समर्थ रामदास विरचित ‘श्रीमनाचे श्लोक’ अर्थात ‘मनोबोध’ आणि ‘दासबोध’ या दोन्ही बोधग्रंथांमध्ये एक मुख्य फरक आहे. पहिला बोधग्रंथ ‘मनाचे श्लोक’ हा साधकासाठी मार्गदर्शन करणारा आहे तर  ‘दासबोध’ हा दासासाठी आहे.. सद्गुरूच्या सेवकासाठी आहे! ज्या साधकाला समर्थ मनाचे श्लोक सांगत आहेत तो प्रारंभिक पातळीपासून वाटचाल सुरू केलेला साधक आहे. जगाच्या प्रभावातून तो अद्याप मुक्त झालेला नाही. त्याला या जगापासून अलिप्त करणारा बोधही समर्थ करीत आहेत. श्रवण, मनन आणि कीर्तनादि भक्तीच्या वाटेनं आणि सज्जनांच्या संगतीच्या योगानं ते सद्गुरू तत्त्वापर्यंत या साधकाचं आकलन वाढविणार आहेत. याउलट ‘दासबोध’ हा जगाच्या प्रभावापासून अलिप्त होत असलेल्या आणि दास्यभक्ती करीत असलेल्या दासाला समाजाकडे नव्या दृष्टीनं वळविणारा ग्रंथ आहे. तो दासाची परिपूर्ण जडणघडण करू पाहतो. म्हणूनच तर त्याच्यात माया, ब्रह्म, पुरुषप्रकृती यांचा मोठा तात्त्विक ऊहापोह आहे. त्याचबरोबर मोक्षलक्षण, सिद्धलक्षण यांची जशी चर्चा आहे तसंच महंत लक्षण आणि राजकारण निरूपणही आहे. थोडक्यात ज्ञानाच्या पातळीवर तो जसा दासाची वैचारिक जडणघडण करतो तसाच कर्मयोगाच्या अंगानं समष्टीच्या हितासाठीच्या कार्यात सहभागी होता येईल यासाठीची शिकवणही देतो. ‘मनाचे श्लोक’ केवळ साधक आणि त्याच्या मनाच्या जडणघडणीचा पाया पक्का करणारे आहेत. अखेर खऱ्या दास्यभक्तीची भव्य इमारत या पायावरच उभी राहणार आहे. आणि म्हणून ‘तुटे वाद संवाद तो हितकारी,’ या चरणाचा अर्थ जसा प्रचलित आहे तसा सामूहिक सौहार्द वाढविण्याचा सल्ला देत नाही. वाद तोडणारा संवाद हा हितकर आहे आणि त्यामुळे वाद मिटेल, असा संवादच साधत राहा, असा हा सल्ला नाही. तर ज्या जगात भावनिकदृष्टय़ा अडकायचेच नाही त्या जगाशी वादही नको अन् संवादही नको! जगाशी वाद घालत राहून आपली मानसिक, भावनिक व शारीरिक शक्तीच क्षीण होणार. अगदी त्याचप्रमाणे जगाशी संवाद साधत राहिलो तर जगानं त्या संवादामागील प्रेमाला प्रतिसाद द्यावा, अशीच अपेक्षा राहणार. त्या अपेक्षेची पूर्ती झाली नाही तर पुन्हा मानसिक, भावनिक आणि शारीरिक हानीच ओढवणार. तेव्हा जो साधक जगाच्या प्रभावापासून मोकळा होऊ पाहात आहे त्याच्यासाठी वाद जेवढा घातक आहे तेवढाच निर्थक संवादही घातकच आहे! कारण वादामागे आपला जसा स्वार्थ असतो तितकाच संवादामागेही स्वार्थच असतो! दुसऱ्याशी संवाद साधताना, माझं जे सांगणं आहे ते त्यानं स्वीकारावं, हाच आपला इरादा असतो. तो जे सांगतो तेही कदाचित मी स्वीकारीन, अशी आपली भूमिकाच नसते. त्यामुळे ना त्या वादानं साधकाचं काही हित साधतं ना त्या संवादानं काही हित साधतं. जगाशी असा स्वार्थप्रेरित वाद घालणं किंवा जगाशी स्वार्थप्रेरित संवाद साधणं हे दुधारी शस्त्र आहे. अशा वादाची धडपड असो की संवादाची तगमग असो, जग तुमच्या स्वार्थावर वारच करतं! हा स्वार्थ अंत:करणात भरून असतो, त्यामुळे हा वार अंत:करणावरच झाल्याचं आपल्याला वाटतं! हे वार पचवणं प्रारंभिक टप्प्यावरच्या साधकाच्या आवाक्यातलं नाही! त्यामुळे जगात मौन राखत वावरू नका. जगाशी अगदी भरभरून बोला, पण त्यात कणमात्रही स्वार्थ येऊ देऊ नका! आता अध्यात्माच्या मार्गावर आला आहात ना? मग जगण्याची रीत हळूहळू पालटावीच लागेल. त्याची सुरुवात आपल्या बोलण्याकडे नीट लक्ष देण्यापासून झाली पाहिजे. जगाशी आपण वाद घालत आहोत की संवाद साधण्यासाठी धडपडत आहोत, हे पाहावं लागेल. त्या वाद-संवादामागील हेतूंची छाननी करावी लागेल. हेतू जर स्वार्थी असले तर तो वाद आणि तो संवाद, दोन्हीही तोडावाच लागेल. त्यानंच खरं हित साधलं जाईल.

– चैतन्य प्रेम

Story img Loader