मनोबोधाच्या पहिल्या एकवीस श्लोकात जिथे जिथे सज्जन असा उल्लेख आला आहे तिथे तिथे तो मनाला उद्देशून उच्चारलेला नाही. ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ अर्थात हे मना, सज्जनांच्या भक्तीपंथानं जा, इथपासून सज्जन म्हणजे संतजन, निजजन असाच रोख आहे. या बावीसाव्या श्लोकाचं वैशिष्टय़ हे की यात मनालाही सज्जनतेचं बिरुद लावलं आहे. समर्थ सांगतात, ‘‘मना सज्जना हीत माझें करावें। रघूनायका दृढ चित्तीं धरावें। महाराज तो स्वामि वायूसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा।।’’ हे सत्ने प्रेरित झालेल्या मना, माझं एवढं हीत कर. सद्गुरूंना चित्तात दृढ धारण कर. अखेरच्या दोन चरणांत हा सद्गुरू कसा आहे, याचं मार्मिक वर्णन आहे..  महाराज तो स्वामि वायूसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा।। हा सद्गुरू कसा आहे? तो वायुसुताचा स्वामी आहे आणि लोकत्रयाचा नाथ आहे! हे शब्द मोठे अर्थपूर्ण आहेत. रघुनायक हे वायुसुताचे स्वामी होते अर्थात वायुपुत्र हनुमानाचे स्वामी होते, हा अर्थ तर सरळ आहेच. पण साधकासाठी आणखी एक अर्थ आहे. वायू कसा असतो? तो सर्वत्र असतो आणि कधीच स्थिर नसतो. तसं साधकाचं मन हे सर्वसंचारी असतं आणि सदोदित चंचल असतं. या मनाचं आणि मानाचं अर्थात मीपणाचं जो हनन करतो, या मनाला जो नाहीसं करू शकतो तोच खरा हनुमान होतो! तोच खऱ्या अर्थानं रघुनायकाला चित्तात दृढ धारण करू शकतो. चंचल आणि अस्थिर अशा मनावर ताबा मिळवणं, ही काही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी जो या मनाचा स्वामी आहे त्याचाच आधार घ्यावा लागतो. नाहीतर कसंतरी दडपलेलं मन कल्पनातीत उत्पात घडवू शकतं. मनाची शक्ती ही असामान्य आहे आणि जिथं शक्ती आहे तिथं त्या शक्तीच्या नियमनासाठी त्यापेक्षा अधिक शक्ती लागते! अगदी त्याचप्रमाणे मनावर नियंत्रण आणायचं असेल तर निव्वळ मनाच्या शक्तीनं ते साधणारच नाही. त्यासाठी जी खरी व्यापक शक्ती लागते ती केवळ सद्गुरूंच्याच आधारानं मिळू शकते. त्यामुळे या सद्गुरूंचा आधार घ्यायला समर्थ सांगत आहेत. त्यापुढचा चरण तर मोठा व्यापक आहे. समर्थ सांगतात, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा।। अरे मना, हा सद्गुरू कसा आहे? तो जनांचा अर्थात निजजनांचा उद्धार करणारा आहे.  आणि हे निजजन कसे आहेत? तर लोकत्रय.. लोकत्रयाचा अर्थ त्रलोक्य असा आपण लावतो. पण  लोकत्रय या शब्दाचा खरा गूढ अर्थ आहे तो सामान्य, मध्यम आणि उच्च या तीन श्रेणीतील लोकांशी संबंधित आहे. ही आर्थिक किंवा सामाजिक श्रेणी नव्हे. ही आंतरिक श्रेणी आहे. सद्गुरूंपाशी कोणत्याही तऱ्हेचा माणूस येवो.. तो नीच वृत्तीचा असो, सामान्य बुद्धीचा असो, मध्यम वृत्तीचा असो की अगदी ‘सिद्ध’ झाल्याचं मानणारा, भरपूर साधना करणारा असा उच्च पातळी गाठल्याचं मानणारा साधक असो; या तिघांचा उद्धार सद्गुरू करतात! माउलीही म्हणतात ना? ‘नामे तिन्ही लोक उद्धरती’ त्याचाही अर्थ हाच आहे. दृढ भावनेनं केलेल्या उपासनेनं नीच, मध्यम आणि उच्च या  तिन्ही आध्यात्मिक पातळीवरच्या साधकांचा उद्धार होतो. दुसरा अर्थ असा की, हे जग त्रिगुणांचं बनलेलं आहे.  त्यामुळे साधकांतही सात्त्विक, तामसी आणि राजसी असे तीन भेद असतात. साधक सात्त्विक असो, तामसी असो की राजसी असो; एकदा का त्यानं सद्गुरू बोधाचा आधार चित्तात दृढ धरला की त्याचा उद्धार होणारच! तेव्हा २२व्या श्लोकाचा मननार्थ असा की, ‘‘हे सज्जनप्रेरित मना, माझं एवढं हीत कर. सद्गुरूंना चित्तात दृढ धारण कर. तसं केलंस तर तुझ्या मनाचा ताबा ते घेतील आणि मग त्रिगुणांच्या प्रभावात अडकलेल्या तुझा उद्धार होईल!’’ आता सद्गुरूंना चित्तात दृढ धरण्याचे उपाय पुढील श्लोकापासून समर्थ सांगत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-चैतन्य प्रेम

-चैतन्य प्रेम