मनातल्या कल्पना मावळणं हे सोपं नसतंच. कारण आपलं जीवन बरेचदा आपण अनेकानेक कल्पनांमध्ये रमतच व्यतीत केलेलं असतं. अमुक गोष्टीतून सुख मिळेल, अमका माणूस सुख देईल, अमुक दिवसांत गोष्टी मनासारख्या होतील, या सर्व आपल्या कल्पनाच असतात. त्यांची पूर्ती झाली नाही की आपला अपेक्षाभंग होतो. खरं तर तो कल्पनाभंगच असतो! पण तरी कल्पना करणं काही सुटत नाही. उलट साधनपथावरही ती सवय कायम राहाते. आपण साधना सुरू करू, मग अमक्या दिवसांत ‘साक्षात्कार’ होईल, ‘देवा’चं ‘दर्शन’ होईल, हीसुद्धा कल्पनाच असते! कारण खरी साधना कोणती, खरा साक्षात्कार कोणता, देव म्हणजे तरी खरा कोणता, त्याला पाहायचं कुठं, हे आपल्याला नेमकेपणानं कुठं माहीत असतं? एखादी शैक्षणिक पदवी मिळवणं ही काय अशक्य कोटीतली गोष्ट आहे का हो? आजवर लाखो लोकांनी पदव्या मिळवल्या आहेत आणि पुढंही मिळवतील; पण त्या पदवीसाठी आपण किती जीवतोड अभ्यास केला? रात्र-रात्र जागूनही अभ्यास केला. मग अनंत जन्मांच्या मोह-भ्रमाच्या चक्रातून सुटण्यासाठीचा अभ्यास आपण किती करतो? दिवसभरात वेळ मिळालाच तर! बरं त्यातही काही गर नाही. जेवढं साधेल तेवढंच करावं, पण मग अपेक्षा भल्या मोठय़ा का? कारण कल्पना! बरं काही जण आणखी काही पावलं पुढं जातात. खऱ्या सद्गुरूच्या बोधानुरूप साधना करू लागतात; पण त्यातही ‘मी’पणा कसा सूक्ष्मपणे शिरतो याकडे लक्ष देत नाहीत. जसे पूर्वी होतो तसेच राहून साक्षात्कार व्हावा, अशी त्यांची अंतस्थ इच्छा असते! वरकरणी त्यांनी घरादाराचा, संसाराचा त्याग केलेला असतो; पण अंतरंगातली जगाची ओढ सुटली नसल्यानं त्यांचा काल्पनिक प्रपंच सुरूच असतो! समर्थ एका अभंगात म्हणतात, ‘‘कांिह केल्यां तुझें मन पालटेना, दास म्हणे जना सावधान!’’ समर्थ जनाला म्हणजे आपल्या भक्ताला सांगत आहेत, ‘‘बाबा रे काहीही केलं तरी तुझं मन काही पालटत नाही! आणि जोवर मन पालटणार नाही तोवर काही उपयोग नाही!’’ तेव्हा भर आहे तो मन पालटण्यावर.. मनाच्या सवयी पालटण्यावर. थोडी साधना केली, अध्यात्माची अनेक पुस्तकं वाचली, त्यातले कित्येक उतारे तोंडपाठ झाले, उत्तम बोलता येऊ लागलं, उत्तम लिहिता येऊ लागलं, एवढय़ानं साधलं का हो? एवढय़ानं साधक ‘ज्ञानी’ झाला का हो? समर्थ एका अभंगात म्हणतात, ‘‘जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी। निसंदेह मनीं सर्वकाळ॥’’ ज्ञानी खरं कुणाला म्हणता येईल? तर जो पूर्ण समाधानी आहे आणि कोणत्याही क्षणी त्याच्या मनात संदेह म्हणून नाही. थोडक्यात मनच पालटलं पाहिजे, मनाची संदेहग्रस्त राहण्याची सवय पालटली पाहिजे. मनातून जोवर कल्पना पूर्णपणे मावळत नाहीत तोवर ही स्थिती येणं शक्य नाही. श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वाक्य आहे की, ‘‘पुष्कळ केलेलेसुद्धा शंकेने व्यर्थ जाते!’’ तेव्हा खूप काळ संतजनांबरोबर घालविला, खूप जप वगरे केला, खूप उपासतापास केले, पण इतकं करूनही माझ्यावर कृपा का नाही, ही शंका आली की सारं केलेलं व्यर्थ ठरतं.. कारण मग ते सगळं सकाम होऊन जातं! आणि सकाम कर्माचा नियम असा की, तुम्ही जेवढं केलंत तेवढय़ाचाच लाभ मिळतो. निष्काम कर्माचा लाभ मात्र परमात्मा स्वखुशीनं देत असल्यानं तो अतुलनीय असतो. तर इथं ‘एवढं करूनही माझ्यावर कृपा का नाही,’ ही शंका येते ती कल्पनेमुळेच! अमुक केलं की अमुक मिळेलच, ही व्यवहारातली कल्पना आपण अध्यात्मात वापरू पाहातो.