समर्थ सांगतात, ‘‘जनीं सूखसंवाद सूखें करावा!’’ संतजनांशी तर्क आणि विकल्प लढवीत वादविवाद तर घालूच नये, पण ‘सूखें’ ‘सूखसंवाद’ही करावा! आता या दोन्हीत ‘सुख’ हा शब्द ‘सूख’ असा दीर्घ आला आहे. म्हणजे हे सुख दीर्घ टिकणारं आहे, अखंड टिकणारं आहे.. दीर्घ टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती कशी व्हावी, यासाठी सज्जनांशी जो संवाद साधायचा आहे तो साधताना साधकाची आंतरिक स्थिती कशी असली पाहिजे, याचं ‘सूखें करावा,’ हे सूचन आहे. भौतिकात काही मिळवायचं आहे, मनातली आस सुकून गेली असली पाहिजे. उलट भौतिकातलं कितीही आणि काहीही मिळालं तरी त्यातून अखंड टिकणारं सुख काही लाभत नाही, ही जाणीवही झाली असली पाहिजे. आता ही जाणीव काय अचानक किंवा एकदम निर्माण होते का? तर नाही.. आणि म्हणूनच तर आधीच्या श्लोकात सज्जनांच्या योगानं भौतिकाकडे ओढ असलेल्या मनाला त्याचे क्रियाकलाप पालटण्यास समर्थानी बजावलं आहे. (मना सर्वदा सज्जनाचेनि योगें। क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे।). म्हणजेच आता जर मनाच्या सवयी बदलण्याचा अभ्यास सुरू झाला असेल, तर खऱ्या सुखाच्या प्राप्तीचा उपाय विचारताना मनातल्या सुखाच्या भ्रामक कल्पनाही बदलल्या असल्या पाहिजेत. भौतिकाचा, जगाचा प्रभाव इतक्यात संपणार नाही, हे खरं. उलट आपल्या साधनेत, अभ्यासात हे जग वारंवार मोडता घालू लागेल. आपल्या मनात खोलवर असलेले अनेक संस्कार उफाळून येतील आणि त्या झंझावातात तग धरणं कठीणही वाटेल. पण या सर्वावर मात करण्यासाठी एकच आधार आहे तो म्हणजे संतजनांचा संग! आणि आधीच म्हटल्याप्रमाणे हा जो संग आहे तो केवळ देहावर अवलंबून नाही. खऱ्या सज्जनाचा सहवास मिळणं, कळणं आणि टिकणं हे कठीणच आहे. तेव्हा त्यांचा जो बोध आहे, त्याचा संग हा खरा संग आहे. हा खरा योग आहे. तो साधण्याचा अभ्यास सुरू असेल तर जगाचा प्रभाव संपला नसला तरी त्या जगामागे, सुखाच्या भ्रामक कल्पनांमागे वाहवत जाणं तरी कमी होऊ लागलं असेल. तेव्हा अखंड टिकणाऱ्या सुखासाठीचा संवाद साधताना, आपल्या मनातल्या सुखाच्या व्याख्या तुटल्या पाहिजेत. अमुक एक झालं तरच मी सुखी होईन, अमुक टळलं तरच मी सुखी होईन.. अशा कारणांवर अवलंबून असलेल्या सुखाच्या व्याख्या संपल्या पाहिजेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा