सज्जनाची संगत लाभल्यावर त्याच्याकडून परमस्थितीच्या प्राप्तीसाठी काय करावं, कोणती साधना करावी, जगण्याची तऱ्हा बदलावी का आणि कशी; हे काही न विचारता माणूस अनंत प्रश्न विचारत बसतो. ही सृष्टी मुळात निर्माणच का झाली? सृष्टी जर भगवंतानं निर्माण केली तर तिच्यात फक्त सुखच सुख का नाही? सृष्टीत एवढं दु:ख का? अमुक एक देवाचं एवढं करतो तरी त्याच्या आयुष्यात दु:खच का.. अशा अनंत प्रश्नांना धरून अनंत उपप्रश्न! एकानं असेच प्रश्न विचारायला सुरुवात केली की, सृष्टी मुळात उत्पन्नच का झाली? त्याला सांगितलं गेलं की, ‘‘बाबा रे! तू क्रिकेटच्या मदानावर हातात बॅट घेऊन उभा आहेस आणि समोरून फलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत येत आहे. त्या वेळी, मुळात क्रिकेटच का निर्माण झालं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करशील की जिद्दीनं खेळशील? अगदी त्याचप्रमाणे ही सृष्टी का, कधी, कशी निर्माण झाली आणि तिचा अंत का, कधी आणि कसा होईल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात वेळ दवडून काय लाभ? उलट आयुष्याला जिद्दीनं सामोरं जा! तुझं आताचं आयुष्य कालमर्यादित आहे.. आणखी चाळीसेक र्वष जगशीलही.. मग ते उरलेलं आयुष्य सार्थकी कसं लागेल, याचा विचार कर!’’ तेव्हा आपली स्थिती अशी आहे.
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना, ‘‘मी कस्तुरी वाटायला दुकान थाटलं, पण सारे िहगजिऱ्याचे गिऱ्हाईक!’’ तशी गत आहे.
सुख प्राप्त व्हावं म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलो आहे, असं एक साधक श्रीनिसर्गदत्त महाराज यांना म्हणाला. त्यावर ते उद्गारले की, ‘‘तुम्ही अजून माझ्याकडे आलेला नाहीत!’’ म्हणजे ज्या भूमिकेवर ते आरूढ आहेत, त्यांची जी धारणा आहे, ती आपली भूमिका नाही.. धारणा नाही.. आणि ती धारणा कशी होईल, हे जाणण्यातही आपल्याला खरा रस नाही. निसर्गदत्त महाराज म्हणत ना, आताची दु:खाची जी कारणं आहेत ती दूर झाली की मी सुखी होईन, एवढंच आपलं सुखाबद्दलचं आकलन आहे. दु:खाचा अभाव म्हणजे सुख, अशी आपली सुखाची व्याख्या आहे! जीवनात ‘दु:ख’ असूनही माणूस सुखी राहू शकतो, ही गोष्ट संतांनी जगून दाखवली! मग ज्या भावबळावर त्यांना अत्यंत प्रतिकूलतेतही स्थिरचित्त, निर्भय, निश्चिन्तपणे कार्यरत राहाता आलं ती भावस्थिती आपली कशानं होईल, हे जाणून घ्यावं, असं आपल्या मनातही येत नाही. उलट ते जे काही सांगू पाहातात ते आधी नीट ऐकूनही न घेता आपण तर्क लढवत प्रश्नावर प्रश्न विचारत जातो. नंतरच्या भेटीतही आपल्याला पुन्हा तेच प्रश्न आठवत असतात, पण त्यांची गेल्या खेपेस मिळालेली उत्तरं आठवत नसतात!
कारण आपलं प्रेम प्रश्नांवरच आहे. मिळालेल्या उत्तरांनुसार स्वत:मध्ये बदल घडविण्यावर नव्हे. म्हणून समर्थ सांगतात, ‘‘जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा!’’ परमतत्त्वाशी एकरूप झालेला सज्जनच आधी भेटणं कठीण. सज्जनतेचा बुरखा पांघरून स्वार्थात अडकलेले खूप ‘साक्षात्कारी’ पाहायला मिळतील. लोकेषणा (प्रसिद्धीची ओढ), वित्तेषणा (भौतिकाची ओढ), दारेषणा (कामनापूर्तीची ओढ); अशा कोणत्या ना कोणत्या ओढीमध्ये ते सापडले असतील; पण केवळ दुसऱ्याच्या हिताचीच तळमळ असलेला सज्जन सापडणंच खूप कठीण. त्याची भेट झाल्यावर जर आपण आपल्या मनाच्या ओढींची पूर्तता कशानं होईल, हेच विचारत बसलो तर काय उपयोग? ती होत नाही म्हणून त्याच्याशी वाद घालत बसलो, तर काय उपयोग? माझं खरं हित कशात आहे आणि काय केल्यानं, कसं जगल्यानं ते साधेल, हे न विचारता जे मी हिताचं मानत आहे ते कसं साधेल, हे विचारण्यात आणि त्याचाच हट्ट धरण्यात काय अर्थ आहे? तेव्हा सज्जनांकडे जायचं ते वादविवादासाठी नाही, तर सुखसंवादासाठीच.. आणि हा ‘सुखसंवाद’ही ‘सुखे’च करायचा आहे बरं का!