सज्जनांशी जो सत्संग साधायचा आहे तो नेमका कशासाठी, हे समर्थानी ‘मनोबोधा’च्या १०९व्या श्लोकात अगदी स्पष्टपणे सांगितलं. हा संग जो आहे तो जीवनातला समस्त शोक आणि समस्त संताप नष्ट करण्यासाठी आहे. अंतरंगातला भ्रम, मोह आणि आसक्ती नष्ट झाल्याशिवाय हे शक्य नाही. तेव्हा हा सत्संग अंत:करणात अगदी चिवटपणे रूतलेल्या भ्रम, मोह आणि आसक्तीचाच नाश करणारा आहे. त्यातूनच शोक आणि संताप लयाला जाऊ लागतो, असं समर्थ सांगतात. आता हे साधत का नाही? त्याच्या आड नेमकं येतं तरी काय, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ११०व्या श्लोकात सांगणार आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें।
विवेकें अहंभाव यातें जिणावें।
अहंतागुणें वाद नानाविकारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी।। ११०।।
प्रचलित अर्थ : जेथे वाद तुटतो तो संवाद किंवा सुखसंवाद आणि जेथे वाद वाढतच जातो तो वाद-विवाद. संवादात विवेक जागा असतो म्हणून अहंभाव नष्ट होतो आणि विवादात अहंभाव उसळून येतो. म्हणूनच क्रोध, मत्सर, द्वेष आदी विकारांची भूते तो नाचवतो. म्हणून हे मना, वाद खुंटवणाऱ्या आणि प्रेमाचे ऐक्य रुजविणाऱ्या अशा हितकर संवादातच तू रममाण हो.
आता मननार्थाकडे वळू. आपल्या वादामागे आणि संवादामागेही स्वार्थच असतो, हे आपण मागे पाहिलं. त्यामुळे ना आपल्या वादाला काही अर्थ असतो, ना आपल्या संवादाला काही अर्थ असतो. त्या वादात आणि संवादातही जगाचीच ओढ असते. जगानं आपंच ऐकावं, ही सुप्त इच्छा असते. जेव्हा जगाची ओढच ओसरू लागते तेव्हा जगाशी वादही घालावासा वाटत नाही की निर्थक संवादातही स्वारस्य उरत नाही. पण अशाच वेळी मोठा धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. जगाला तुच्छ लेखण्याच्या भरात मनात अहंकार उफाळून येऊ शकतो! मग आपण मानतो तेच खरं, आपण करतो ती साधनाच खरी, आपलाच मार्ग खरा.. असा दुराग्रह उत्पन्न होतो आणि त्यामुळे साधक संकुचितच राहातो. नव्हे, एकवेळ राजस आणि तामस अहंकार परवडला कारण तो नष्ट तरी होतो, पण सात्त्विक अहंकार जाता जात नाही! मागे एकदा सांगितल्याप्रमाणे, सर्वसमावेशकता हे सनातन संस्कृतीचं प्रमुख वैशिष्टय़ आहे. इथं नास्तिकाच्या मताचाही स्वीकार होता, चार्वाकांच्या परंपरेलाही स्थान होतं. पण आपण जितकं प्रगत होत आहोत तितका संकुचितपणा वाढत चालला आहे. ‘आम्ही म्हणतो तेच मत खरं, आम्ही सांगतो तोच धर्म खरा,’ ही उन्मादी वृत्ती वाढत चालली आहे. या सर्वाचं मूळ कशात आहे? तर अहंकारात. जे आम्ही मानतो तेच खरं, या अहंकारजन्य वृत्तीत. समर्थ स्फुट ओव्यांत म्हणतात, ‘‘भिन्न उपासना भिन्न संप्रदाव। येकमेकां सर्व निंदिताती।।’’ उपासना भेदावरून, संप्रदाय भेदावरून एकमेकांची निंदा सुरू आहे. ‘‘पंडिता पंडिता वेवाद लागला। पुराणिकां जाला कळ्हो थोर।।’’ पंडितांमध्ये, विद्वानांमध्ये, पुराणाचा आधार घेणाऱ्यांमध्ये कलह सुरू आहे. जो तो ज्ञान सांगत आहे आणि आपण जे सांगत आहोत तेच ज्ञान आहे, असा दावा करीत आहे, पण असमाधान मावळणं, हे जे ज्ञानाचं लक्षण आहे ते कुणातच नाही! हे सारं होतंय ते एका अभिमानामुळे, अहंकारामुळे. त्यातून परस्परांबद्दल मत्सर उत्पन्न होतो आणि वाढत जातो, मग वास्तविक सत्य जाणण्यात आणि जीवनात ते उतरवण्यात कुणाला रस आहे? समर्थ म्हणतात, ‘‘ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं। देवा तुझी भेटी केविं घडे।।’’ अहंकारामुळे सर्व साधनेवर पाणी पडण्याचा धोका असतो म्हणून या अहंभावाकडे लक्ष दिलं पाहिजे.
–चैतन्य प्रेम