साधकाच्या अंत:करणातून द्वैताचा इतका निरास झाला की, दुसरी काही ओळखताच येईना! पहावं तिथं सद्गुरूच भरून आहे. कानावर पडणारा प्रत्येक शब्द, स्वर, ध्वनी.. डोळ्यांना दिसणारं प्रत्येक रूप आणि डोळे मिटल्यावरचं प्रत्येक आंतरिक दर्शन  सद्गुरूंशीच जोडणारं, सद्गुरूऐक्यता दृढ करणारं आहे. मग त्याच्यापासूनचा क्षणभराचा आंतरिक वियोगही साहवत नाही. पाषाणहृदयी आणि विकारग्रस्त अशा या तुच्छ जिवात एवढं परिवर्तन! मग ही सारी प्रक्रिया ज्या सद्गुरूनंच सुरू केली, विकसित केली आणि पूर्णत्वास नेली, त्याला एकरूप झालेल्या साधकाला भेटताना काय वाटत असेल? समर्थ सांगतात, ‘‘बहूतां दिसा आपुली भेटि जाली। विदेहीपणें सर्व काया निवाली।।’’ अनंत जन्म सरले आणि आता आपली खरी भेट झाली! देहबुद्धीचा पूर्ण निरास झाल्यानं विदेहीभावानं जगण्यातला हवे-नकोपणाचा दाहच निवाला. आता एवढं होऊनही धोका काही टळलेला नाही! कारण सद्गुरू कृपेनं जी अवस्था प्राप्त झाली ती कायमची असावी, हा निश्चय सुरुवातीला यत्नपूर्वक टिकवावा लागणार आहे. नाहीतर त्या सद्गुरू कृपेच्या बळावर आंतरिक शक्ती, क्षमतांमध्ये जी सहज वाढ होते तीच घसरणीचा मार्ग ठरू शकते. त्यामुळे आपल्या अकर्तेपणाचं भान जपण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. समर्थ सांगतात, ‘‘मना गूज रे तूज हें प्राप्त जालें। परी अंतरीं पाहिजे यत्न केले।’’ हे यत्न कोणते आणि त्या यत्नांनी काय साधतं? समर्थ सांगतात: ‘‘सदा श्रवणें पाविजे निश्चयासी। धरी सज्जनसंगती धन्य होसी।। २०२।। मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अतीआदरें सज्जनाचा धरावा। जयाचेनि संगे महादु:ख भंगे। जगीं साधनेंवीण सन्मार्ग लाभे।। २०३।। मना संग हा सर्वसंगास तोडी। मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी। मना संग हा साधकां सीघ्र सोडी। मना संग हा द्वैत नि:शेष मोडी।। २०४।।’’ हे मना, तुला हे रहस्य सहज समजलं आहे. तो अप्राप्य असा सद्गुरू तुला सहजप्राप्य झाला आहे. पण ती परमप्राप्ती कायमची टिकवण्यासाठी मीपणा कायमचा गमवावा लागणार आहे! त्यासाठी यत्न हवेत. त्या यत्नांची सुरुवात आहे ती श्रवणानं. अंत:करणाच्या कानांनी  सदैव त्याच्याच परमबोधाचं श्रवण करीत राहा. त्यातून जीवनध्येयाचा निश्चय पक्का करीत जा. त्यासाठी सज्जनांच्याच संगतीत सदैव रहा. थोडक्यात मनाला कधीही सत्विचारापासून ढळू देऊ नकोस. जगात तर राहायचं आहे, पण त्या जगाच्या आसक्तीचा संग कायमचा सोडून द्यायचा आहे. त्याऐवजी सद्गुरूचा संग अत्यंत प्रेमादरानं जोपासायचा आहे. हा सद्गुरूसंग असा आहे ज्या योगानं भवरोगाचं महादु:खं भंगतं. जगाला दिसेल अशी कोणतीही साधना न करता म्हणजेच साधनेचं अवडंबर टाळून सन्मार्गावर सहज  वाटचाल सुरू होते. हा जो सद्गुरू संग आहे तो अन्य सर्व भ्रामक संगांना तोडून टाकतो. तो मुक्तीशी तात्काळ जोडून देतो. हा संग साधकांना बंधनांपासून शीघ्र सोडवतो आणि द्वैतभावनाच नि:शेष मोडून टाकतो! समर्थ धीरगंभीर स्वरात या ‘मनोबोधा’ची फलश्रुती सांगतात.. ‘‘मनाचीं शतें ऐकतां दोष जाती। मतीमंद ते साधना योग्य होती। चढे ज्ञानवैराग्यसामर्थ्य अंगीं। म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी।। २०५।।’’ हे मनाचे श्लोक जो ऐकेल त्याचे सर्व दोष जातील. ऐकणं म्हणजे ऐकल्याप्रमाणे वागू लागणं, बरं का! मग ज्याला काही कळत नाही त्याला  हा जन्म साधनेसाठीच आहे, एवढं कळेल, मग तो साधनेसाठी योग्य होईल. साधना करीत करीत त्याच्या अंगी ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य सहज बाणू लागेल. नुसत्या विश्वासानं तो मुक्ती भोगू लागेल! आपला ‘मनोबोधा’चा हा ‘मनोयोग’ आता संपत आहे. अखेरच्या दोन भागांनी आपण या सदराचा समारोप करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा