समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या ९७व्या श्लोकात साधकजीवनासाठीची तीन महत्त्वाची सूत्रं सांगत आहेत. साधकानं जगात वावरत असताना आणि जगातली सर्व कर्तव्यं पार पाडत असतानाच साधना कशी करायची आणि जोपासायची आहे, हे या श्लोकात नमूद आहे. मुळात खरी साधना कोणती, हेही या श्लोकात स्पष्ट होते. त्यामुळे प्रत्येक साधकानं हा श्लोक, या श्लोकातली ही त्रिसूत्री सदोदित लक्षात ठेवली पाहिजे. काय आहेत ही तीन सूत्रं? तर, ‘ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही, त्याला मुक्ती नाही’ (मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची।), ‘अहंतेनं व्यर्थ यातना वाटय़ाला येऊन भक्तजीवनाची अखेर अतिशय दैन्यवाणी होते’ (अहंतागुणें यातना ते फुकाची। पुढें अंत येईल तो दैन्यवाणा।) आणि ही परिस्थिती टाळायची असेल तर, ‘कर्तेपण भगवंताकडे देऊन कर्तव्यरत राहा आणि त्याचंच अखंड स्मरण साधा’ (म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा)! आता या तीन सूत्रांचा विचार करू. पहिलं सूत्र : ‘ज्याच्या मुखात भगवंताचं नाम नाही, त्याला मुक्ती नाही! आता हे सूत्र शब्दार्थानं घेतलं तर मोठा गोंधळ उडेल. कारण मुखात भगवंताचं नाम येत नाही, म्हणजे काय, हेच आपल्याला नेमकेपणानं उमगत नाही. विशेष गोष्ट म्हणजे, भगवंताचं नाम जो घेत नाही त्याला मुक्ती नाही, असं इथं म्हटलेलं नाही. ‘मुखीं नाम ना घेई तया मुक्ति कैंची,’ असं समर्थ विचारत नाहीत. तर ‘मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची,’ असं म्हणत आहेत. भगवंताचं नाम मुखानं ‘घेणं’ आणि भगवंताचं नाम मुखी ‘येणं’ यात मोठा फरक आहे! एकात कृती आहे, तर दुसऱ्यात सहज अकर्तेपणानं घडणं मात्र आहे! या दोन्हीतून आपल्या आंतरिक अवस्थांचं, पातळीचं दर्शन घडतं. मुखी नाम येणं म्हणजे काय? तर हे ‘मुख’ म्हणजे नुसतं तोंड नव्हे! जग ज्या ज्या मार्गानी आपल्या अंत:करणात प्रवेश करतं ती सर्व इंद्रियद्वारं ‘मुख’च आहेत. त्या सर्व इंद्रियद्वारांपाशी विषयाचं जे सहज स्मरण आणि सहज स्फुरण आहे तिथं सद्गुरू बोधाचं सहज स्मरण साधण्याचा अभ्यास करायचा आहे. हे सहज स्मरण जेव्हा साधू लागेल तेव्हाच ‘मुखी’ नाम येऊ लागल्याची स्थिती होईल. तर हे नाम म्हणजे स्वत:चं देहभान विसरणं आहे. देहभान विसरणं म्हणजे देहबुद्धीच्या सजग जाणिवेनं ‘मी’ आणि ‘माझे’ जपण्याची जी सततची धडपड सुरू आहे ती थांबणं. जोवर ही धडपड सुरू आहे, तोवर जगाचं स्मरण आहे. जगाला महत्त्व आहे. ‘मी’ आणि ‘माझे’पणा जपण्याची ओढ आहे. अशा वेळी ‘मुखी नाम’ येणारच नाही.. ‘मुखी काम’च येणार! जोवर ‘मुखी नाम’ नाही, अर्थात ‘मी’पणाचा विसर नाही तोवर मन जगात जखडूनच राहणार. ते स्वतंत्र होऊच शकत नाही. मुक्त होऊच शकत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात, मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची! पुढचं दुसरं सूत्र आहे, ‘‘अहंतागुणें यातना ते फुकाची। पुढें अंत येईल तो दैन्यवाणा’’! जोवर ‘मी’पणा हाडीमांसी कायम आहे तोवर अहंकारही कायम आहे, अहंभावातून आपल्याच विपर्यस्त, अवास्तव इच्छा महत्त्वाच्या वाटू लागतात. त्यांच्या पूर्तीसाठी जीव कासावीस होऊ लागतो. त्यातून दुराग्रह, हट्टाग्रह वाढू लागतो. आपल्या अवास्तव अपेक्षांचा भंग स्वाभाविकच असतो, पण अपेक्षाभंगाच्या यातना फार तीव्र असतात. व्यर्थ कल्पनांमध्ये अडकून आपण आपला वेळ, शक्ती व्यर्थ दवडली असते. त्यातून व्यर्थ यातनाच वाटय़ाला येतात. मात्र या टप्प्यावरही जागे झालो नाही आणि पुन्हा पुन्हा जगाच्या मागेच वाहवत जात राहिलो तर साधकजीवनाचाही दैन्यवाणा अंत ओढवतो. ही सर्व परिस्थिती टाळायची असेल, तर तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्हणजे : म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा! राणा म्हणजे राजा.. सूत्रधार.. खरा कर्ता!
चैतन्य प्रेम