सदासर्वदा जर रामाची अर्थात शाश्वत परमतत्त्वाची धारणा साधायची असेल, तर  ‘दु:खाची स्वये सांडी जीवी करावी’ म्हणजे दु:खाला स्वत:हून सोडून द्यावं लागेल. दु:खाचीच धारणा करायची मनाची सवय बदलावी लागेल. हे दु:ख किती सूक्ष्मपणे अंत:करणात रुजलं आहे आणि त्याचा आधारही किती सूक्ष्म आहे, हे श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या एका वचनातून जाणवतं. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘..बाहेरून मिळवायचं असं परमार्थात काही नाहीच. आहे ते बाहेर दवडायचं आहे. ती शंका आहे. ती आपणच निर्माण केली आहे.’’ (श्रीमहाराजांची बोधवचने, क्र. ६४८मधून). आता परमार्थ म्हणजेच सदासर्वदा रामाची, अर्थात शाश्वताची प्रीती धरण्याच्या आड काय येतं? तर अं:तकरणातलं दु:ख.. ते शंकेतूनच उत्पन्न झालं आहे. इथं अभिप्रेत असलेली शंका ही ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेतील कुतूहल, या अर्थानं नाही. ही देहबुद्धीतून उगम पावणारी शंका आहे. आता प्रत्यक्ष देहाला दु:ख भोगावं लागतं, ते काय शंकेतून उत्पन्न होतं का, असा स्वाभाविक प्रश्न मनात उत्पन्न होईल. नीट पाहिलं, तर मात्र जाणवेल की शंकेमुळे देहाचं जे दु:ख आहे ते मी कैक पटीनं वाढवलंही आहे! साधा खोकला घ्या. तो काही केल्या बरा होत नसेल तर माझ्या मनात किती शंका येतात! नुसत्या खोकल्यापायी वाटय़ाला आलेलं देहदु:ख हे कमी असेल, शंकेपायी वाढत जाणारं मानसिक दु:ख  फार मोठं असतं. आणि ते मानसिक दु:ख अखेर शरीरावर परिणाम करतंच. नि:शंकतेत सुख असतं आणि देहबुद्धीतून उगम पावणारी शंका ही काळजी, चिंता, भीती, नकारात्मक कल्पना यांनाच वाव देणारी असते. तेव्हा ते दु:ख म्हणजेच दु:खाला वाढवत नेणारी शंका मी स्वत:हूनच सोडली पाहिजे. आता ‘‘दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।।’’ या चरणाचा फार वेगळा अर्थही आहे. ‘सांडी’चा अर्थ सांडशी म्हणजेच स्वयंपाकात आपण जो चिमटा वापरतो, तो घेतला तर हे रूपक अगदी विलक्षण भासतं. आगीत तापत असलेलं पातेलं किंवा एखादा पदार्थ आगीतून बाहेर काढण्यासाठी आपण सांडशी वापरतो ना? तसं आपल्याच दु:खांची आपण सांडशी करावी आणि भ्रम-मोहाच्या पाशातून जिवाला बाहेर काढत जावं! देहदु:खाचं सोडा, आपल्या जीवनातली बरीचशी दु:खं ही आपल्याच मनातल्या आसक्ती, भ्रम, मोह आणि लोभामुळे वाटय़ाला येत असतात. जे हवं ते मिळत नाही आणि जे नको ते टळत नाही, हेच अनेक दु:खांचं मूळ असतं आणि हे जे हवं-नकोपण आहे, तेदेखील मनातल्या मोह आणि आसक्तीनुसारच ठरत असतं. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत ना? की, ‘‘आघात जगाचे नाहीत, आपलेपणाचे आहेत!’’ जे जग कधीच कुणाचंच नव्हतं त्यालाच मी आपलं मानलं आणि ते माझ्या मनाजोगतं करीत राहाण्याची धडपड चालवली. जगानं माझंच ऐकावं, माझ्याच मनाप्रमाणे वागावं या अवास्तव कल्पनेतूनच अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचं दु:ख उत्पन्न होत असतं. मग जगाकडून फटका बसतो, त्या फटक्यानं भानावर येऊन तरी, त्या दु:खाचा सांडशीसारखा वापर करून तरी मी स्वत:लाच मोहासक्तीच्या आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला पाहिजे. समर्थभक्त श्रीधर स्वामींनी एका पत्रात एका साधकाला केलेला बोध सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी। दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।। या   चरणाच्या विश्लेषणासाठी अत्यंत पूरक आहे. त्या पत्रात ते म्हणतात, ‘‘कोणाचेही व्यवधान मनास नसलेले उत्तम. ध्येयावरच लक्ष्य सदोदित स्थिर ठेवावे. मनाला कुणीकडचीही ओढ असू नये. कोणावरही थोडे जास्त प्रेम ठेवले की मन तेथेच ध्येय जोडून पुन्हा पुन्हा जाऊ लागते. बारके छिद्रही पात्र रिकामे करते, हे लक्षात ठेवावे!’’ (शतपत्रे, पत्र ६२वे).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा