खरं सुख कोणतं आणि ते कसं मिळवावं, हे जाणून घेण्यासाठी सज्जनाशी प्रामाणिकपणे संवाद साधला आणि नंतर त्यानुसार अभ्यास सुरू केला तरच जीवनातलं अज्ञान हळूहळू जाणवू लागतं! सत्संगाचं खरं महत्त्व उमगू लागतं. अशा सज्जनांच्या सत्संगतीत जो असतो तोच खरा सुखी होतो.. हा असा सत्संग जो आहे तोच खऱ्या अर्थानं शोक आणि संतापाचं हरण करणारा आहे, निवारण करणारा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘‘जनीं तोचि तो शोकसंतापहारी!’’ जो जनांमध्ये आहे, जनांच्या सहवासात आहे तो सहवासच शोक आणि संतापाचं निवारण करणारा आहे. आपल्या मनात शोक का उत्पन्न होतो? संताप का उत्पन्न होतो? या दोन्ही स्थितींचा सूक्ष्म विचार केला की जाणवेल, आपल्याकडे जी गोष्ट असते, जी आपलीशी वाटते, जिच्याबद्दल मोह आणि आसक्ती असते ती दुरावली तर जो होतो तो शोक असतो! याउलट जी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते, पण जी मिळत नाही, उलट आपल्या मनाविरुद्ध जेव्हा काही घडतं त्यामुळे उत्पन्न होतो तो संताप असतो! थोडक्यात हवंसं वाटणारं गमावलं की शोक आणि हवंसं वाटणारं न मिळाल्यानं संताप उत्पन्न होतो. या दोन्ही स्थितींचा पाया ‘मी’ आणि ‘माझे’ हाच आहे. हा पायाच तकलादू आहे. त्यामुळे या तकलादू पायावर जे मिळतं तेही तकलादूच असतं. जे मिळवावंसं वाटतं त्याच्या प्राप्तीची इच्छाही भ्रम आणि मोहातूनच निर्माण झाली असते. सत्संगानं काय साधतं? तर आपल्या अंतरंगातला भ्रम, मोह आणि आसक्ती यांची जाणीव होते. भ्रम, मोह आणि आसक्ती नष्ट होत नाहीत, पण त्यांच्यामुळे होणारी मानसिक आणि भावनिक हानीही उमजू लागते. हा भ्रम कसा दूर व्हावा, मोह कसा दूर व्हावा, आसक्ती कशानं कमी होत नष्ट व्हावी, हे जाणून घेण्याची इच्छा बळावते. सत्संगात या गोष्टींना कसं सामोरं जावं, हे समजू लागतं. मोह आणि भ्रमापायी मी माझेपणानं ज्या ज्या व्यक्तींना कवटाळून जगत होतो त्या व्यक्तीही शेवटपर्यंत माझा आधार होऊ शकत नाहीत.. या जगातला जो-तो आपल्या स्वार्थपूर्तीसाठीच जगत असल्यानं प्रत्येकजण आपापल्या मनाच्या कलानं जगत आहे, आपापल्या मनातल्या स्वार्थप्रेरित इच्छांच्या पूर्तीसाठी झटत आहे.. मग माझ्या इच्छेच्या पूर्तीसाठी हे जग का खस्ता खाईल? तेव्हा जगानं माझ्या अनुकूल व्हावं, यासाठी आपली जी तगमग सुरू असते तिच्यातला फोलपणा या सत्संगामुळे कळतो. इथं पुन्हा एकवार स्पष्ट केलं पाहिजे की, हा सत्संग मात्र शुद्ध खरा असला पाहिजे! जो चिखलात स्वत: रूतत आहे त्याचा कितीही सहवास मी केला तरी चिखलातून सुखरूप कसं बाहेर पडता येतं, याचा उपाय त्याच्याकडून जाणून घेता येणार नाही. उलट त्याच्या सांगण्यानुसार मी जितकी धडपड करीन तितका मी त्याच्यासारखाच चिखलात अधिकाधिक रूतत जाईन! जो स्वत: दोरखंडानं बांधला गेला आहे तो मला सोडवू शकणार नाही. तेव्हा जो खऱ्या अर्थानं मुक्त आहे, म्हणजेच ज्याला कुणाकडूनही कसलीही अपेक्षा उरलेली नाही, तोच मला खऱ्या अर्थानं मुक्त कसं जगता येतं हे शिकवू शकतो. नव्हे त्याच्या जगण्यातूनच मला ते आपोआप नकळत शिकता येतं. अशा सज्जनाची संगत व्हावी, असं वाटत असेल तर आधी जगाचा संग सुटला पाहिजे. पुन्हा लक्षात घ्या. हा संग तुटणं आंतरिकच आहे. आपल्याला या जगातच राहायचे आहे, पण जगाला आपल्या आत राहू देऊ नका.. आपल्या हृदयावर म्हणजेच आपल्या भावनेवर, विचारावर, मनोधारणेवर या जगाला कब्जा करू देऊ नका. जगात अगदी आनंदात राहा, भौतिकदृष्टय़ा सर्वोत्तम होण्याचाही अवश्य प्रयत्न करा, सर्व कर्तव्यं पार पाडा, पण त्या जगात आसक्त होऊ नका, हेच सर्व संतांचं सांगणं असतं. हे साधलं तरच शोकसंताप कायमचा नष्ट होतो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

चैतन्य प्रेम