हा खरा सद्गुरू कसा आहे, त्याची १२ लक्षणं आणि त्याच्या सहवासातून काय साधतं हे समर्थ आता ‘मनोबोधा’च्या १८३व्या श्लोकात सांगत आहेत. समर्थ म्हणतात : ‘‘जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी। प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेन योगें समाधान बाणे।। १८३।।’’ यात सद्गुरूंची १२ लक्षणं सांगितली आहेत. तो परमतत्त्वापासून कधीच विभक्त नाही (भक्त), त्याला स्वस्वरूपाचं पूर्ण ज्ञान आहे (ज्ञानी), शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे साधकाच्या अंगी तो बाणवणारा आहे (विवेकी), जगात वावरत असतानाही तो जगाच्या ओढीत तीळमात्रही गुंतलेला नाही. जगाबाबत तो सदैव उदासीन आहे (विरागी), साधकावर तो अखंड कृपा करीत असतो (कृपाळू), तो जगाच्या मनाप्रमाणे कधीच वागत नाही (मनस्वी), तो साधकाबाबत अखंड क्षमाशील असतो (क्षमावंत), परमतत्त्वाशी तो योग पावलेला आहेच, पण इतरांनाही ती कला शिकवणारा आहे (योगी), तो सर्वसमर्थ आहे (प्रभू), तो साधकाच्या आत्महिताबाबत सदैव जागरूक आहे (दक्ष), आत्मज्ञानाचा तो स्रोत असल्यानं जगातलं असं कोणतंही ज्ञान नाही जे त्याच्या कक्षेत नाही (व्युत्पन्न), साधकाला या मार्गावर वळवण्याची, स्थिर करण्याची आणि त्याला अग्रेसर करण्याची कला त्याच्याशिवाय अन्य कुणातच नाही (चातुर्य जाणे)! त्याच्या संगतीनं काय साधतं? तर, ‘‘तयाचेन योगें समाधान बाणे।।’’ त्याच्या संगतीनं अंगी समाधान बाणू लागतं. समाधान म्हणजे काय हो? ती अखेर मनाचीच एक तृप्त अवस्था आहे. ती बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून नाही. बाह्य़ परिस्थितीत चढउतार झाले, तरी आंतरिक समत्व, आंतरिक स्थैर्य ढळत नाही. असं होणं हेच समाधान. जेव्हा बाह्य़ परिस्थितीवर आंतरिक स्थिती अवलंबून असते तेव्हा बाह्य़ परिस्थिती अस्थिर झाली की मन अस्थिर होते. पण जेव्हा आंतरिक स्थिती ही स्वरूपाशीच लय पावते तेव्हा बाह्य़ परिस्थिती कशीही असो, आंतरिक स्थैर्य कधीच ढळत नाही. हे सद्गुरूच्या आंतरिक संगतीशिवाय शक्य नाही. या संगतीनं आणखी काय होतं? समर्थ सांगतात : ‘‘नव्हे तेचि जालें नसे तेचि आलें। कळों लागलें सज्जनाचेनि बोलें। अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें। मना संत आनंत शोधीत जावें।। १८४।।’’ या संगतीनं पूर्ण आंतरिक पालट होतो. आपण आधी जसे होतो किंबहुना जसे नव्हतो तसे होतो! आपण आधी कधीच आत्मतृप्त नव्हतो, ते होतो. लहानसहान प्रसंगांनी आपल्या मनाची खळबळ होत असे. ती थांबते. नव्हे तेचि जालें.. आणि जे समाधान कधीच नव्हतं ते आतूनच येऊ लागतं.. नसे तेचि आले! आपलं मन अशाश्वत गोष्टींत कसं अडकून होतं हे हळूहळू सज्जनाच्या योगानं कळू लागतं. पण तरीही परमतत्त्वाचं स्वरूप काही उकललं नसतं. सद्गुरू सांगतात की, तू त्याच परमतत्त्वाचा अंश आहेस. पण हा अनुभव मात्र नसतो. तो अनुभव यावा यासाठी आजवर ज्या नामाचा कधी उच्चार केला नव्हता ते नाम मुखानं घ्यायला सद्गुरू सांगतात.. परमतत्त्व अनिर्वाच्य आहे, पण ज्या नामानं त्याचा संकेत होतो ते नाम वाच्य आहे. त्या साध्याशा दिसणाऱ्या नामातच ते पूर्णत्वानंही सामावलं आहे. पण तरीही इतकं सोपं नाम घेतलं काही जात नाही. सद्गुरू सांगतात की, अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावे! त्या नामाचा सतत जप कर. हा सद्गुरू कसा असतो? तो कसा वावरतो? तो सदैव रामरूपातच लय पावून असतो. अर्थात व्यापक अशा परमतत्त्वाशी सतत संयुक्त असतो. त्याचं भावस्पर्शी वर्णन करताना समर्थ म्हणतात, ‘‘लपावें अतीआदरें रामरूपीं। भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपीं। कदा तो जनीं पाहतांही दिसेना। सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना।। १८५।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा