीसाठी चालना देणार आहेत. प्रथम हा मूळ श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :
क्रियेवीण नानापरी बोलिजेते।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें।
मना कल्पना धीट सैराट धांवे।
तया मानवा देव कैसेनि पावे ।। १०४ ।।
प्रचलित अर्थ : आचरण नसताना मोठय़ा गप्पा ठोकून काय लाभ? अंतरंगात आपली लायकी आपल्याला समजतच असते आणि त्यानं चित्त दुश्चित्त होतं. हे मना नुसत्या स्वैर कल्पनांचं वारू उधळून देऊन काही साधत नाही. अशा माणसाला देव काही पावत नाही.
आता या श्लोकाच्या मननार्थाकडे वळू. समर्थ या श्लोकात साधकाला विचारतात की, आचरण नसताना नुसतं उच्च तत्त्वज्ञान तोंडानं बोलून काय फायदा? आपण स्वत: बोलतो त्याप्रमाणे वागत नाही, या जाणिवेनं चित्त दुश्चित्त होऊन स्वत:ची लाज वाटू लागते. हे साधका तशी वेळ स्वत:वर येऊ देऊ नकोस. कारण तोंडी गप्पा मारून किंवा उत्तुंग कल्पनांमध्ये रमून खरा देव काही पावणार नाही, अर्थात गवसणार नाही! आता साधन पथावर आल्यामुळे जो स्वत:ला साधक मानत आहे त्याला खरी साधना काय असते, ती कशी नेटानं करायची आणि या साधनेनं प्राप्त तरी नेमकं काय करून घ्यायचं असतं ते समर्थ या श्लोकापासून स्पष्टपणे सांगणार आहेत.
आता कोणताही आडपडदा नाही. समर्थ आईच्याच हृदयानं समजावणार आहेत.. पण अखेर खऱ्या आईला काही वेळा मुलाच्या खऱ्या हितासाठी कठोरही व्हावं लागतंच ना?