अध्यात्म जगण्यात उतरविण्याच्या अभ्यासास लागण्याऐवजी केवळ आध्यात्मिक गप्पा ठोकण्यात रमणं म्हणजे तोंडाची वाफ वाया दवडणं आहे. त्यानं गर्व तेवढा अंत:करणात साचत राहील आणि त्यामुळे भावप्रवाहाचा मार्ग अवरोधित होईल. हे लक्षात घेऊन समर्थ आता अध्यात्म पंथावर पहिली पावलं टाकत असलेल्या साधकाला मुख्य गाभ्याकडे वळवू पाहात आहेत. या अनुषंगानं ‘मनोबोधा’च्या ११४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत एक मोठं सूत्र समर्थ मांडत आहेत. हे सूत्र प्रकट करणारे हे चरण म्हणजे, ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। विचारें तुझा तूंचि शोधून पाहे।।’ स्वप्रयत्नानं, स्वत:च धडपड करून जे काही ‘ज्ञान’ मिळवलं आहेस, ऐकीव वा पढिक माहितीच्या आधारे मनाला आवडणारी अशी जी काही ‘साधना’ सुरू केली आहेस, त्या मर्यादेतच अडकून राहू नकोस. ‘मी’ आणि ‘माझे’ भ्रामक आहे, असं तोंडानं नुसतं म्हणशील, पण त्या भ्रमातून स्वबळावर सुटू काही शकणार नाहीस. दलदलीत रुतत चाललेल्या माणसानं कोणाच्याही मदतीशिवाय आपलीच ताकद लावून त्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर तो आणखीनच रुतत जाईल. बरं, ज्याची मदत घ्यायची तो स्वत:च दलदलीत रुतून असेल, तरी काही उपयोग नाही. अर्थात ढोंगी, बेगडी गुरू लाभूनही काही उपयोग नाही. माझ्या सद्गुरूंचं एक मोठं मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, ‘जब उपरवाला नीचे आता हैं, तभी नीचेवाले उपर जा सकते हैं!’ म्हणजे काय? तर ज्याची चित्तवृत्ती या संकुचित जगापासून वर आहे, त्या परम तत्त्वाशी जो सदोदित एकरूप आहे, त्याचा संग मिळाला तरच या संकुचित, भ्रामक ‘मी’ आणि ‘माझे’च्या डबक्यात अगदी तळाशी रुतलेल्या मला त्या परम तत्त्वापर्यंत पोहोचता येईल, अन्यथा नाही. जो डबक्यातच रुतून आहे, म्हणजेच जो स्वत: ‘मी’ आणि ‘माझे’च्या पसाऱ्यात अडकला आहे असा गुरूही मला सोडवू शकत नाही. त्याला लोकमान्यतेची, राजमान्यतेचीच लालसा असेल, आश्रमांचा पसारा वाढविण्याचीच ओढ असेल, तर माझ्यातली आसक्ती तो काय कमी करणार! बरं, ‘बीचवाला भी नीचे आ जाय, तो भी नीचेवाले ऊपर नहीं पहुच सकते!’ म्हणजे थोडाफार अनासक्त भेटूनही उपयोग नाही! त्याला जे अर्धमरुध साधलं आहे तिथपर्यंतच तो मला नेऊ शकणार. तेव्हा समर्थ सांगतात, अंतरंगातला भ्रम, मोह, आसक्ती जोवर कायम आहे तोवर निरासक्त झाल्याच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी क्रियाच केली पाहिजे. कृतीच केली पाहिजे (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!). आता ही क्रिया किंवा कृती नेमकी कोणती? तर, ‘विचारें तुझा तूंचि शोधून पाहे!’ भ्रामक ‘मी’चा जर विलय व्हायला हवा असेल तर शाश्वत ‘तू’चा शोध घेतला पाहिजे! हा शोध तुझा तुलाच सुरू करावा लागेल. त्यासाठीचं पहिलं साधन आहे, ‘विचार’! विचाराचं बोट पकडून तुझा जो ‘तू’ आहे, त्याचा शोध सुरू कर!! हा ‘तू’ म्हणजे खरा सद्गुरूच आहे.. आणि अध्यात्मात सद्गुरूशिवाय काहीच साध्य नाही, असं सर्वच संतही उच्चरवानं सांगतात. त्यामुळे या मार्गावर ज्याला खरी वाटचाल सुरू करायची आहे त्याच्याही मनात खरा सद्गुरू लाभावा, हीच ओढ असते. समर्थ या शोधाची आस मनात लागावी यासाठी दोन पातळीवर शोध घ्यायला सांगत आहेत. एकतर जो खरा ‘तू’ आहे, त्या सद्गुरूचा शोध घ्यायचा आहेच पण त्यासाठी आपण मुळात कसे आहोत, याचा शोधही आपला आपणच विचारपूर्वक घ्यायचा आहे. खऱ्या ‘मी’चा शोध म्हणजे चित्त, मन, बुद्धीत रुतलेल्या आताच्या ‘मी’च्या अस्सलपणाचा शोध. ‘मी’ आणि ‘तू’ जर अभिन्न असू, मी जर त्या परमात्म्याचाच अंश असेन तर या दोहोंत साम्य का नाही, या प्रश्नाच्या उत्तराचा हा शोध आहे.