श्रीगोंदवलेकर महाराज यांना एकानं विचारलं की, ‘‘महाराज, तुम्ही जो आध्यात्मिक बोध करता तो ऐकतो तेव्हा आम्हालाही इच्छा होते की आपणही नाम घ्यावं, साधना करावी, संतांना आवडतं तसं जीवन जगावं.. पण तरीही ते साधत नाही हो! असं का होतं?’’ श्रीमहाराज हसून म्हणाले, ‘‘तुम्हाला इच्छा होते ही खूप चांगली गोष्ट आहे बरं.. पण खरं सांगू का? आपल्याला खरी इच्छाच होत नाही, हेच खरं! कारण जेव्हा खरी इच्छा होते तेव्हा खरी कृती झाल्याशिवाय राहात नाही!!’’ किती सत्य आहे हे! भौतिकातलं आपण जेव्हा काही ठरवतो तेव्हा कृतीही लगेच सुरू होते. म्हणजे समजा आपण ठरवलं की पुढच्या वर्षी एक चांगली गाडी घ्यायची, तर मग ती घेण्यासाठी जे जे करायला हवं ते ते आपण करू लागतो. मग कर्ज काढावं लागणार असेल, तर ते कुठून मिळेल, कसं मिळेल, व्याज किती, हप्ते कसे आणि किती भरावे लागतील, या गोष्टींचा आपण शोध घेतो आणि त्या पारही पाडतो. तेव्हा, नवी गाडी घ्यायची आहे, एवढीच इच्छा व्यक्त करून आपण गप्प बसून राहात नाही. अध्यात्माच्या बाबतीत मात्र आपण नुसती शाब्दिक इच्छा व्यक्त करतो, खरी कृती करीत नाही. नीट लक्षात घ्या हं, ‘खरी कृती’ म्हटलं आहे. कृतीच करीत नाही, असं म्हटलेलं नाही. पण ती कृती कशी असते माहीत आहे का? आता मला एखादी नवी वस्तू घ्यायची असेल आणि तिची किंमत जर तीस-चाळीस हजार रुपये असेल तर मी दरमहा काही बचत सुरू करतो. आता ही बचत त्या रकमेच्या प्रमाणात असते ना? मी काही दरमहा दहा-वीस रुपये बाजूला टाकत नाही आणि त्या वस्तूसाठी मी ही बचत करीत आहे, असं म्हणत नाही. पण आत्मसाक्षात्कारासारख्या सर्वोच्च गोष्टीसाठी मात्र मी कितीतरी जुजबी कृती करतो.. किंवा उरकून टाकतो, म्हणा हवं तर! तेव्हा आपली साधना अधिक सजगतेनं व्हावी, ती करीत असताना भावपोषणही व्हावं, परमतत्त्वाची खरी ओढ लागावी, या हेतूनंच तर संत-सत्पुरुषांनी सतत बोध केला. जगण्यातील विविध प्रसंगातून ते तत्त्वज्ञान त्यांनी स्वत: जगून दाखवलं आणि साधकांच्या चित्तावर बिंबवलं. आपल्या साधनेला त्याचा लाभ व्हावा, आपली आंतरिक वाटचाल अधिक सजगतेनं व्हावी आणि साधनेचा खरा हेतू काय, हे उमजून खऱ्या व्यापक ध्येयाशी सुसंगत अशी आंतरिक जडणघडणही साधावी, ही प्रत्येक खऱ्या साधकाची प्रामाणिक इच्छा असतेच. त्यासाठी अनेकानेक संत-सत्पुरुषांची बोधवचनं, त्यांच्या चरित्रातील प्रसंग तसंच विविध स्तोत्रं, धर्मग्रंथ, आध्यात्मिक साहित्य यांचं परिशीलन तो करीत असतो. साधनपथावरील चिंतनाला चालना देता यावी, साधकाच्या आंतरिक जडणघडणीला साह्य़ व्हावं, त्याच्या भावपोषणाला उपयुक्त असं खाद्य मिळावं, हा या ‘चिंतनधारे’चा मूळ हेतू आहे. त्याचा आकृतीबंध एकसमान असेलच, असं नाही. पण एखादं वचन, एखादा श्लोक, एखादा अभंग, एखादी ओवी किंवा एखादा प्रसंग यांचा आधार घेऊन त्यायोगे आपल्या चिंतनाची ही धारा प्रवाहित होणार आहे. कधी योगायोगानं एखाद्या सत्पुरुषाच्या जयंती वा पुण्यतिथीला त्याच्याच बोधवचनाद्वारे चिंतन साधेल आणि तो दिवस खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारानं प्रेरित होईल. पण प्रत्येकवेळी असं निमित्त साधलं जाईलच, असंही नाही. या प्रवाहात आता सहभागी होऊया.. या चिंतनधारेचा प्रवास कसा होईल, हे उगमाशी सांगता येत नाही.. अखेर संगम गाठू एवढं मात्र नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा