सज्जनांच्या संगतीनं जगाचा प्रभाव ओसरू लागला, पण त्यामुळे जग तुच्छ वाटू लागलं आणि आपण श्रेष्ठ वाटू लागलो! या स्थितीनं जो सात्त्विक अहंकार अंत:करणात रुजला त्यामुळे साधनेत खरा मोठा धोका उत्पन्न झाला. तरीही त्या अहंप्रभावामुळे या धोक्याची जाणीवही झाली नाही, ही स्थिती आपल्याही वाटय़ाला येऊ शकते, अशी सावधगिरीची सूचना समर्थ देत आहेत. समर्थानी ‘दासबोधा’च्या नवव्या दशकातील दहाव्या समासात एक फार मनोज्ञ रूपक वापरलं आहे. समर्थ म्हणतात, ‘‘देउळामध्यें जगन्नायेक। आणी देउळावरी बैसला काक। परी तो देवाहून अधिक। म्हणों नये कीं।।’’ देवळात जगन्नायक आहे. म्हणजेच या चराचराचा जो नायक आहे, सूत्रधार आहे, तो आहे. आणि त्या देवळावरच.. देवळाच्या कळसावरच कावळा बसला आहे. तर विश्वनियंत्याच्या मंदिरावर बसलेला कावळा हा त्याच्यापेक्षाही किती समर्थ असेल, असं कोणी म्हणत नाही. त्याला देवाहून अधिक मान कुणी देत नाही. पूर्वी लोक ‘कळस दर्शन’ही घ्यायचे. म्हणजे देवळापर्यंत जाता येत नसेल तर कळसाचं दर्शन घ्यायचं. त्यानं देवदर्शनाचंच पुण्य मिळतं, ही श्रद्धा होती. म्हणजेच कळसाचं दर्शन घेताना भाव देवदर्शनाचाच असतो ना? त्या कळसावर एखादा कावळा बसला असेल, तर त्याचं दर्शन घेत असल्याचा भाव असतो का? तर हे रूपक सांगतं की खरं महत्त्व त्या देवालाच आहे, त्या देवाच्या दर्शनालाच आहे, त्या देवाला जाणण्यालाच आहे! आता हे रूपक कसं आहे पहा! आपला हा देह आणि आपलं अंत:करण हेच देऊळ आहे! त्या देवळात सर्वात वर आहे ते डोकं.. मंदिराचा कळस जणू! या डोक्यात जी बुद्धी आहे ती तर्कदुष्ट झाली म्हणजेच वेगळ्या अर्थानं काकदृष्टी झाली! प्रत्येक गोष्टीत ती अविश्वासानंच चोच मारू लागली आणि ‘देवा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवू लागली, पण म्हणून काय या ‘काकबुद्धी’ला देवाहून अधिक मान आहे का? मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर काही साधलं नसतं.. मी आहे म्हणून, मी होतो म्हणून.. हा या काकबुद्धीचा तोरा आहे. पण जो श्वासोच्छ्वास सुरू आहे तो काय माझ्या कर्तृत्वावर टिकून आहे का? मी श्वास घेऊ शकतो म्हणून तर हा देह टिकून आहे. म्हणून तर मी या जगात वावरू शकत आहे. मग जे काही ‘कर्तृत्व’ करतोय ते श्वास घेण्याच्या त्या क्षमतेवरच तर अवलंबून आहे ना? तो श्वासच थांबला तर? तेव्हा जगाशी वाद नको आणि संवादही नको, ही धारणा झाली असताना सज्जनांशी वाद घालण्याची दुर्बुद्धी उपजली तर काय उपयोग? समर्थ म्हणतात विवेकानं या अहंकाराला नष्ट करावं. कारण या अहंकारामुळे त्रिगुणांच्या पकडीत साधक नव्या जोमानं अडकतो. त्यातून काम, क्रोध, मत्सर, द्वेष असे अनेक विकार उफाळून येतात आणि त्यातून वाद वाढत जातात. मग ‘मीपणाचंच देऊळ’ उभं राहातं आणि खऱ्या परमतत्त्वाकडे दुर्लक्षच होतं. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, ‘‘कोण कोणासि सांगावें। सर्वही भ्रांत जाहले। भ्रांत देवाळयासाठीं। देवची सांडिती जनीं।।’’ भ्रामक अहंकारापायी परमसत्यापासून साधक दुरावत जातो. अहंकाराचा हा विळखा इतका घातक आहे. तेव्हा हा अहंकारच ओसरू लागला की खरं हित काय आहे, हे जाणवू लागेल. त्या हितासाठी प्रयत्न करणं साधलं जाऊ लागेल. अहंकार आहे म्हणूनच ना वादाची आणि संवादाची हौस आहे? आपल्याला दुसऱ्यापेक्षा अधिक काही कळतं, याच अहंभावनेतूनच जे ऐकतो त्यावर प्रत्युत्तर द्यायला किंवा प्रतिवाद करायला माणूस सरसावतो ना? अहंकारानं मनातलं हे सततचं ठुसठुसणं थांबलं की खरी साधना आणि खरा अभ्यास सुरू होईल. आता समर्थ पुन्हा सावध करतात आणि सांगतात की, बाबा रे जे काही करायचं आहे ते केवळ आत्महितासाठी हे कदापि विसरू नकोस!