श्रीगणपतीचे अवतरण चतुर्थीला झाले. म्हणजेच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांनंतर चौथी अवस्था जी तुर्या तीच खरी आत्मज्ञानमय आहे! बुद्धिदात्या श्रीगणपतीचे अवतरण म्हणूनच चतुर्थीला झाले आहे. खरं पाहता मंगलमूर्ती श्रीगणेशस्वरूपाचं प्रत्येक गुणवैशिष्टय़ हे कोणत्या ना कोणत्या रूपकाच्याच स्वरूपात विद्यमान आहे.  गणपती हा गजेंद्रवदन आहे. भगवान शंकरानं क्रोधीत होऊन विनायकाचं मस्तक धडावेगळं केलं, पण नंतर आपल्या या पुत्रानं केवळ मातेच्या आज्ञेच्या पालनासाठी प्राणांचीही पर्वा न केल्याचं जाणवताच, प्रसन्न होत त्याला हत्तीचं मस्तक बहाल केलं. यातही एक रूपक आहे. बुद्धी धारण करणारं मस्तक आणि देहच वेगळा झाला, तर देहबुद्धी उरेल कशी? हत्तीचं मस्तक बहाल करण्याचा अर्थ हा की श्रीगणपती हा आत्मबुद्धीप्रदायक आहे. हत्ती हा प्राणीही अन्य प्राण्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्याच्यात बुद्धी, धैर्य आणि गांभिर्य विलसत असल्याचं जाणवतं. अन्य पशुपक्षी हे भूक भागवणारं ‘अन्न’ समोर दिसताच शेपटी तरी हलवतात किंवा उंच उडय़ा मारू लागतात. हत्ती मात्र अत्यंत धीरानं आणि गांभिर्यानं आपलं अन्न ग्रहण करतो. साधकानंही आत्मतत्त्व अशाचं धीरानं आणि गांभिर्यतेनं ग्रहण केलं पाहिजे.  (आत्मतत्त्व प्राप्तीच्या साधनेत धीर आवश्यक आहे, कारण भौतिकाचा प्रभाव निष्प्रभ करण्याची साधनाही त्याला करावी लागते!) हत्तीचे कान मोठे असतात. साधकानंही कान मोठे करावेत, म्हणजेच त्यानं ऐकावं सगळ्यांचं, त्यावर धीरानं आणि गांभिर्यतापूर्वक विचारही करावा, पण जे आत्महिताचं ते लक्षात ठेवावं. श्रीगणपती हा ‘लम्बोदर’देखील आहे. साधकाचं पोटही तसंच मोठं असावं. म्हणजेच दुसऱ्यांचे दोष, चुका त्यानं पोटात घ्याव्यातच, पण दुसऱ्याच्या बऱ्यावाईट गोष्टीही पोटातच ठेवाव्यात. श्रीगणपती ‘एकदन्त’ आहे. हिंदी प्रदेशात एक म्हण प्रचलित असे. ‘एक दात से रोटी खाइये!’ म्हणजे सर्वानी मिळून जे आहे ते वाटून खावं. हा एकदन्तही ऐक्याचाच बोध करतो. गणपतीचा प्रिय मोदकही असाच अर्थबोधक आहे. वैविध्यानं नटलेल्या समाजघटकांना एकत्र करून मोद निर्माण करण्याचा संदेश हा मोदक देतो. संघटित समाज जितकं कार्य करू शकतो, तसं एकटीदुकटी व्यक्ती करू शकत नाही. गणपती हा सिंदूरचर्चित आहे. ‘सिंदूर’ हा सौभाग्यसूचक आणि मांगल्यसूचक आहे. त्यामुळे जे जे मंगल आहे त्याचं अर्चन गणरायाला करण्यातही सकारात्मक भाव आहे. गणपतीला दुर्वा वाहतात. दुर्वा या नम्रतेचं आणि महानता असूनही लघुत्व जपण्याच्या वृत्तीचं रूपक आहेत. ‘साधकानं दुर्वासारखं लहान व्हावं,’ असं नानक साहेबही सांगत. या गणपतीने मूषकाला वाहन का बनवलं आहे? त्या मूषकावर तो स्वार का आहे? कारण उंदीर हा प्रत्येक वस्तू कुरतडून टाकतो. त्याप्रमाणे कुतर्की जो असतो तो हितकारक असा बोधदेखील विकल्पाच्या दातांनी कुरतडून टाकतो. त्या कुतर्कावर जेव्हा सद््बुद्धीदाताच स्वार होतो, तेव्हाच कुतर्क दबून जातो. त्यामुळेच कुतर्कानं माखलेल्या बुद्धीरूपी उंदरावर बुद्धीदाता गजवदन हा स्वार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(‘कल्याण’ या हिंदी नियतकालिकाच्या १९७४च्या श्रीगणेश विशेषांकातील मूळ लेखाचा संक्षिप्त आणि काही प्रमाणात स्वैर अनुवाद.)

– श्रीगोविंददास ‘संत’

(‘कल्याण’ या हिंदी नियतकालिकाच्या १९७४च्या श्रीगणेश विशेषांकातील मूळ लेखाचा संक्षिप्त आणि काही प्रमाणात स्वैर अनुवाद.)

– श्रीगोविंददास ‘संत’