समर्थ रामदास १६९व्या श्लोकात म्हणतात, ‘‘नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकारविस्तार हा नीरसावा।” हा सद्गुरू अनंत आहे. त्याची खूण संतांना पुसावी. अर्थात सत्संगतीत सद्गुरूविषयी जाणून घेत जावं. हा सद्गुरू म्हणजेच परमतत्त्व जसं व्यापक आहे, अनंत आहे तसाच या देहाच्या आधारावर पोसला जाणारा अहंकारही अनंतच आहे! त्या अहंभावालाही अंत नाही. अहंकाराचा हा विस्तार संत संगतीनंच निरसावा. मग या संतांकडून जो बोध होतो, त्या सद्गुरूच्या.. त्या परमात्म्याच्या लीलांचं जे श्रवण होतं त्याचंच चिंतन, मनन आणि स्मरण करीत जावं. समर्थ सांगतात, ‘‘गुणेंवीण निर्गूण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठवो नाठवावा।। १६९।।’’ म्हणजेच गुणप्राधान्यानुसार जो आपला स्वभाव आहे तो बाजूला ठेवून त्या बोधाचं, त्या लीलांचं मनन करावं आणि मीपणाचं जे सततचं स्मरण आहे ते विसरावं. त्या सद्गुरूंचा जो बोध संतमुखातून ऐकला आहे त्यायोगे देहबुद्धी सोडण्याचा अभ्यास करावा. परमतत्त्वाचं आकलन हे विवेकाशिवाय होत नाही. त्यासाठी विवेक अंगी बाणवण्याचा अभ्यास झाला पाहिजे. समर्थ १७०व्या श्लोकात म्हणतात, ‘‘देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी। विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी।’’ या श्लोकाचे अखेरचे दोन चरण अतिशय अर्थगर्भ आहेत. त्यात समर्थ सांगतात, ‘‘तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें। म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें।।’’ आपली वृत्ती तदाकार नाही. तद आकार म्हणजे त्या परमतत्त्वाला अनुरूप नाही. मग जो त्या परमतत्त्वाला अनुरूप आहे, त्याच्याशी एकरूप आहे त्याचाच सदा शोध घेत जावा. म्हणजेच जो शाश्वत आहे त्याचाच शोध प्रत्येक गोष्टीत घेत जावं. ज्या ज्या अशाश्वत गोष्टींत मन अडकलं आहे त्या त्या गोष्टींमागचं फरपटणं थांबावं. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, प्रत्येक इच्छा हळूहळू तपासत जावी. अंतरंगाची पाहणी करीत जावं. मग आपलं मन कुठे कुठे असहाय्यपणे गुंतलं आहे, ते जाणवू लागेल. हा जो सद्गुरू आहे तो खरंतर सर्व ज्ञानाचं सार आहे, तो प्रत्यक्ष आकारात प्रकट आहे तरीही तो या जगात चोरून वावरत आहे! समर्थ सांगतात, ‘‘असे सार साचार तें चोरलेंसें। इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे।’’ प्रत्यक्ष ज्ञानच ज्या देहरूपात आकारलं आहे असा खरा सद्गुरू या जगात चोरून वावरतो. म्हणजेच तो आपला डंका वाजवत नाही. प्रसिद्धी करीत नाही. आपल्या नावलौकिकाचा मोह त्याला नसतो. अशा खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचणं सोपं नाही आणि जेव्हा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाही त्याचं खरं स्वरूप कुठे जाणवतं? ‘‘ इहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे।’’ जे लोचनांना दिसतं ते त्याचं दृश्यरूप म्हणजेच त्याचं खरं रूप वाटतं! साईबाबांपर्यंत जे जे त्याकाळी पोहोचले त्यातल्या फार थोडय़ांना त्यांचं खरं स्वरूप किंचित आकळत गेलं. बाकीच्यांना काय वाटलं? साईबाबा पांढरी कफनी घालतात, डोईला फडकं गुंडाळतात, हातात कधी सोटा घेतात.. अनेकदा अतक्र्य असं काहीतरी बोलतात.. थोडक्यात सद्गुरूचं जे दृश्यरूप आहे, तो जसा दिसतो तेच त्याचं खरं स्वरूप आहे, असं माणूस मानतो. ‘‘निराभास निर्गूण तें आकळेना। अहंतागुणें कल्पितांही कळेना।।’’ जे दृश्यापलीकडचं कळलंय, असं वाटतं तेही आभासमयच असतं. तो निराभास, निर्गुण कसा आहे ते कळत नाही. अहंकारामुळे कितीही कल्पना केली तरी त्याचं खरं स्वरूप कळत नाही. त्यामुळे सत्संगाच्या योगे आपलं अंतरंग घडविण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या संकुचित कल्पनांनी जे जे स्फुरण होतं ते विषयांचंच असतं आणि त्यानं अज्ञानच वाढतं. (स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या।). त्यामुळे संतबोधानं ज्या व्यापक कल्पना अंतरंगात झिरपतात त्यानं ज्ञानच वाढतं. (स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या।). पण संकुचिताची असो की व्यापकाची अखेर कल्पना ती कल्पनाच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा