देह सोडल्यावर सद्गुरू कुठे राहातो आणि तो पुन्हा अवतार घेतो काय? या प्रश्नावर समर्थ सांगतात, ‘‘वसे हृदईं देव तो जाण ऐसा।  नभाचेपरी व्यापकू जाण तैसा। सदा संचला येत ना जात कांहीं। तयावीण कोठें रिता ठाव नाहीं।। १९५।।’’ हे जे परम सद्गुरू तत्त्व आहे ते नभासारखं व्यापक आहे.आकाश कधी येत वा जात नाही, ते सदोदित आहेच. त्याच्याशिवाय कुठे रिकामी जागाच नाही! या अवकाशातल्या प्रत्येक अणू-रेणूत हाच राघव भरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जे जे निघाले ते त्याला पाहता पाहता तेच झाले! जेव्हा संकुचित गोष्टींत मन अडकून पडतं तेव्हा ते मनही संकुचितच होऊन जातं. जेव्हा ते व्यापकाच्या ध्यासानं त्या व्यापकालाच प्राप्त करू लागतं तसं तसं ते व्यापकच बनतं. तिथे पाहणारा, ज्याला पाहायचं आहे तो आणि पाहणं; हे सारंच मावळतं! (नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं। रिता ठाव या राघवेवीण नाहीं। तया पाहतां पाहतां तेंचि जालें। तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें।। १९६।।). या व्यापक, परम तत्त्वाशी एकरस, एकरूप अशा सद्गुरूचं चिंतन करीत गेलं की भ्रम, मोह, आसक्ती यानं दृढ झालेल्या भवरोगाचं मूळच तुटून जातं. त्या सद्गुरूचं आपल्या जीवनात दर्शन झालं की देहबुद्धी उरत नाही. मग त्या सद्गुरूप्रेमाचा जो उमाळा येतो तो अंत:करणात मावत नाही! (नभासारिखें रूप या राघवाचें। मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें। तया पाहतां देहबुद्धी उरेना। सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना।। १९७।।). आता समर्थ सांगतात की, खरंतर आकाशाचीही उपमा अपुरीच आहे. कारण सृष्टीसभोवताली जे आकाश आहे तेवढंच आपण जाणतो आणि तेच आपल्याला व्यापक वाटतं. पण त्या आकाशापलीकडेही अनादि अनंत असा अवकाश आहे! हा रघूनायक जर चराचरातल्या प्रत्येक कणाकणांत आहे, तर मग त्या कणाकणाला तरी वेगळं अस्तित्व कुठून आलं? पाण्यानं घडा पूर्ण भरला आहे, असं म्हणताना पाणी आणि घडा या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. पण जर घडाही तोच, पाणीही तोच तर मग कुणी कुणाला व्यापावं? व्यापक हा शब्दही त्याच्यासाठी तोकडाच आहे! (नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे। रघूनायका उपमा ते न साहे। दुजेवूीण जो तोचि तो हा स्वभावें। तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें।। १९८।।). समर्थ सांगतात, हे साधका हे सद्गुरूस्वरूप अत्यंत आदिम आहे, विस्तीर्ण आहे. ना ते तर्कानं जाणता येत, ना त्याच्याशी संपर्क साधता येत. ते अतिशय गूढ आहे, दृढ आहे, पण तरीही तात्काळ प्राप्त होणारं, सहजसोपंही आहे!! त्या सद्गुरूच्याच कृपेनं दुसऱ्या कोणत्याही आधाराशिवाय त्याची खूण पटते. (अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे। तेथें तर्कसंपर्क तोही न साहे। अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें। दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें।। १९९।।). एकदा सद्गुरूकृपा झाली की मग त्याच्या रूपाचं ज्ञान आकळतं. पण तिथं साक्षी अवस्थाही पूर्ण मावळून जाते. मनाचं उन्मन होतं आणि शब्द कुंठीत होऊन जातात.. शब्देवीण संवादू, अशी लय सुरू होते.. आपला स्वत:शी जसा सहज आंतरिक संवाद सुरू असतो तसा सहज संवाद अंत:करण व्यापून असलेल्या सद्गुरूशी होऊ लागतो. मग जगताना पदोपदी, क्षणोक्षणी तोच सद्गुरू सर्वत्र जाणवू लागतो.. दिसू लागतो. (कळे आकळे रूप तें ज्ञान होतां। तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था। मना उन्मनी शब्द कुंठीत राहे। तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे।। २००।।). मग दुसरं काही जाणवतच नाही, मनात द्वैत म्हणून काहीच वसत नाही, अशी भावदशा साधकाची झाली! (कदा वोळखीमाजि दूजें दिसेना। मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना।). अशा साधकाला प्रेमभरानं सद्गुरू म्हणतात.. ‘‘बहूतां दिसा आपुली भेट जाली। विदेहीपणें सर्व काया निवाली।। २०१।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा