संतसंग लाभूनही त्या सत्संगाचं खरं मोल उमगलं नाही आणि आपल्याच तोकडय़ा मताचं घोडं दामटवत राहाण्याची वृत्ती राहिली तर खरं हित साधलं जात नाही. ऐकलेल्या, वाचलेल्या ‘ज्ञाना’च्या तोऱ्यावर सज्जनांचं अनुभवसिद्ध असं जे ज्ञान आहे त्याची उपेक्षा केली तर खरं हित साधलं जात नाही. उलट अहंकारामुळे सर्वात मोठा आत्मघात होतो, याकडे समर्थ आता ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ११३व्या श्लोकात साधकाचं लक्ष वेधत आहेत. हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
जनीं हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले।
तयाहूनि व्युत्पन्न तो कोण आहे।
- मना सर्व जाणीव सांडूनि राहें।। ११३।।
प्रचलित अर्थ : अहंकारामुळे आजपर्यंत अनेक शब्दपंडितांनी स्वहिताकडे दुर्लक्ष केले. स्वहितानुसार आचरण असावं, याकडे दुर्लक्ष केले. उलट वादविवादाचाच मार्ग अवलंबला. त्यामुळे मृत्यूनंतरही ते ब्रह्मराक्षसच झाले. प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा अधिक विद्वान कोण सापडेल? पण तरी त्या ज्ञानाचा काही उपयोग झाला का, हे लक्षात घेऊन हे मना, अहंजाणीव सोडून दे.
आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात एक रूपक समर्थानी वापरलं आहे आणि ते आहे ‘ब्रह्मराक्षस’! जो ब्राह्मण मृत्यूनंतर अतृप्त इच्छांमुळे पिशाच्चयोनीत जातो तो ब्रह्मराक्षस होतो, अशी समर्थकालीन श्रद्धा होती. आता ब्रह्म आणि राक्षस यांचा योगच किती विलक्षण आहे! ब्रह्म हे निर्लिप्त, सार्वत्रिक, निश्चळ असतं. त्याला जोडलेला ‘राक्षस’ हा शब्द तमोगुणाचा अतिरेक, अहंकाराचा अतिरेक दर्शवतो. म्हणजे सूक्ष्म ज्ञान ग्रहण करू शकेल, अशी बुद्धी लाभली असतानाही केवळ अहंकारामुळे सर्व पांडित्य फोल ठरतं. सूक्ष्म ज्ञान ग्रहण करण्याऐवजी बुद्धी अहंभावानं प्रेरित होऊन आपलीच बाजू मांडण्यात हिरिरीनं रमते. या अहंकारामुळे त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही आणि जीवन संपलं तरी अहंभावानं उफाळलेल्या इच्छा अतृप्त राहिल्यानं गतीही लाभत नाही. समर्थाच्या चरित्रात वामन पंडितांची गोष्ट आहे. एका झाडावर दोन ब्रह्मराक्षस राहात होते आणि तिसरा ब्रह्मराक्षस त्या झाडावर वस्तीसाठी आला तेव्हा त्याला दोघांनी विरोध केला. ही जागा वामन पंडितांसाठी राखीव आहे. मृत्यूनंतर तेही ब्रह्मराक्षस होणार आहेत. तेव्हा त्यांची आधी परवानगी घे आणि मगच इथे राहा, असं त्या दोघांनी याला सांगितलं. मग तो वामन पंडितांकडे गेला तेव्हा त्यांना हे ऐकून धक्काच बसला. ‘मी ब्रह्मराक्षस होईन, हे कशावरून?’ असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला की, ‘आम्ही पिशाच्च असलो तरी त्रिकालज्ञानी असतो. अहंकारामुळे तुम्हीही माझ्याप्रमाणेच ब्रह्मराक्षस होणार आहात.’ हे टाळण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पंडितांनी विचारला तेव्हा तो म्हणाला की, ‘सत्संगती हाच एकमेव उपाय आहे. त्यानंच अहंकाराचा विलय होईल!’ तेव्हा पंडित समर्थाना शरण गेले आणि त्यांनी खरं स्वहित साधलं. या कथेचीही पाश्र्वभूमी या श्लोकाला आहे. तेव्हा सूक्ष्मज्ञानाच्या दाण्यापेक्षा शब्दाच्याच टरफलात ज्यांना गोडी वाटते त्यांना खरं ज्ञान कसं लाभणार? खरं ज्ञान त्यांना कसं पचणार? म्हणून समर्थ सांगतात की, वामन पंडिताइतका व्युत्पन्न पंडित कोणी झाला नाही. पण केवळ एका अहंकारामुळे त्यानं आधी आपल्या खऱ्या आत्महिताचा घात केला होता. या अहंकाराचा शेवट हा अत्यंत क्लेशकारक असतो म्हणून तो सुटलाच पाहिजे. सत्संग हा त्यासाठीचा एकमेव उपाय आहे आणि असा सत्संग लाभला असतानाही अहंभाव सुटत नसेल, तर काय उपयोग आहे? तेव्हा सत्संग लाभला आहे तर नि:संग होण्याची प्रक्रिया सुरू झालीच पाहिजे.
–चैतन्य प्रेम