सज्जनांना जसं परमात्म स्मरणात क्रियाशील जगणं प्रिय आहे तसं जगणं मला साधावं, असं वाटू लागलं, जीवनामागची त्यांची जी धारणा आहे तशी माझी धारणा व्हावी, असं प्रामाणिकपणे वाटू लागलं तर त्यांचा खरा आंतरिक सत्संग सुरू झाला, असं म्हणता येईल. अशा आंतरिक ऐक्यतेच्या दिशेनं वाटचाल करण्याचे सर्व प्रयत्न हेच माझं आताचं जगणं बदलण्याची प्रेरणा मला देऊ लागतात. जगाच्या भक्तीत जो वेळ, ज्या क्षमता नाहक व्यर्थ जात होत्या त्या आता परमात्म भक्तीत कारणी लागाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा मनात उत्पन्न होऊ शकते. मग समर्थ सांगतात की, जगाची ओढ सुटावी आणि परमात्म्याची लागावी, जगाची भक्ती सुटावी आणि परमात्म भक्तीत मी झोकून द्यावं, असं नुसतं तोंडानं बोलून काय उपयोग आहे? काहीही न करता, अमुक करीन आणि तमुक करीन, या वल्गना करण्यात काय अर्थ आहे? समर्थ म्हणतात, ‘क्रियेवीण वाचाळता ते निवारी!’ क्रिया न करता नुसतं त्याबद्दल बोलण्याची जी सवय आहे, ती निवारली पाहिजे. तिचं निवारण केलं पाहिजे. आता प्रश्न असा की, भक्तिमय जीवनाकडे अग्रेसर करणारी क्रिया कोणती, हे नेमकेपणानं कसं ओळखावं? इथं काही मापदंड ज्याचे त्याला निश्चित करावे लागतील. सर्वात पहिली गोष्ट आपली जी प्रापंचिक कर्तव्यं आहेत ती सुयोग्यपणे पार पाडावीच लागतील. पती म्हणून, पत्नी म्हणून, आई वा बाप म्हणून, मुलगा वा मुलगी म्हणून, भाऊ वा बहीण म्हणून जी जी कर्तव्यं आहेत, ती पार पाडलीच पाहिजेत. पण त्याचवेळी माझं मुख्य आत्मकर्तव्य जे आहे त्याचं सदैव स्मरण राहिलं पाहिजे. काय आहे हे आत्मकर्तव्य? तर माणूस म्हणून मी ज्या घरात, ज्या आप्तस्वकीयांत, ज्या समाजात जन्माला आलो त्या सर्वाबाबत जन्मदत्त अशी म्हणजेच जन्मानं वाटय़ाला आलेली अशी जी जी कर्तव्यं आहेत ती पूर्ण केली पाहिजेत. पण मन, चित्त, बुद्धी, अहं म्हणजे अस्तित्वभान तसंच पूर्ण क्षमतांनी सिद्ध असा देह मला का लाभला आहे, याचाही विचार केला पाहिजे. हा देह, अंत:करण व्यापक व्हावं आणि सर्वव्यापी अशा परम तत्त्वाशी एकरूप व्हावं, यासाठीच्या अभ्यासासाठी लाभला आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. ही जाणीव झाली आणि जागी राहिली तरच आप्तस्वकीय आणि समाजाप्रतीची कर्तव्यं करीत असताना मोहाची लागण आपल्या कृतींना होणार नाही. दुसऱ्यासाठी काहीही केलं तरी त्या बदल्यात त्यानंही आपल्यासाठी काही करावं, ही सौद्याची सवय सुटू लागेल. आता आणखी दोन मापदंड असे.. श्रीगोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे की, ‘‘काहीही बोलण्याआधी आपण हे बोललंच पाहिजे का, याचा विचार करावा.’’ हे साधलं तरी निम्मं निर्थक बोलणं थांबेल! दुसरा मापदंड असा.. गावी हापशानं पाणी उपसतात. कुणाला तरी हातपाय धुवायचे होते म्हणून मी हापसा चालवत होतो. लक्ष मात्र इकडं तिकडंच होतं. त्याचे हातपाय धुऊन झाले तरी मी हापसा चालवतच होतो.
हे पाहून श्रीगुरुजी एकदम म्हणाले, ‘‘गरजेपेक्षा पाणी वाया घालवलं तर पाणी शाप देतं!’’ जी गोष्ट पाण्याची तीच यच्चयावत सर्वच गोष्टींची. अनावश्यक अन्न खाणं वा टाकून देणं, गरजेपेक्षा जास्त कपडे विकत घेणं, गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह करणं.. अशा सवयी हळूहळू कमी होत सुटल्याच पाहिजेत. बोलण्याआधी जसं आपण हे बोललंच पाहिजे का, हा विचार केला पाहिजे तसा खाण्याआधी नेमकं किती खावं, हा विचार केला पाहिजे. कपडे वा वस्तू घेण्याआधी नेमक्या किती प्रमाणात त्या घेणं आवश्यक आहे, याचा विचार केला पाहिजे. यामुळे खाणं-पिणं, बोलणं, कपडालत्ता आणि वस्तूंचा संग्रह करणं या साऱ्यात जाणारा वेळ, पैसा आणि शारीरिक व मानसिक श्रम यांची बचत सुरू होईल.
–चैतन्य प्रेम