‘भोग’ जसं खरं समाधान देत नाही, तसाच ‘त्याग’ही खरं समाधान देत नाही. कारण आपला त्याग हा एकप्रकारे सुखभोगच असतो! ‘मी त्यागी’ ही अहंपोषक भावना त्यातून उत्पन्न होते आणि तिचा काही त्याग आपल्याला साधत नाही. त्याचबरोबर त्यागाचा पायाही अनेकदा अविचारीच असतो. एखाद्या गोष्टीचा त्याग आपण कशासाठी करीत आहोत किंवा केला पाहिजे किंवा केला पाहिजे का, याचं स्पष्ट आकलन त्या ‘त्यागा’मागे नसतं. देवासाठी म्हणून काही दिवसांचा अन्नत्याग केला जातो आणि त्या उपवासाची सांगता मोठा गाजावाजा करीत केली जाते. मग त्या त्यागाला काय अर्थ उरला? देवासाठी म्हणून कुणी घरादाराचा त्याग करतो, पण जंगलात जाऊनही जर मनातून घरदार जात नसेल, तर कशाचा त्याग झाला? एखादा प्रपंचाचा त्याग करतो, पण मग जागोजाग आश्रम स्थापून नव्या प्रपंचात अडकतो, मग त्या प्रपंचाचा त्याग झालाच कुठे? तेव्हा असा त्यागही खरं समाधान देत नाही, कारण खरा त्याग कोणता, हे केवळ खरा सद्गुरूच शिकवतो. खरा त्याग हा आंतरिकच असतो. निव्वळ एखाद्या वस्तूचा त्याग करणं म्हणजे खरा त्याग नव्हे. बाहेरून असा त्याग दाखवता येईलही, पण मनातून जर त्या वस्तूचं प्रेम गेलं नसेल, त्या वस्तूसाठी मनाचं तळमळणं संपत नसेल, तर मग त्या त्यागाला काय अर्थ उरला? तेव्हा एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी ती नकोशी वाटणं किंवा प्राप्त न झालेली गोष्ट हवीशी वाटणं, या दोन्ही गोष्टी खऱ्या वैराग्याचं लक्षण नाहीत. अर्थात बाह्य़ वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर मन अवलंबून असेल, तर त्या आधारांच्या अभावी ते असमाधानीच होणार. त्यामुळे खरा आंतरिक आधार कोणता आणि तो सदैव कसा लाभत असतो, हे जोवर कळत नाही तोवर खरं समाधानही होऊ शकत नाही. तेव्हा समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘ नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें। समाधान कांहीं नव्हे तानमानें। नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें। ” समाधान ना स्थूल ज्ञानानं होतं, ना सूक्ष्म तत्त्वज्ञानानं होतं, ना ते तानमानानं, अनुमानानं होतं, ना ते योगयागानं होतं, ना ते भोगानं होतं, ना ते त्यागानं होतं! मग समाधान नेमकं कशानं होतं? तर समर्थ सांगतात, ‘‘समाधान तें सज्जनाचेनि योगें।।’’ समाधान हे केवळ सज्जनाच्या योगानं, सज्जनाच्या सहवासानं, सज्जनाच्या संगतीनंच प्राप्त होऊ शकतं. आता सज्जनाचा हा योग म्हणजे ज्या मानसिक, वैचारिक, भावनिक पातळीवर हा सज्जन वावरत आहे, ज्या अंतर्निष्ठ साधनेत तो सदैव सहजतेनं बुडाला आहे ती पातळी गाठण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू होणं आणि तशी अंतर्निष्ठ साधना आपल्याला साधावी, याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होणं! असे प्रयत्न, असा अभ्यास सुरू झाला,,, म्हणजेच खरा संतसंग साधू लागला की, आध्यात्मिक ज्ञानाचं जे सार आहे, मूळ सूत्र आहे त्याची खूण पटू लागते. आजवर जे केवळ शाब्दिकच वाटत होतं, ते अनुभवाचा विषय होऊ लागतं. ‘मनोबोधा’च्या पुढील श्लोकात समर्थ सांगतात :
४९२. अंतरीची खूण
‘भोग’ जसं खरं समाधान देत नाही, तसाच ‘त्याग’ही खरं समाधान देत नाही.
Written by चैतन्य प्रेम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-12-2017 at 04:44 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy