सर्व ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियं जाणता येतात, पण अकरावं इंद्रिय असलेलं मन काही हाती लागत नाही! ते नाहीसं झालेलं भासवतं आणि अनंत काळ नाचवतं. पण परमध्येयानं प्रेरित झालं तर तेच सगळा खेळ, सगळा नाच थांबवतं. म्हणून त्या मनालाच समर्थ हात घालतात. मनुष्य जन्म हा साधनेसाठी आहे आणि त्यामुळे माणसानं चांगला साधक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा साधक कसा असला पाहिजे, हे सांगण्यासाठी हे मनाचे श्लोक अवतरले. साधकाच्या चित्तावर निर्भयतेचे संस्कार करण्यासाठी ते अवतरले. स्थूल भौतिकाचा जो पगडा साधकाच्या मनावर असतो, तो ओसरला पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म अशा परमतत्त्वाच्या जाणिवेनं मनात प्रवेश केला पाहिजे, या हेतूनं आणि त्या दिशेनं हे श्लोक साकारले. स्थूल भौतिकाचा पगडा ओसरणं, ही गोष्ट सोपी नाही. तसंच सूक्ष्म तत्त्वाचा प्रवेश मनात झाला तरी त्यानं मन पूर्ण व्यापणं आणि त्या तत्त्वबोधाच्या आधारावर संपूर्ण जीवन व्यापणंही सोपं नाही. पण या श्लोकांतून अतिशय सूक्ष्मपणे त्या तत्त्वाचा शिरकाव अंत:करणात होतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘मनाचा प्रत्येक श्लोक म्हणजे मनाचं इंजेक्शन आहे!’ आणि किती सार्थ आहे ही उपमा. हा प्रत्येक श्लोक खचलेल्या मनाला सावरतो, सावरलेल्या मनाला उभारी देतो आणि उभारी आलेल्या मनाला दिशा देतो! आपल्याच जगण्याकडे नव्या दृष्टीनं पाहायला प्रेरित करतो. मग लक्षात येतं की आपलं सगळं जगणं हे अनवधानानंच सुरू आहे! जग आपल्या केंद्रबिंदूनुसार आपण पहात असतो, मानत असतो, जोखत असतो आणि जाणत असतो.. पण आपण कितीही मानलं तरी जगाच्या लेखी आपलं महत्त्व ते केवढं? अगदी नगण्य! जगाचा केंद्रबिंदू काही मी नव्हे! त्यामुळेच हे जग कधी माझ्या मनासारखं भासतं कधी मनाविरुद्ध भासतं. कधी सुखकारक वाटतं कधी दु:खकारक वाटतं. तेव्हा या जगाच्या आसक्तीत अडकण्यात अर्थ नाही. उलट या जगामागे जितकं धावावं तितकं जग आणखी दूर दूर धावत रहातं. मृगजळामागे हरणानं धावत रहावं, पण मृगजळ दूर दूर व्हावं, तसं! त्या उलट जर आपली जगाकडची धाव आणि हाव जितकी कमी होत जाईल तितका जगाचा प्रभाव ओसरेल. आपल्या मनातल्या जगातली अस्थिरता लोप पावू लागेल. त्यामुळे याच जगात वावरत असताना, याच जगातली सर्व कर्तव्यं नीट पार पाडत असतानाही आपल्या जगण्याला अधिक व्यापक अर्थ आहे, हे जाणून त्यानुसार जगणं सार्थक व्हावं, असं जगायला सुरुवात केली पाहिजे. समर्थ त्यासाठी एक सूत्र दासबोधात सांगतात : सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्य विवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।। जर आपण साधक असू किंवा साधक व्हायची आपली प्रामाणिक इच्छा असेल तर त्यासाठी आपण सावध आणि दक्ष झालं पाहिजे. ही सावधानता कशाची आहे? तर नित्य आणि अनित्याच्या विवेकाची आहे. अनित्याच्या संगातच आपलं मन रूतून नाही ना? नित्याची जाण किती वाढत आहे, याबाबत सावधानता हवी, दक्षता हवी. कारण जे अनित्य आहे त्याच्या संगानं नित्य सुख मिळणार नाही. जे नित्य आहे त्याच्याच योगानं नित्य अखंड समाधान लाभणार आहे. त्यामुळे जो खरा नित्य आहे अशा सद्गुरूचाच संग धरून अनित्याच्या संगाच्या प्रभावातून स्वत:ला अभ्यासपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला पाहिजे. एवढय़ा व्यापक हेतूच्या पूर्तीसाठीचे आपले प्रयत्न तोकडेच पडतात, हे खरं. पण निदान त्यातून आपली इच्छा तर व्यक्त होते! आणि त्या इच्छेचा प्रामाणिकपणा पाहून जो समर्थ आहे तोच आपल्याला अखंड सत्संगात ठेवू लागतो! मनोबोधाच्या या मनोयोगानं आपणा सर्वाना अशा सत्संगाचा लाभ होवो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. चिंतनाचा धाराप्रवाह अखेर भावसमुद्राला मिळाला आहे. आपल्या सर्वाना कृतज्ञतापूर्वक नमस्कार! जय जय रघुवीर समर्थ!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा