विवेकाच्या आधारावर आपल्याला आपल्या जगण्याची रीत बदलायची आहे. आपल्याकडून जी जी कृत्य होत आहेत ती अविवेकाच्या जोरावर होत आहेत. तेव्हा विवेकानंच त्यात बदल करायचा आहे. आता नुसतं विवेकानं आपल्याकडून होणारे क्रियाकलाप बदलायचे नाहीत तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘शुद्ध क्रिया’च पार पाडायच्या आहेत. (विवेकें क्रिया आपुली पालटावी, अति आदरें शुद्ध क्रिया धरावी!) आता मुळात हा विवेक नेमका कोणता आणि तो अंगी कसा बाणवायचा, हेसुद्धा कळलं पाहिजे ना? आणि हा विवेक कळण्यासाठी सत्पुरुषाचा संग अनिवार्य आहे. बरं सत्पुरुषाचा संग हासुद्धा सदोदित लाभणं सोपं नाही. त्यामुळे संत-सत्पुरुषांच्या ग्रंथांचा संगदेखील तितकाच लाभदायक आहे. ग्रंथांचा संग म्हणजे त्या ग्रंथात मांडलेल्या विचारांचा संग आहे. समर्थ ‘दासबोधा’त म्हणतात, ‘‘रायाचे सन्निध होतां। सहजचि लाभे श्रीमंतता। तसा हा सत्संग धरितां। सद् वस्तु लाभे॥’’ (दशक ६, समास ९). एखाद्या श्रीमंतांचा संग सतत लाभला तर मनावर भौतिक संपदेचे सहज संस्कार होतात. तसा जर शुद्ध सत्संग लाभला तर जे शाश्वत आहे त्याचीच प्राप्ती होते. हा जो सत्संग आहे तो आपले डोळे हळूहळू उघडू लागतो. आपण आपल्या भ्रम-मोहजन्य आसक्तीचे कसे गुलाम झालो आहोत, याचं भान आणून देतो. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, ‘‘अनंत तो अनंत रे, प्रपंच अंतवंत रे!’’ हा जो प्रपंच आहे ना, तो अंतवंत आहे. त्याचा अंत अटळ आहे. तो प्रपंच आज ना उद्या संपणारच आहे. हा जो परमात्मा आहे ना, तो मात्र अनंत आहे. त्याला अंत नाही. तोच शाश्वत आहे. तेव्हा जे कोणत्याही क्षणी नष्ट होणारं आहे त्याच्या आधारावर अखंड टिकणारं समाधान मिळणं कदापि शक्य नाही. जो अखंड आहे, अनंत आहे, शाश्वत आहे, त्याच्याच आधारावर अखंड, अनंत आणि शाश्वत असमाधान मिळेल, ही जाण हा सत्संग जागवतो. अविवेकीपणा सोडून विवेकी होण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सूक्ष्म आहे. अर्थात अविवेकी क्रिया सुटून शुद्ध म्हणजेच विवेकी क्रिया हातून घडण्याची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म, व्यापक आणि दीर्घ आहे. तिच्यासाठी ‘नाम’ हाच सूक्ष्म पण व्यापक उपाय संत-सत्पुरुष सुचवितात. या नामानं प्रपंचातलं आपलं गुंतणं आणि त्यामुळे निर्माण झालेला गुंता आपला आपल्याला समजतो. हा ‘प्रपंच’ म्हणजे केवळ घरा-दाराचा नव्हे, बायको-पोरांचा नव्हे. तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे आपली जी ओढ आहे तोच खरा प्रपंच आहे! तेव्हा नामसाधनेनं प्रपंचाचा हा व्यापक विळखा लक्षात येऊ लागतो. मनात उमटणाऱ्या अनंत वासना तरंगांनी आपण कसं वाहवत जातो, हे समजतं. मनातल्या या अनंत तरंगांकडे अलिप्तपणे पाहण्याचा अभ्यास मग सुरू होतो. खरी साधना अधेमधे साधू लागते. समर्थ म्हणतात, ‘‘सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी॥ ५६॥ (दासबोध, दशक ५, समास ९). अविवेकाचा, अविचाराचा, अशाश्वताचा संग त्यागून विवेकाचा, सद्विचाराचा आणि शाश्वताचा सत्संग स्वीकारण्याची प्रेरणा निर्माण होऊ लागते. समर्थानाही हेच अभिप्रेत आहे की विवेकाच्या जोरावर आपल्याला आपल्या जगण्याची रीत पालटता यावी आणि शुद्ध क्रिया धारण करता यावी. खरी शुद्ध क्रिया ही खरं तर आंतरिक आहे! कारण माणूस बाहेरून कितीही ‘चांगला’ का वागेना, आतून तो चांगला आहे का, यालाच खरं महत्त्व आहे. त्याचं जनातलं चालणं फार उत्तम का असेना, त्याचं मनातलं जे चालणं आहे, मनाची जी चाल आहे, ती उत्तम आहे का, यालाच खरं महत्त्व आहे. मन जर वाकडय़ा चालीतच गुंतलं असेल तर पाऊलही वाकडय़ा वाटेलाच कधी नेतील, याचा भरवसा नाही!
– चैतन्य प्रेम