प्रपंच शब्दाचा व्यापक अर्थ आपण मागेच पाहिला होता. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली माझी ओढ हाच खरा प्रपंच आहे! त्या तुलनेत घरादाराचा, मुलाबाळांचा प्रपंच फार लहान आहे. तेव्हा साधकाचं खरं ध्येय या इंद्रियगम्य प्रपंचाचा वीट येणं, हे असलं पाहिजे. प्रपंचाचा वीट येणं, याचा अर्थ प्रपंचातील कर्तव्यांचा वीट येणं नव्हे! माझं घर, माझी माणसं, माझे आप्तस्वकीय हे सारे अनंत जन्मांच्या देण्याघेण्याचे हिशेब पूर्ण करण्यासाठी ‘माझे’ म्हणून जन्मले आहेत आणि मी ‘त्यांचा’ म्हणून जन्मलो आहे! तेव्हा हिशेब अपूर्ण ठेवून व्यवहार पूर्ण होत नाही. त्यासाठी कर्तव्यांपासून मला पलायन करता येणार नाही. ती कर्तव्यं पूर्ण करीत असताना चित्त, मन, बुद्धी कुठे केंद्रित करायची, हे मात्र माझ्या हातात आहे. तेव्हा प्रपंचात विखुरलेलं मन, चित्त, बुद्धी गोळा करून ती सद्गुरूंपाशी केंद्रित करणं आणि मग समर्पित करणं हाच साधकापुरता प्रपंचाचा वीट आहे! लांब चेहऱ्यानं, रूक्षपणे, कुढत तर काही जगायचं नाही. सगळं करा, पण कशातच गुंतू नका. जीवनातल्या कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला भावनेचा आधार बनू देऊ नये. त्या वस्तू किंवा व्यक्तीशिवाय आपलं समाधान टिकणार नाही, असं वाटत असेल तर प्रपंचातली गोडी संपलेली नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा अनादर करू नका. अवमान किंवा अपमान करू नका. पण त्या वस्तू वा व्यक्तीपायी माझ्या जीवनाच्या परमध्येयाचा अनादर, अवमान किंवा अपमान तर होत नाही ना, याकडे तळमळीने लक्ष ठेवा. ही स्थिती म्हणजे प्रपंचीं वीट मानिला! आणि जेव्हा ही स्थिती येते तेव्हा मनें विषेयत्याग केला ही स्थिती आपोआपच येऊ लागते. विषयांशिवाय प्रपंच आणि प्रपंचाशिवाय विषय टिकूच शकत नाहीत. अगदी चारचौघांसारखं आनंदात जगतानासुद्धा साधकाची आंतरिक स्थिती अशी होऊ शकते आणि ही स्थिती हेच आपलं ध्येय आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, ‘‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’’ प्रपंचाचा वीट आल्यावर जे ध्यान साधतं ना ते सुंदर असतं! नाहीतर आपलं ध्यान म्हणजे प्रपंचाचंच ध्यान असतं. ज्याचा ध्यास असतो त्याचंच ध्यान होतं. प्रपंचाचाच ध्यास असेल तर ध्यानही त्याचंच सदासर्वकाळ होईल ना? तेव्हा या पुलावर शनै शनै पावलं टाकतच जावं लागेल. हा आंतरिक सेतुच आहे आणि हा सर्व त्यागही आंतरिक सूक्ष्म त्यागच आहे. त्या त्यागासाठीच साधना आहे, नित्यनेम आहे. समर्थ सांगतात, ‘‘ऐसा सूक्ष्म अंतर्त्यांग। उभयांस घडे सांग। निस्पृहास बाह्य़त्याग। विशेष आहे।।’’ हा जो सूक्ष्म आंतरिक त्याग आहे ना, तो दोघांनाही म्हणजे प्रापंचिक साधकाला आणि निस्पृह अशा, देहानंही प्रपंचातून बाहेर पडलेल्या साधकाला, सारखाच आहे. हा सूक्ष्मत्याग दोघांना एकसमान आहे, पण प्रापंचिक साधक बाह्य़त्याग करू शकत नाही. त्याला घरादाराचा, व्यवहाराचा, प्रापंचिक कर्तव्यांचा त्याग करता येणार नाही. निस्पृहाला मात्र तो त्याग विशेष आहे. आपण निस्पृह नसल्यानं विशेष त्यागाच्या चर्चेकडे वळणं टाळू! पण असं असलं तरी प्रापंचिकाकडूनही हळुहळू बाह्य़त्यागदेखील घडू लागतो! तो कसा? समर्थ सांगतात, ‘‘संसारिकां ठाईं ठाईं। बाह्य़त्याग घडे कांहीं। नित्यनेम श्रवण नाहीं। त्यागेंविण।।’’ नित्यनेम, श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण जसजसं घडू लागतं तसतसा प्रापंचिकाकडून बाह्य़त्यागही घडू लागतो! किंबहुना बाह्य़त्याग घडत नाही तोवर खरा नित्यनेम, खरं श्रवण, खरं मनन, खरं चिंतन साधतच नाही. आता हा बाह्य़त्याग नेमका कोणता? हा बाह्य़त्याग आहे आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा. हा बाह्य़त्याग आहे आसक्तीयुक्त गोष्टींसाठी नाहक वाया जात असलेल्या वेळेचा आणि क्षमतांचा!
चैतन्य प्रेम