जगच खरं आहे, ही ज्याची ठाम कल्पना आहे आणि ज्याला परमात्मा काल्पनिक किंवा कल्पनागम्यच वाटतो त्याच्यात आंतरिक पालट घडविण्यासाठी सत्पुरुष काय करतो? तर पू. बाबा बेलसरे यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘मन कल्पनाप्रधान असल्याने कल्पनांची रचना व तऱ्हा बदलली की मन बदलते. मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो. स्वत:कडे आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘मी देहच आहे,’ ही कल्पना नष्ट करण्यास ‘मी आत्माच आहे,’ ही कल्पना करावी. पहिल्या कल्पनेने द्वैताने भरलेले दृश्य विश्व खरे वाटते. दुसरी कल्पना साधनेने सुदृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्मच खरे वाटते.’’
इथं पू. बाबांनी एका अत्यंत सूक्ष्म गहन सत्याला स्पर्श केला आहे. देह-कल्पना, आत्मा-कल्पना आणि अद्वैत ब्रह्म या तीन शब्दांत हे गूढ सत्य सामावलं आहे आणि विवेकभान आणणाऱ्या साधनेतल्या टप्प्यांचंही त्यात सूचन आहे, असं गेल्या वेळी सांगितलं. त्या अनुषंगानं थोडा विचार करू. बरं ही चर्चा कोणत्या मुद्दय़ावरून सुरू आहे? तर ‘मनोबोधा’च्या १०५व्या श्लोकाचे पहिले जे दोन चरण आहेत त्यावरून ही चर्चा सुरू आहे. हे दोन चरण असे: ‘विवेकें क्रिया आपुली पालटावी, अती आदरें शुद्ध क्रिया धरावी!’ याचाच अर्थ असा की, आज आपल्याकडून जी क्रिया घडत आहे ती योग्य नाही. ती पालटावी लागणार आहे आणि ती पालटण्यासाठी विवेक आवश्यक आहे. आजची आपली जी क्रिया आहे ती अविवेकानं घडत आहे.
ती पालटायची असेल तर विवेक बाणवावा लागेल. त्या विवेकभानाच्या आधारे क्रिया पालटता येईल, जगण्याची भ्रामक रीत बदलता येईल. या विवेकाच्या आधारावर नुसती क्रियाच पालटायची आहे, असं नव्हे तर शुद्ध क्रियाही स्वीकारायची आहे, आपली धारणा त्या शुद्ध क्रियेसाठी योग्य, सुसंगत अशीच राखायची आहे. हा विवेक अंगी बाणणं आणि अविवेक सुटणं ही गोष्ट स्वबळावर शक्य नाही. कारण आपली बुद्धी मनाच्या कह्यात असल्यानं विवेक कुठला आणि अविवेक कुठला, हेच आपल्याला कळणं शक्य नाही. केवळ सत्पुरुषाच्या सहवासात साधनेच्या सहज संस्कारांनी मन जसजसं पालटू लागतं तेव्हाच विवेक कुठला हे उमगू लागतं. तर या पाश्र्वभूमीवर पू. बाबा जे सांगत आहेत त्याचा विचार करू. बाबांच्या सांगण्यानुसार ‘देहच मी’, या कल्पनेत माणूस पूर्ण रममाण आहे. म्हणूनच तर या देहाच्या सुख-दु:खाच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी माणूस सत्पुरुषाकडे प्रथम जातो! आणि आपण मागेच पाहिलं होतं की, सुख-दु:ख ही खरं तर देहाला नव्हेत, तर मनालाच असतात. त्यामुळे आपले सर्व प्रश्न हे खरं तर एका मनाचेच प्रश्न असतात! सत्पुरुष काय करतो? तो देहच मी, या कल्पनेला छेद देण्यासाठी ‘आत्माच मी’, ही मांडणी करतो. प्रथमावस्थेत साधकाला मात्र ‘आत्माच मी’, हीच कल्पना वाटते! हा आत्मा परमात्म्याचाच अंश आहे म्हणून तूही परमात्म्याचाच अंश आहेस, असं सत्पुरुष सांगतो; पण ‘देहच मी’, ही कल्पना खरी वाटत असल्यानं या देहाला जखडलेलं जगही खरं वाटत असतं आणि ‘आत्माच मी’, हे खरं वाटत नसल्यानं परमात्माही खरा वाटत नसतो! जगाचं खरेपण म्हणजे जगाचा प्रभाव घालविण्यासाठी आणि परमात्म्याचं खरेपण मनावर बिंबविण्यासाठी, विवेक जागृत करण्याकरिता जे जे प्रयत्न मग सुरू होतात तीच साधना असते.