गेल्या भागातलं चिंतन वाचून अनेकांना वाटेल की, सतत तोलून मापून जगणं मुळात शक्य आहे का आणि असं जगणं म्हणजे रुक्षपणेच जगणं नाही का? तर साधनपथावर प्रारंभिक वाटचाल करणाऱ्यांसाठी या शंकेचा विचार करू. साधनपथावर येईपर्यंत आपण कसं जगत होतो? तर कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल परिस्थितीच्या द्वंद्वात झगडताना आपल्या मनातल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड करीत होतो. त्यातील अनेक इच्छा अवास्तवही होत्या. जगाचा कित्ता गिरवणाऱ्याही होत्या. अमक्याकडे अमुक गोष्ट आहे मग मलाही तशी गोष्ट घेता येऊन माझी प्रतिष्ठा टिकवली पाहिजे, या मानसिकतेतूनही अनेक इच्छांचे धुमारे फुटत होते. साधनपथावर आल्यावर या सवयी बदलण्याचा अभ्यास करता आला पाहिजे. याचा अर्थ रुक्षपणे जगा असा नाही बरं. अगदी उत्तम कपडे घ्या, उत्तम वस्तू घ्या, उत्तम अन्न सेवन करा.. पण ते सारं करताना आपला आवाका आणि आवश्यकता याचाही विचार करा. तसंच विलासात राहूनही आंतरिक निíलप्तततेवर जर किंचितही ओरखडा उमटत नसेल, तर विलासातही राहा! मुख्य म्हणजे जे माझ्याकडे आहे त्यावर माझा आनंद अवलंबून असता कामा नये आणि जे आहे ते गमावण्याची भीती ही काळजीचं कारण बनता कामा नये. जे आहे त्याचा आणि जे नाही त्याचा माझ्या आंतरिक समाधानावर परिणाम होता कामा नये. आता ही फार पुढची पायरी झाली. म्हणूनच तर सुरुवात आहे ती जे हवं आहे ते खरंच हवं असलं पाहिजे का, हा पूर्वविचार सातत्यानं करण्याची. इथं ‘हवं आहे,’ हा शब्द फार महत्त्वाचा! हा शब्द जे नाही त्यासाठीची ओढ दाखवतो. जे आहे किंवा जे वाटय़ाला आलं आहे ते आहेच. मग ती श्रीमंती का असेना. तिचा बाहेरून त्याग करायचा नाही. पण मी भले श्रीमंत असेन, पण अमक्याइतका श्रीमंत नाही.. तशी श्रीमंती हवी, अशी ओढ लागत असेल तर तिचा विचार केलाच पाहिजे. तेव्हा श्रीमंती आहे ना, तर ती अवश्य भोगा. योग्य मार्गानं तिच्यात वाढ झाली तरी तिचा स्वीकार करा. पण ही श्रीमंती भोगणारा जो ‘मी’ आहे तो नेमका कोण, या घरातच का जन्मलो, याच परिस्थितीत कोणत्या बळावर आहे, या गोष्टींचाही विचार सुरू करा! थोडक्यात वाटय़ाला जी परिस्थिती येईल ती स्वीकारा, ती चांगली करण्याचा प्रयत्नही करा, पण आंतरिक विचाराचं बीजही दुर्लक्षित करू नका. तर गेल्या भागात जो प्रश्न प्रथम उपस्थित झाला होता त्याकडे पुन्हा वळू. प्रश्न असा होता की, भक्तिमय जीवनाकडे अग्रेसर करणारी क्रिया कोणती, हे नेमकेपणानं कसं ओळखावं? त्या क्रियेसाठीचे काही प्रारंभिक मापदंड आपण पाहिले जे आपल्या मनाच्या ओढी अगदी सूक्ष्मपणे बदलतात. हा सूक्ष्म बदल प्रथम दृष्टिकोनात घडतो. दृष्टिकोन बदलला की विचार करण्याची तऱ्हा बदलते. विचार करण्याची रीत बदलली की अपेक्षा आणि इच्छांची धाटणी बदलते. ती बदलली की आपोआप जगण्याची रीतही बदलतेच! जगाची ओढ, जगासाठीची तळमळ ज्या प्रमाणात ओसरत जाईल त्या प्रमाणात अंतर्मुखता येईल. आत्मपरीक्षण आपोआप सुरू होईल. मग आपण भावनिकदृष्टय़ा कुठं नाहक गुंतत आहोत का, ते उमगेल. आपल्या वागण्या-बोलण्यातल्या चुका समजू लागतील. सावधानता वाढीस लागेल. पण या सर्व प्रक्रियेच्या जोडीला एक सहजी लक्षातही न येणारं संकट सोबत करू लागेल. ते संकट म्हणजे मनाचा हळवेपणा! मन सूक्ष्म होत जाईल. संवेदनक्षम, हळवं बनत जाईल. त्याचबरोबर जगाच्या आसक्तीचं अज्ञान मावळत असताना अध्यात्माविषयीचं विपरीत ज्ञान मनात पाय रोवू लागेल! ते नवं जग निर्माण करील आणि नव्या उमेदीनं त्या नव्या जगात सूक्ष्मपणे गुरफटायला लागेल. मनच ते! ते सहजासहजी थोडीच हार मानणार आहे! या पायरीवर समर्थ एक फार मोठं सूत्र सांगत आहेत.. तुटे वाद संवाद तो हितकारी!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा