प्राथमिक वाटचाल सुरू केलेल्या साधकाला समर्थ ‘मनोबोधा’च्या १०६व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत एक प्राथमिक आणि मूलभूत असा स्वाध्याय सांगत आहेत. हा स्वाध्याय म्हणजे, ‘‘बरी स्नानसंध्या करीं येकनिष्ठा। विवेकें मना आवरीं स्थानभ्रष्टा!’’ यात ‘स्नान’ आणि ‘संध्या’ करायला सांगितलं आहे आणि तीसुद्धा कशी? तर, बरी! सर्वश्रेष्ठ नव्हे, उत्तम नव्हे, चांगली नव्हे!! कारण यातच अडकायचं नाहीये. माणूस दात घासतो किंवा आंघोळ करतो त्यामागचा हेतू शरीराची मूलभूत स्वच्छता राखणं हा असतो. पण म्हणून माणूस दिवसभर दातच घासत बसला किंवा आंघोळच करीत बसला तर काय उपयोग? म्हणजेच कर्मापेक्षा त्यामागच्या हेतूलाच महत्त्व आहे. कर्माचा प्रमाणाबाहेर अतिरेक झाला तर हेतू साध्य होत नाहीच. प्रकृतीसाठी रोज सकाळी वैद्यानं एक औषध घ्यायला सांगितलं, पण म्हणून औषध गुणकारीच तर आहे, असं म्हणत मी ते दिवसभर घेत राहिलो तर प्रकृती अधिकच धोक्यात येईल ना? तसं स्नान आणि संध्येमागचा आंतरिक हेतू लक्षात न घेता त्यातच अडकलो तर कर्मठपणा येईल. इथं तर ‘बऱ्या’ स्नान-संध्येपासून सुरुवात आहे आणि अखेर विवेकस्थिती हेच ध्येय आहे. आता हे ‘स्नान’ आणि ‘संध्या’ रूपक म्हणून आली आहेत, असंही गेल्या वेळी म्हटलं. काय आहेत ही रूपकं? तर हे स्नान केवळ शरीराचं नाही. ते आंतरिक आहे. सद्विचारांच्या वाचन व श्रवणानं अंतर्मनाला घातलं जाणारं हे स्नान आहे. त्याला ‘संध्ये’ची म्हणजे परमात्म-स्मरणाची, व्यापकत्वाच्या स्मरणाची जोड द्यायची आहे. थोडक्यात वाचले जाणारे, ऐकले जाणारे विचार जेवढे उत्तुंग आहेत तेवढंच स्मरण आणि चिंतनही जे जे उत्तुंग आहे, व्यापक आहे त्याचंच असलं पाहिजे. हे सारं एकनिष्ठेनं म्हणजे एका परम तत्त्वाशी निष्ठा राखून करायचं आहे. पण हे सारं बऱ्या प्रमाणात करायचं आहे. नुसतं विचार श्रवणाचं स्नान आणि विचार स्मरणाची संध्या एवढंच साध्य करायचं नाही तर ते कृतीत आणण्याकडेही लक्ष द्यायचं आहे. ही कृती म्हणजे, ‘‘विवेकें मना आवरीं स्थानभ्रष्टा!’’ स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकानं आवरायचं आहे! आणि लक्षात ठेवा, अध्यात्म हे ऐकण्या-बोलण्याचं, वाचण्या-लिहिण्याचं शास्त्र नाही, ते प्रत्यक्ष कृतीचं शास्त्र आहे. जे ज्ञान कृतीत येऊच शकत नाही, ते ज्ञानच नव्हे. जोवर पूर्णज्ञान होणार नाही तोवर ते कृतीतही उतरणार नाही, पण जितकं जितकं ज्ञान होत आहे, ते तरी कृतीत उतरलं पाहिजे ना? प्राथमिक टप्प्यावरच्या साधकाला समोर ठेवून इथं समर्थ जी कृती सांगत आहेत ती प्रत्येक टप्प्यानुसार विकसित होत जाणारी आहे. एक मात्र खरं की मनाच्या कह्यात असलेला प्राथमिक टप्प्यावरचा साधक असो की साधना अंगी मुरल्याच्या धारणेनं ‘सिद्ध’ झालोच आता, असं मानणारा साधक असो; स्थान-भ्रष्ट होण्याचा धोका प्रत्येकाला आहे! प्राथमिक टप्प्यावरचा साधक तर भ्रष्ट स्थानापासूनच वाटचालीला सुरुवात करीत असतो. खऱ्या स्वरूप-स्थानाहून तो घसरला असतो आणि देहभावाच्या स्थानीच विराजमान असतो. तेव्हा देहातच अडकलेल्या आणि देहभावानं जगाच्या आसक्तीत जखडलेल्या ‘स्थानभ्रष्ट’ साधकाला समर्थ विवेकाकडे वळवीत आहेत. जे व्यापक विचार ऐकतोस आणि ज्यांचं स्मरण करतोस त्या विचारांची जागाही सोडू नकोस.. त्या सद्विचारांच्या पातळीवर परत मनाला वळव. यासाठी त्या विचारानुसार योग्य काय, अयोग्य काय, स्वीकारार्ह काय, नकारार्ह काय, भोगावं काय आणि त्यागावं काय; याचा निर्णय होऊन मन:पूर्वक तो आचरणातही आला पाहिजे. मनाला तसं वळण लावता आलं पाहिजे. मनाला आवरता आलं पाहिजे. मनानं अपेक्षांचा, इच्छांचा जो आसक्तीयुक्त पसारा मांडला आहे, तो आवरणं म्हणजे मनाला आवरणं आहे.