आत्महिताबाबत भान आलं तर जीवनाकडे, जगण्याच्या रीतीकडे लक्ष जाईल. मग आजवर किती अनमोल असं जीवन आपण व्यर्थ गमावलं, हे उमगेल. उरलेल्या आयुष्यातील काळाचं मोलही जाणवेल. मग जीवन अधिक सार्थकी लागेल, असं समर्थ सूचित करतात. जर हे झालं नाही तर काय होईल, हे ते ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ११२व्या श्लोकात सांगत आहेत. प्रथम हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला।
परी वाद-वेवाद तैसाचि ठेला।
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी।। ११२।।
प्रचलित अर्थ : जगाच्या आरंभापासून सांगणारे आणि ऐकणारे कोटय़वधी होऊन गेले आहेत, पण वादविवाद काही मिटले नाहीत. दंभाच्या जोरावर वादाचं वादळ निर्माण होतं आणि त्यानं केवळ संशय आणि दंभच वाढतो. म्हणून हे मना, या वादांमागे न लागता सत्संगातील संवादातच रममाण हो आणि खरं हीत साधून घे.
आता मननार्थाकडे वळू. समर्थ म्हणतात, ‘‘जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला!’’ जनीं म्हणजे संतजनांमध्ये. सज्जन सांगत राहिले आणि मी ऐकत राहिलो. यात अवघा जन्म गेला, पण माझ्या मनातली वादाची खुमखुमी कायमच राहिली, तर मी काय मिळवलं? ही खुमखुमी कायम राहिली कारण मी खऱ्या अर्थानं ऐकलंच नाही! म्हणून भिकाऱ्यानं जशी दारोदार भीक मागावी त्याप्रमाणे मी संत-सज्जनांच्या नुसत्या गाठीभेटी घेत राहिलो, त्यांना प्रश्नं विचारत राहिलो, पण ऐकलं कुणाचंच नाही! मग काय उपयोग? अनंत रूपात संतसज्जन या धरतीवर अवतरले, पण ते हयात असताना तरी त्यांचं कुणी नीटसं ऐकलं का? देहमर्यादेनुसार त्यांनीही जीवनाचा निरोप घेतला आणि नुसतं ऐकून ऐकून माझाही जन्म गेला, तर मग काय लाभ झाला? श्रवणसुख तेवढं मला मिळालं.. मीराबाईंचं एक भजन मागे सांगितलं होतं ना? त्या म्हणतात, ‘‘नाही ऐसो जनम बारंबार। का जाणुं कछु पुण्य प्रगटे। भा माणुसा अवतार। नाही ऐसो जनम बारंबार!’’ असा जन्म वारंवार लाभत नाही बरं. कोण जाणे मी असं काय पुण्य केलं होतं की मला जेव्हा मनुष्याचा जन्म लाभला होता तेव्हाच सद्गुरूही माणसाच्याच रूपात अवतरले होते. असा जन्म वारंवार येत नाही! पुढे मीराबाई म्हणतात की, फांदीवरून पान गळून पडलं तर कितीही प्रयत्न केले तरी ते फांदीला पुन्हा लागत नाही. तसं हे जीवन आहे. एकदा ते संपलं की कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा तसंच जगता येत नाही. तेव्हा जगण्याची जी अपूर्व संधी लाभली आहे, ती वाया दवडू नका. या सृष्टीत अत्यंत विलक्षण असलेला सर्व क्षमतायुक्त असा जो मानवी देह लाभला आहे त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. त्याच्या क्षमतांचा खरा वापर हा व्यापक आणि परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठी आहे, हे विसरू नका. हे साधलं नाही तर मग कितीही सत्संग का लाभेना, काही उपयोग नाही. खिरीच्या वाडग्यात कित्येक तास पडलेल्या चमच्याला का खिरीची गोडी कळते? तसं अनेक तास सत्संगात पडूनही ग्रहण काहीच करता येत नसेल आणि आपला हेका सुटत नसेल, तर ते सांगणं आणि ऐकणं व्यर्थच आहे. त्यानं वादविवाद तर संपणार नाहीच, पण मनात संशय वाढेल आणि दंभाचीही चटक लागेल. कळलं नसूनही कळल्यासारखं दाखवणं, हा दंभ आहे. त्या दंभाच्या जोरावरच, जे कळत नाही त्यावरही वाद घालण्याची हौस आहे. अशा वादानं काय साधणार आहे? हा स्वार्थप्रेरित वाद आणि स्वार्थप्रेरित संवाद तुटेल तेव्हाच खरं हित साधलं जाईल.
–चैतन्य प्रेम