सद्गुरूचं हे जे विराट स्वरूप आहे ते शब्दांनीसुद्धा कळणं अवघड आहे. ‘मनोबोधा’च्या १९१ ते १९३ या तीन श्लोकांत समर्थ सांगतात की, ज्याची देहबुद्धी ढळलेली नाही त्याला हे ज्ञान कधीच कळणार नाही. जिथे संकुचित मीपणा भरून आहे तिथं व्यापक तत्त्वाचं आकलन अशक्य आहे. मनातलं अज्ञान जोवर मावळत नाही तोवर शून्यच ज्ञान हाती लागणार. (देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना। तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना। परब्रह्म तें मीपणें आकळेना। मनीं शून्य अज्ञान हें मावळेना।। १९१।।).  जिथं दुजेपणाच नाही, दुजा कुणीच नाही केवळ तोच एकमेव सर्वोत्तम सर्वेश्वर भरून आहे त्याच्या ध्यानात रममाण आणि त्यामुळे त्याच्याशीच एकरूप झालेला जो सद्गुरू आहे त्याचं रूप ना कळणार ना आढळणार! त्याची खूण पटवण्यासाठी म्हणून जो जो दृष्टांत सांगावा तो तो हीनच ठरावा.. जिथं देहबुद्धीनं माखलेल्या दृष्टीचाच अंत होतो तो दृष्टांत कळावा तरी कसा? मोराच्या पिसाऱ्याला हजारो डोळे असतात, पण दृष्टी? ती एकाही डोळ्याला नसते.. तशी जगाकडे लागलेल्या डोळ्यांची गत होती. त्यांना नुसता झगमगाट समजत होता.. आता जे सहजपणे आहे त्याला पाहणं काही साधत नाही! कृत्रिमाची गोडी असल्यानं जो अकृत्रिम आहे, त्याचं मोल उमजत नाही. जेव्हा आपण सहज बनू तेव्हाच जो सहज आहे तो सहजप्राप्त होईल. कृत्रिमतेचा हव्यास सुटेल तेव्हाच जो अकृत्रिम आहे त्याचं मोल उमगेल. मग अशा त्या सद्गुरूशी लय साधली तर संग आणि नि:संग हे दोन्ही ओसरतात. आत्मतृप्त माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला संग कुठला? पण सदैव तो परमात्मचिंतनातच युक्त असल्यानं त्याला नि:संगता तरी कुठली? तो नुसता आहे.. त्या आहेपणाचं भानही नसलेला! (मना नाकळे नाढळे रूप ज्याचें। दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें। तया खूण ते हीण दृष्टांत पाहे। तेथें संग नि:संग दोनी न साहे।। १९२।।). हा जो देवांचाही राजा आहे, हा जो सद्गुरू आहे तो जाणला जात नाही की त्याला नेणताही म्हणवत नाही. तो एका परमात्म्याशिवाय स्वत: अन्य काहीच जाणत नाही आणि एका परमात्म्यावाचून या जगात काहीच नसल्यानं तोच सर्व काही जाणतो! त्यामुळे त्याला नेणताही म्हणवत नाही!! त्या सद्गुरूचं वर्णन वेद-शास्त्र-पुराणांनाही साधलं नाही. त्याला खरं पाहता येतं ते दृश्यात नव्हे, तर अदृश्यात! म्हणजेच त्याचं जे दृश्य रूप आहे ते पाहणं म्हणजे काही त्याला खरं पाहणं नव्हे. तर त्याचा जो अदृश्य असा आंतरिक भाव आहे, जो जीवनबोध आहे तो आपल्या अंतरंगात आणि आपल्या जीवनात उतरलेला पाहणं हे खरं त्याचं दर्शन आहे. अन्यथा श्रुतींनाही त्याचा थांग लागला नाही. म्हणजेच नुसत्या ऐकीव ज्ञानानं त्याचं स्वरूप आकळणारं नाही. (नव्हे जाणता नेणता देवराणा। न ये वर्णितां वेदशास्त्रा पुराणा। नहे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा। श्रुती नेणती नेणती अंत त्याचा।। १९३।।). हा जो देहात प्रकटलेला सद्गुरू आहे तो आपल्या अंत:करणातच निवास करतो, असं अध्यात्म सांगतं. मग मनुष्य स्वभावाला अनुसरून एक प्रश्न साधकाच्या मनात उत्पन्न होतो. प्रश्न फार वेगळा आहे. तो असा की, हृदयात परमात्मा राहातो, असं आजवर ऐकलं. आता परमात्मा आणि सद्गुरू एकच आहे, असंही ऐकलं. तरी माझ्या हृदयात जो निवास करतो तो देव नेमका आहे तरी कसा? आणि मुख्य प्रश्न असा की, देहात असलेला सद्गुरू माझ्याही हृदयात राहतो, हे एकवेळ मानलं, पण अवतार पूर्ण झाल्यावरजेव्हा तो देह सोडतो तेव्हा तो कुठे राहतो? पुन्हा तो अवतार घेतो काय? ‘मनोबोधा’चा १९४वा श्लोक विचारतो की, ‘‘वसे हृदईं देव तो कोण कैसा। पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा। देहे टाकितां देव कोठें रहातो। परी मागुता ठाव कोठें पहातो।। १९४।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा