जे जे मला अशाश्वतात गुंतवतं ते प्रत्येक कृत्य अविवेकातूनच घडत असतं आणि जे जे कृत्य मला शाश्वताशी लय साधून देतं ते प्रत्येक कृत्य हे विवेकातूनच घडत असतं. शाश्वत अशा परमात्म्याच्या स्मरणात जो अखंड राहतो त्याच्या हातून अविवेकी कृत्य घडूच शकत नाही. आणि म्हणूनच समर्थासह सर्वच संतांचा परमात्म्याशी अर्थात परम तत्त्वाशी जोडणाऱ्या साधनांवर भर असतो. आपली कर्तव्यं करीत असतानाच परमात्म्यावर सर्व भार टाकून कसं जगता येतं हे ते आपल्या जीवनातूनही शिकवत असतात. पण आधीच म्हटल्याप्रमाणे तो परमात्माच आपल्याला खरेपणानं जाणवत नसताना त्याच्यावर इतका विश्वास कसा काय ठेवता येऊ शकतो, असंही वाटतं. पण सत्पुरुष सांगतात की, तुम्ही ज्या ‘मी’पणानं जगता तो ‘मी’देखील खरा नाही, त्या ‘मी’च्या जोरावर काही साधत नाही, हे वारंवार दिसतं. तरीही त्या ‘मी’वर तुम्ही विसंबता. मग ज्या परमात्म्याच्या आधारावर निर्भय, निश्चिंत होता येतं, हा माझा अनुभव आहे, तो तुम्ही आपलासा का करीत नाही? साधुसंतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानं चालण्याचा अभ्यास का करीत नाही? तसं जगणं हीच जीवनसाधना आहे. ही साधना म्हणजे प्रत्यक्ष जगणं अवधानपूर्वक जगू लागणं! काहीही सोडायला नको, कोणताही त्याग करायला नको, कुणाशीही संबंध तोडायला नकोत.. जगण्याची तऱ्हा न बदलता, केवळ स्वत:च्या जगण्याकडे अवधान द्यायला सुरुवात करायची आहे. गेल्याच भागात सांगितल्याप्रमाणे, आपण अनवधानानंचुकीचं वागत असतो आणि अवधान आलं की वागण्यातल्या चुका टाळता येतात. आपल्या आजवरच्या जगण्याकडे जरी पाहिलं तरी लक्षात येईल की, मनाच्या ओढीनुसार जगताना आपण अनेकदा वागू नये तसं वागलो, बोलू नये ते बोललो, करू नये ते केलं. आपल्या जन्माच्या मूळ उद्देशाचं विस्मरण, आपल्याला लाभलेल्या अपूर्व मनुष्यदेहाचं आणि मानवी जन्माच्या बहुमूल्य संधीचं विस्मरण, आपल्याला लाभलेल्या कालमर्यादेचं विस्मरण म्हणजेच हे अनवधानआहे. या सर्वाचं स्मरण म्हणजे खरं अवधान आहे. अर्थात अनवधान सुटून अवधान येण्याची आणि टिकण्याची प्रक्रिया सहजसाध्य नाही. तो अभ्यास आहे. आपलं अवधान कधी टिकतं तर कधी सुटतं. म्हणून तर आपण मनुष्य म्हणजे मनाच्या कह्य़ात आहोत. समर्थानीही म्हटलं आहे की, ‘‘स्मरण म्हणिजे देव। विस्मरण म्हणिजे दानव। स्मरण विस्मरणें मानव। वर्तती आतां।।’’ (दासबोध, दशक १५, समास ७). जे शुद्ध स्मरण आहे तेच ‘देव’ म्हणजे खरं समाधान देणारं आहे आणि जे शाश्वताचं विस्मरण आहे तेच ‘दानव’ म्हणजे रोज नवनवं असमाधान देणारं आहे. माणूस असा स्मरण-विस्मरणात अडकणारा म्हणूनच कधी समाधानी तर कधी असमाधानी आहे. त्याला जर अखंड समाधानी व्हायचं असेल तर विवेकीच व्हावं लागेल. त्यासाठी प्रथम अनावधानानं, अविवेकानं आपण आजवर किती शक्ती, क्षमता आणि पैसा सोडाच, जीवनातला बहुमूल्य वेळही निर्थक गोष्टीत निर्थक खर्च केला, याचं अवधान जागं व्हावं लागेल. या अवधानाला विवेकपूर्ण साधनेची जोड असली की हे अवधान अधिक सतेज होतं. आता खरी साधना कोणती आणि ती कशी करायची हे सद्गुरूच सांगत असला, तरी जोवर खऱ्या सद्गुरूची प्राप्ती झालेली नाही किंवा खरा सद्गुरू ओळखता आलेला नाही, तोवर सत्पुरुषांच्या जीवनातून आणि सहवासातून आपल्याला साधनेचे संस्कार ग्रहण करता येतात. त्यातून अंत:करणात योग्य काय-अयोग्य काय, स्वीकारावं काय आणि नाकारावं काय, या विवेकाचं भान येतं. त्यातून जगण्याची रीत पालटत जाते. समर्थ म्हणतातच, ‘‘विवेके क्रिया आपुली पालटावी!’’