कृती नाही, तर अनुभव नाही आणि अनुभव नसेल तर कल्पनेचाच पगडा असेल! ‘मनोबोधा’च्या १०४व्या श्लोकात म्हणूनच समर्थ सांगतात,
‘‘क्रियेवीण नानापरी बोलिजेतें।
परी चित्त दुश्चित्त तें लाजवीतें।
मना कल्पना धीट सैराट धांवे।
तया मानवा देव कैसेनि पावे।।’’
जगात वावरताना, जगातले सर्व व्यवहार पार पाडत असताना जर नामाची जोड नसेल म्हणजे चित्तात जीवनध्येयाचं स्मरण नसेल तर संकुचित, अशाश्वत अशा भौतिकाचीच ओढ लागेल आणि अनुभवही संकुचितच येतील. त्यानं चित्ताला शाश्वत समाधान काही लाभणार नाही. मग मन कल्पनेच्या गुंत्यात सापडेल आणि अध्यात्म, देव, भक्ती यासुद्धा कल्पनाच वाटू लागतील. कल्पनेनुसारचे प्रयत्न सुरू राहतील आणि देवाचा साक्षात्कार म्हणजे नेमका काय, देवाची कृपा म्हणजे काय, हेदेखील कल्पनेनंच निश्चित केलं जाईल! अशा ‘साधका’ला खरा देव कोणता, हेच उमगायचं नाही, मग तो प्राप्त होण्याची गोष्ट दूरच!
भक्तीही जर अशी कल्पनेनुसार सुरू असेल तर त्या भक्तीनं जे ‘ज्ञान’ गवसेल तेही काल्पनिकच असेल. त्यानं समाधान होणार नाही. समर्थ एका अभंगात म्हणतात, ‘‘भक्तीविण ज्ञान त्या नांव अज्ञान। जाणती सज्ञान संतजन।।१।।’’ भक्तीशिवाय जे प्राप्त होतं ते ज्ञान नव्हे अज्ञानच असतं. केवळ जो संत आहे तोच सज्ञान (ज्ञानासह, साक्षात ज्ञानस्वरूपच) असतो. त्याच्याकडूनच खरी भक्ती कशी असते ते जाणून घ्यावं लागतं. ती करावी लागते. मोठं मंदिर बांधायचं तर वास्तुविशारदाकडमून बांधून घ्यावं लागतं. नाहीतर काय होतं? समर्थ सांगतात, ‘‘पायाविणें थोर केलें दामोदर। पावतां संव्हार वेळ नाहिं।।२।।’’ दामोदर म्हणजे रत्नखचित मंदिर. तर मोठं रत्नजडित मंदिर तर उभारलं, पण पायाच केला नाही तर ते कोसळायला वेळ लागणार नाही. कल्पनेनुसार भारंभार भक्तीचा डोलारा उभा केला, पण पायाच पक्का नसेल, बैठकच पक्की नसेल तर ती भक्ती डळमळीत व्हायला काय वेळ लागणार? ‘‘तारूविण नांव तो नव्हे उपाव। ठाकवेना ठाव पैलथडी।।३।।’’ अथांग समुद्र पार करायचा आहे पण म्हणून नुसती नौका असून भागत नाही, तारूही लागतात, वल्हीही लागतात. ती नसतील तर पैलतीर गाठता येत नाही. अगदी तसंच भवसागर पार करायचा असेल तर कल्पनेनुसारच्या उपासनेची नौका बांधून चालत नाही. ती मध्येच गटांगळ्या खाऊन बुडू शकते. उपासनेच्या नौकेला खऱ्या बोधरूपी ज्ञानाची वल्हीही लागतात! त्याशिवाय ऐलतटावर असलेलं साधकाचं मन पैलतटावर जाऊ शकत नाही. अर्थात, संकुचित खोडय़ातून सुटून व्यापक होऊ शकत नाही. ‘‘रामदास म्हणे शुद्ध उपासनें। विश्रांती पावणें केवी घडे।।४।।’’ समर्थ म्हणतात, अशी शुद्ध ज्ञानाची जोड असलेली उपासना जोवर होत नाही तोवर मनातली अस्थिरता उपसली जात नाही! तोवर खरी विश्रांती मिळत नाही! थोडक्यात कल्पनेच्या भराऱ्या मारून कितीही उपासना केली तरी खरा ‘देव’ प्राप्त होत नाही, मिळाला तरी समोर असूनही उमगत नाही!! तर खरी क्रिया नसेल तर खरा अनुभव नाही आणि तो नसेल तर मन कल्पनेमागेच वाहावत जाते. या कल्पनेला समर्थ ‘धीट’ म्हणतात! धीट म्हणजे कोणतीही भीडभाड न बाळगणारी. मी दिवसातून एकदा देवाच्या तसबिरीला हार घालतो, नमस्कार करतो.. झालंच तर जप करतो.. भरपेट खाऊन-सवरून उपास करतो.. तर देवानं माझं लग्न करून द्यावं, पत्नी चांगली मिळावी, आर्थिक अडचणी कधीच येऊ नयेत, मुलं चांगली निपजावीत, त्यांची शिक्षणं उत्तमरीत्या पार पडावीत, त्यांची लग्नं नीट व्हावीत.. अशा एकामागोमाग एक मागण्या करण्याचं ‘धैर्य’ माझी ही कल्पनासिद्ध भक्ती दाखवते! तेव्हा जे खरं साधणार आहे ते कल्पनेनं नव्हे खऱ्या उपासनेनंच.. पण हे कळायला वेळ लागतो. कल्पना मावळणं सोपं नसतंच.