‘प्रारब्धाचे दिवस गोड करून घ्यावेत’, याचाच अर्थ असा की हे दिवस प्रत्यक्षात गोड नाहीत. ते गोड मानून घ्यायचे आहेत! श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात, ‘‘तुम्ही माझे म्हणवता आणि देहाच्या कष्टांनी दु:खी होता, याला काय म्हणावे!’’ थोडक्यात, साधकानं देहाच्या दु:खांनी खचून जाणं हे कोणत्याही सद्गुरूला मान्य नाही. श्रीधर स्वामींच्या ज्या पत्राचा उल्लेख केला त्यात ते पुढे जे सांगतात, ते फार महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, ‘‘नित्य निर्विकार सुशांत व शाश्वत आनंदरूपाकडे दृष्टी फिरवून प्रारब्धाचे दिवस गोड करून घ्यावेत!.. तीव्र प्रारब्ध थोडेही सुटत नाही. श्रीगुरूदेवता अनुग्रहाने आत्मशांति मात्र यात असू शकेल!’’ (श्रीधर स्वामींची शतपत्रे, पत्र ६७वे). म्हणजेच तीव्र प्रारब्धातून जे देहदु:ख किंवा देहकष्ट वाटय़ाला आलं आहे ते सुटणं सोपं नाही. मात्र श्रीसद्गुरूंच्या अनुग्रहानं जी आत्मशांति विलसू लागते त्यामुळे त्या दु:खांची जाणीव कमी होऊ लागते. जाणीवच जेव्हा कमी होते तेव्हा त्या दु:खाची तीव्रता कमी होते. माझ्याच पूर्वकर्मामुळे माझ्या वाटय़ाला देहदु:ख येतं. ते भोगणं म्हणजे एकप्रकारे कर्जफेडीसारखंच आहे. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात त्याचा आशय असा की, ‘‘कर्ज फिटताना जसा आनंद वाटतो (आता हे आजच्या काळातल्या बडय़ा उद्योजकांवरून पटणार नाही! पण असो..) तसे प्रारब्ध भोग भोगून संपवतानाही आनंदच वाटला पाहिजे.’’ आता आपल्याला वाटेल की हे ऐकायला आणि बोलायला सोपं आहे. प्रत्यक्ष रुग्णाईत झाल्यावर, अंथरूणाला खिळल्यावर असं बोलणं सहन तरी होईल का? पण असे साधकही असतात बरं का! उषाताई गुळवणी म्हणून एक ज्येष्ठ साधक होत्या. त्यांना अनेक व्याधी होत्या. पण या व्याधी माझ्या देहाला आहेत, मला नाहीत, असं त्या अगदी शांतपणे मला सांगायच्या. सद्गुरूंच्या आधारावर आंतरिक शांती ढळू न देता खडतर प्रसंगांना आणि देहदु:खांना सामोरे जाणारे असे अनेक साधक आहेतही. पण समर्थ जे सांगतात की, देहेदु:ख हें सूख मानीत जावें। विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें।। त्याचा खरा रोख काय असावा? तर देहाचं दु:ख देहाच्या माथी मारून आपण आंतरिक तोल टिकवण्याचाच अभ्यास करावा. देहदु:खानं खचून जाऊन तरी काय उपयोग आहे? त्यावर पूर्ण क्षमतेनुसार वैद्यकीय उपचार तर आपण करतोच. तरीही जे वाटय़ाला येतं ते भोगावं तर लागतंच. मग ते भोगत असताना मन सद्गुरू बोधात आणि त्यानुरूप आचरणात गुंतवण्याचा प्रयत्न का करू नये? मुळात हा देहच कायमचा नाही. तो काही काळासाठी मला मिळाला आहे. त्या देहाचा खरा उपयोग परमार्थासाठी करून घ्यायचा आहे. त्यासाठी माझं मन देहात गुंतवण्याची सवय सोडून ते मन सद्गुरू बोधात गुंतवलं पाहिजे. हा देह जर कायमचा नाही, तर त्या देहाच्या आधारावर निर्माण झालेली नातीगोती तरी कायमची कशी असतील? मग त्या नात्यांबाबत कर्तव्य तेवढं करीत राहून मन त्या नात्यागोत्यांत नव्हे तर सद्गुरू बोधात गुंतवण्याचा अभ्यास केला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे या देहाइतकीच हा देह ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थितीही कायमची नाहीच. मग ती परिस्थिती लाभाची असो की हानीची, यशाची असो की अपयशाची, सुखाची असो की दु:खाची, मानाची असो की अपमानाची.. तिच्यामुळे मनाचं हिंदकळणं थांबवायचं आहे. मग ते सुखानं हिंदकळणं असो की दु:खानं हिंदकळणं असो! तेव्हा बाह्य़ परिस्थितीनं आंतरिक तोल न ढळणं, हीच विवेकाची परिणती आहे. एकदा आंतरिक तोल कायम राहिला की मग आंतरिक स्वरूपाकडेही लक्ष जाईल. मग या घडीला अलक्ष्य असलेलं लक्ष्य होऊ लागेल. ‘विवेके सदा स्वस्वरूपी भरावे’ हे साधूही शकेल!
-चैतन्य प्रेम