नामाच्या अभ्यासानं खरा आंतरिक पालट झाला की बाह्य़ पालटाला वेळ लागत नाही, पण अधेमधे उसळणाऱ्या माझ्याच सुप्त विरोधामुळे हा आंतरिक पालटच खूप वेळ घेत असतो. अस्तेय आणि अपरिग्रह हे दोन टप्प्पे तर मोठय़ा परीक्षेचे असतात. दुसऱ्याकडे जे आहे त्याचा लोभ न वाटणं आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधान वाटणं, हे ते टप्पे आहेत. नामाच्या प्रामाणिक अभ्यासानं ही स्थिती येऊ लागते आणि मग यमातलं जे पाचवं तत्त्व ‘ब्रह्मचर्य’ ती स्थिती साधते. ब्रह्मचर्य म्हणजे परमभावातच विचरण करणं. आता सद्गुरू हाच परब्रह्म आहे आणि सद्गुरूभावात स्थित होणं, हेच ब्रह्मचर्य आहे, ही जाणीवही नामानंच साधेल आणि खरं ब्रह्मचर्य आचरणात येईल. मग नामानं आपल्या जगण्याचं निरीक्षण-परीक्षण सुरू होतं. स्नानानं शरीर स्वच्छ करतो खरं, पण शरीरासारखंच मनही स्वच्छ व्हायला हवं, ही तळमळ वाढत जाते. त्यातून अंतर्मन स्वच्छ होणं हा ‘शौच’ नावाचा पहिला नियम साधण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होतो. आपलं मन खऱ्या अर्थानं निर्मळ नाही आणि म्हणून मनाच्या ताब्यात राहून आपण बोलू नये ते बोलतो, करू नये ते करतो आणि वागू नये तसं वागतो, हे जाणवू लागतं. मग जीवन देहबुद्धीनुसार नव्हे, तर आत्मबुद्धीच्या प्रकाशात जगू लागावं, ही इच्छा होते. त्या आत्मबुद्धीच्या प्राप्तीसाठी साधना सुरू होते. या साधनेसाठी देहाला आणि मनाला जे जे कष्ट होतील, ते ते स्वीकारण्यास मन तयार होतं. जो सदैव आत्मस्वरूपाशी एकरूप आहे, परमभावात निमग्न आहे, त्याच्याच आधारावर आत्मबुद्धी जागी होईल, ही जाणीव होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा