समर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १८७ ते १९० या पुढील चार श्लोकात एक सूत्र आहे ते संगत्यागानं सुखी राहण्याचं! संगाशिवाय सुख नाही, हा आपला अनुभव आहे. तुरळक अपवाद वगळता; माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला भावनिक, मानसिक, वैचारिक आधार लागतोच, असं आपण पाहातो. तेव्हा संग सोडून सुख लाभेल, याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. समर्थ सांगतात, खरं तर ही सर्व सृष्टी एकाच तत्त्वातून उत्पन्न झाली आहे. पंचमहाभूतांपासून प्रत्येक जीव निर्माण झाला आहे. पण म्हणून सर्वाचं अंत:करण एकच आहे का? ‘सर्वे सुखिन: सन्तु,’ असं आपण भले म्हणत असू, पण मीच सुखी व्हावं, हीच प्रत्येकाची खरी इच्छा नाही का? उलट धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीनुसार आपण कित्येक भेद टिकवतो आणि आपल्या पातळीवर जे आहेत त्यांचंच सुख चिंतित असतो! थोडक्यात ही सर्व सृष्टी एकाच परमतत्त्वातून उत्पन्न झाली असली, पंचमहाभूतांपासून तिची घडण झाली असली, तरी सृष्टीतला प्रत्येक घटक स्वरूपभानात स्थिर नाही. समर्थ म्हणतात, ‘‘भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरूपीं न साहे।’’ आपणही वास्तविक नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचं जे रूप आपल्याला भासतं त्यानुसार त्याच्याशी व्यवहार करतो. थोडक्यात त्या व्यक्तिची जी प्रतिमा मनात असते त्या प्रतिमेनुरूपच व्यवहार करतो. वास्तविक स्वरूप जाणून नव्हे. थोडक्यात भ्रामक आकलनातूनच आपण काहीजणांवर प्रेम करतो, काहींचा द्वेष करतो. मग हे सर्व भासाधारित संग सोडून द्यायला समर्थ सांगत आहेत. त्यानंच कारणरहित सुखाची प्राप्ती होईल. ते म्हणतात, ‘‘मना भासलें सर्व कांहीं पहावें। परी संग सोडूनि सूखीं रहावें।।१८७।।’’ देहबुद्धीनुसारचं हे भान ज्ञानबोधाच्या आधारावर खुडावं! खुडणं हा शब्द किती अर्थसूचक आहे पहा. मोठं झाड आपण तोडतो आणि छोटी पानं खुडतो. तेव्हा देहबुद्धीनुसार जी अंत:करणात भ्रमरूपी वेल पसरत आहे तिची पानं खुडायची आहेत. आणि मग देहभावापलीकडे जायचा अभ्यास करीत भक्तीमार्गावर वाटचाल सुरू करायची आहे. आजवर अशाश्वत जगामागे फरपटणारं मन आता कुठे भानावर येऊ लागलं आहे. तेव्हा त्या अशाश्वताच्या जाणिवेच्या बळावर संतजनांना जे जे निंद्य वाटतं, पण जे जे आपल्याला आजवर मोहवत होतं त्याचा त्याचा त्याग करायचा आहे. त्या मोहाचा संग सोडून सुखी व्हायचं आहे. (देहेभान हें ज्ञानशास्त्रें खुडावें। विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें। विरक्तीबळें निंद्य सर्वै त्यजावें। परी संग सोडूनि सूखें रहावें।। १८८।।). ही सर्व सृष्टी ज्याच्या आधारावर उभी आहे, ज्याच्या आधारावर निर्माण झाली आहे तो मूळ देव जो आहे तो ओळखला पाहिजे. त्याचं खरं दर्शन जेव्हा आपल्या जगण्यात होईल, म्हणजेच त्याच्या बोधानुरूप जेव्हा आपण जीवन जगू लागू तेव्हा हा जीव जगतानाच मुक्तीचा अनुभव घेऊ लागेल. त्या गुणातीत अशा सद्गुरूचे जे गुण आहेत त्याचंच त्यासाठी स्मरण, चिंतन, मनन करीत जावं! निर्गुण परमात्माच सदगुरूच्या सगुण रूपात प्रकटला आहे, हे जाणून आपल्या मनातल्या भक्तीतंतूचं पोषण करावं. सत, रज, तममय अशा जगाचा संग सोडून सुखी व्हावं. (मही निर्मिली देव तो वोळखावा। जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा। तया निर्गुणालागि गूणी पहावें। परी संग सोडूनि सूखें रहावें।। १८९।।). हा जो सद्गुरू आहे तो अकर्ता आहे, सृष्टीचं आपल्या बळावर पोषण होतं, असंही तो मानत नाही म्हणजेच सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि पालक विष्णू यांचं कार्य करीत असूनही तो श्रेय घेत नाही. तो मानवी आकलनापलीकडचा म्हणूनच मायाभ्रमापासून निर्लिप्त आहे. त्या निर्विकल्पाची कल्पना करीत जावं आणि त्यायोगे भ्रममूलक कल्पना त्यागून सुखी व्हावं! (नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता। परेहून पर्ता न लिंपे विवर्ता। तया निर्विकल्पासि कल्पीत जावें। परी संग सोडूनि सूखें रहावें।।१९०।।)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा