मीपणाच्या अहंभावाने देहबुद्धीच वाढते आणि मग या देहबुद्धीच्या आवाक्यात नसलेलं जे शुद्ध ज्ञान आहे त्यापासून माणूस वंचित राहतो. समर्थ रामदास सांगतात की, एकदा का देहबुद्धीला जे रूचतं तेच प्राप्त करीत जगण्याचा निश्चय पक्का झाला की देहातीत असं हित दुरावतं. त्यामुळे या देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली पाहिजे. त्यासाठी सदैव सज्जनाच्या संगतीची कास धरली पाहिजे. (देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला। देहातीत तें हीत सांडीत गेला। देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी। सदा संगती सज्जनाची धरावी।। १६३।।). या मनाला जो जो विषय भावतो त्यापासून मनाला सोडवावं. आता इथं विषय म्हणजे कामविषय नाही. तर ज्या ज्या गोष्टींच्या चिंतनात, मननात, ओढीत मन गुंततं तो विषय अभिप्रेत आहे. कारण बहुतांशवेळा हा विषय मोहभ्रम वाढविणाराच असतो. ‘मी देह’ या भावनेनं वावरणारा साधक ‘मी ब्रह्म’ अशा दुसऱ्या टोकाच्या अहंभावात स्थित होतो. या दोन्ही कल्पना सारून गुणातीत असा देव कोणता, याचा विचार सुरू करावा. त्याची ओळख होण्यासाठी सज्जनाची संगती धरावी. (मनें कल्पिला वीषयो सोडवावा। मनें देव निर्गूण तो वोळखावा। मनें कल्पितां कल्पना ते सरावी। सदा संगती सज्जनाची धरावी।। १६४।।). हा देहच मी, या भावात जगून या देहाशी संबंधित जे जे काही आहे ते ते माझं होतं आणि या मी आणि माझेच्या चिंतनातच जीव अडकतो. त्यामुळे लोभ आणि मोहच बळावतो. त्यामुळे हरीचं चिंतन करून मुक्ती हेच ध्येय अंगी बाणवावं. जन्मोजन्माची चिंता पाठीस लावणारी जी भ्रांती आहे ती बळपूर्वक दूर करण्याचा अभ्यास सुरू करावा. मग त्या जन्मचिंतेचं हरण होईल. त्यासाठी सज्जनाची संगती असावी. (देहादीक प्रपंच हा चिंतियेला। परी अंतरीं लोभ निश्चिंत ठेला। हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी। सदा संगती सज्जनाची धरावी।। १६५।। अहंकार विस्तारला या देहाचा। स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा। बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी। सदा संगती सज्जनाची धरावी।। १६६।। ). अशाश्वतात अडकलेल्या मनाला शाश्वताच्या प्राप्तीची ओढ लागावी. तोच निश्चय व्हावा. त्यासाठी शाश्वताबाबत जो संदेह आहे तो विसरावा. मनात आणू नये. प्रत्येक क्षण सार्थकी लागेल, असा प्रयत्न करावा. त्यासाठी सज्जनाच्या संगतीशिवाय पर्याय नाही. (बरा निश्चयो शाश्वताचा करावा। म्हणे दास संदेह तो वीसरावा। घडीनें घडी सार्थकाची करावी। सदा संगती सज्जनाची धरावी।। १६७।।). आता या सज्जनाच्या संगतीतून खरा साधायचा आहे तो सद्गुरूसंगच. त्या सद्गुरूचं स्वरूपवर्णन आता समर्थ सुरू करीत आहेत. समर्थ सांगतात : करी वृत्ति जो संत तो संत जाणा। दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा। उपाधी देहेबुद्धितें वाढवीते। परी सज्जना केवि बाधूं शके ते ।।१६८।। इथं सद्गुरूंना संत म्हटलं आहे. त्याची पहिली ओळख म्हणजे तो साधकाची वृत्ती घडवतो! त्याच्या नुसत्या सहवासातही मनात शाश्वताची ओढ निर्माण होते. आपल्या वृत्तीतील दोषांची जाण निर्माण होते. या सद्गुरूकडे अशाच माणसांची गर्दी असते ज्यांना अजून धड माणूस म्हणूनही घडता आलेले नाही. विकार, वासनांमध्ये ते अजूनही रूतून आहेत. तरीही त्यांना घडविताना त्या सद्गुरूला दुराशा स्पर्श करू शकत नाही. तो कधीही दैन्यवाणा होत नाही. सामान्य माणसाची प्रत्येक उपाधी ही देहबुद्धीशीच जोडली असते. उपाधी म्हणजे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पातळीनुसारची त्याची ओळख. खरा सद्गुरू मात्र कोणत्याही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पातळीवरचा असो, त्याचा आंतरिक भाव, त्याचं शिष्याप्रतीचं ध्येय आणि त्याच्यासाठीचं त्याचं कार्य यात तसूभरही फरक पडत नाही. अर्थात त्या उपाधीची त्याला बाधा होत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा