मना सज्जना भक्तिपंथेचि जावे! हे मना सज्जनांचा जो भक्तीपंथ आहे त्या मार्गानंच जा.. तरच सद्गुरू सहजप्राप्य आहेत.. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं भक्तीपंथाचं विवरण केलेलं नाही, भक्तीपंथ म्हणजे नेमका कोणता, तो कसा आहे, हे सांगितलेलं नाही. तर त्या मार्गानं जाताना काय करणं अनिवार्य आहे ते करायला थेट सांगितलं आहे. काय करायचं आहे? तर, ‘‘जनीं िनद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।।’’ इथं चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत आणि त्यांना ‘‘सदाचार हा थोर सांडूं नये तो। ’’ या शब्दांत थोर, श्रेष्ठ सदाचार म्हणूनही गौरविलं आहे. या ज्या चार गोष्टी आहेत त्या आचरणात आल्या ना की हळूहळू भक्तीपंथ काय ते उकलत जाईल आणि त्या भक्तीपंथानं चालणंही साधत जाईल. किंबहुना या चार गोष्टी म्हणजे जणू भक्तीपंथाचा आत्माच आहे! आता यातल्या पहिल्या दोन गोष्टी म्हणजे जनीं िनद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। या प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या आहेत. तर प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा।। या दोन गोष्टी या धारणेच्या आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष कृती करताना, जगात वावरताना आंतरिक धारणा काय असली पाहिजे ते सांगणाऱ्या आहेत. जनीं िनद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। या चरणाचा अर्थ लावताना ‘जनी’ या शब्दाचा अजाणता चुकीचा अर्थ गृहित धरला जातो. ‘जनी’ म्हणजे ‘लोक’ असं आपण मानतो आणि इथेच फसगत होते! ‘जनी’ म्हणजे ‘लोक’ असा अर्थ असेल तर जनीं िनद्य तें सर्व सोडूनि द्यावें। याचा अर्थ लोकांनी ज्या गोष्टीची निंदा केली आहे त्या गोष्टी करू नयेत, त्या सोडून द्याव्यात, असा साहजिक करावा लागेल. त्याचप्रमाणे जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।। या चरणाचा अर्थ लोकांना ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टींचं लोक समर्थन करतात त्या कराव्यात, असाच मानावा लागेल. आता गंमत अशी की बहुतांश लोकांना अध्यात्माचा मार्गच आवडत नाही, या मार्गाचीच तर ते निंदा करतात आणि बहुतांश लोकांना ऐहिक प्रगतीच केवळ आवडते! मग लोक निंदा करतात ते त्याज्य असेल तर अध्यात्म मार्गाचाही त्याग करायचा का? ऐहिकतेमागे लोक लागतात म्हणून त्यांची आवड धरायची का? तेव्हा ‘जनी’चा अर्थ ‘लोक’ असा नसून ‘जन’ म्हणजे ‘संतजन’, परमात्म्याचे ‘निजजन’, असा लावला की सर्व अर्थसंगति आपोआप लागते. तेव्हा संतजनांनी ज्या गोष्टींची निंदा केली आहे त्या गोष्टींचा त्याग करावा आणि संतजनांनी ज्या गोष्टींचं हिरिरीनं समर्थन केलं आहे, त्या गोष्टी आचरणात आणाव्यात. आता संतांनी कोणत्या गोष्टी त्याज्य ठरवल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आचरणीय मानल्या आहेत, हे समर्थानीच मनाचे श्लोक क्रमांक चार ते दहा या सात श्लोकांत स्पष्ट सांगितलं आहे! त्या श्लोकांच्या विवरणात त्यावरचं चिंतन आपण करूच, पण या प्रत्यक्ष कृतीच्या आचरणाबरोबरच आंतरिक धारणा काय असली पाहिजे, हे मांडणाऱ्या तिसऱ्या श्लोकाचा गूढार्थ आधी जाणून घेऊ. हा श्लोक म्हणजे..
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।। ३।।
पहाटेच्या प्रहरी रामाचं चिंतन करावं आणि वैखरीनं मग रामनाम घ्यावं, हाच श्रेष्ठ सदाचार आहे. जो असं आचरण करतो तो धन्य होतो, असा याचा साधासोपा अर्थ आपण मानतो. प्रत्यक्षात या श्लोकाचा गूढार्थ फार खोल आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

-चैतन्य प्रेम

 

-चैतन्य प्रेम