जग म्हणजे तरी काय हो? जगाचा विस्तार अत्यंत मोठा आहे आणि प्रत्येक जण एकाच जगात राहत असला तरी ज्याचं-त्याचं जग वेगवेगळं आहे! म्हणजेच ज्याला-त्याला आकळणारं, भिडणारं, प्रभाव टाकणारं जग ज्याचं-त्याचं स्वत:चं, स्वत:पुरतं आहे. ज्या माणसांशी आपला संबंध येतो त्या माणसांपुरताच आपल्या जगाचा परीघ असतो. मग ती माणसं नात्याची असतील, आवडती किंवा नावडती असतील, परिचित किंवा अपरिचितही असतील.. जी जी माणसं आपल्या संपर्कात असतात किंवा आपल्या अवतीभोवती वावरतात, ती आपल्या जगाचा भाग असतात. जगात अतिरेकीही आहेत, चोर-दरोडेखोरही आहेत, पण त्यांची झळ जोवर ‘माझ्या’ जगाला बसत नाही तोवर मी त्यांच्याबाबत वारेमाप चर्चा करतो, पण आरपार अस्वस्थ होत नाही. तेव्हा माझं जे जग आहे ते माझ्या आसक्तीनं बरबटलेलं आणि त्यातूनच प्रसवलेल्या प्रेम-द्वेष, भीती, काळजी, चिंता, मोह, भ्रम यांनी आकंठ भरलेलं आहे.
या जगाच्या पलीकडे जाता येणं म्हणजेच जगाच्या प्रभावापासून मुक्त होता येणं.. आणि जगाचा प्रभाव संपणं म्हणजे आसक्तीच नष्ट होणं! ती आसक्ती आहे म्हणूनच जगाचा प्रभाव आहे आणि जगाचा प्रभाव आहे म्हणूनच तर जग पूर्ण खरं वाटतं! त्यामुळे जगाबद्दलच्या ठाम विश्वासानं आणि परमात्म्याबद्दल असलेल्या अनिश्चित धारणेनं जीव अध्यात्माच्या वाटेकडे वळतो. जगाबद्दल खात्री आहे, पण परमात्म्याबद्दल खात्री नाही, अशी सूक्ष्म आंतरिक अवस्था आहे. एवढा मोठा पसारा आहे म्हणजे देव म्हणून कुणी तरी असलाच पाहिजे, असंही वाटतं. आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे समजत नाही. त्यामुळे वाईट तर काही घडणार नाही ना, याचीही चिंता असते. हे सारं ‘घडविणारी’ अगम्य शक्ती तीच ‘देव’ आहे.. त्यामुळे देव प्रसन्न झाला तर सर्व चिंता आपोआप मिटतील, अशीही धारणा आहे! त्यामुळे जग आपल्या मनाजोगतं व्हावं, आपल्याला अनुकूल म्हणजेच सुखकारकच असावं, यासाठी ‘देवा’ची भक्ती आहे.
थोडक्यात अध्यात्माच्या वाटेवर आलो तरीही सत्यत्व जगालाच आहे. ही आंतरिक स्थिती पालटण्याची दीर्घ आणि सूक्ष्म प्रक्रिया सत्पुरुषाच्या सहवासात सुरू होते. त्या सहवासात साधनेचे संस्कार होऊ लागतात. ही साधना कशासाठी आहे? तर आज जे खरं वाटतं त्याचं खरं मिथ्या रूप आकळण्यासाठी आणि जे खरं आहे, पण काल्पनिक वाटतं त्याचं वास्तविक रूप मनावर ठसविण्यासाठी साधना आहे!
पू. बाबाच एके ठिकाणी म्हणतात की, ‘‘मन कल्पनाप्रधान असल्याने कल्पनांची रचना व तऱ्हा बदलली की मन बदलते. मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो. स्वत:कडे आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलतो. ‘मी देहच आहे,’ ही कल्पना नष्ट करण्यास ‘मी आत्माच आहे,’ ही कल्पना करावी. पहिल्या कल्पनेने द्वैताने भरलेले दृश्य विश्व खरे वाटते. दुसरी कल्पना साधनेने सुदृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्मच खरे वाटते.’’
इथं पू. बाबांनी एका अत्यंत सूक्ष्म गहन सत्याला स्पर्श केला आहे. देह-कल्पना, आत्मा-कल्पना आणि अद्वैत ब्रह्म या तीन शब्दांत हे गूढ सत्य सामावलं आहे आणि विवेकभान आणणाऱ्या साधनेतल्या टप्प्यांचंही त्यात सूचन आहे.
–चैतन्य प्रेम