सर्वात्मक, सर्वव्यापी आणि सर्वसमर्थ अशा परमात्म्यानं सद्गुरूचं जीवन व्याप्त असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनातही सर्वात्मकता, सर्वव्यापित्व आणि सर्वसामर्थ्यांची प्रचीती येत असते. हा सद्गुरू खरा मात्र पाहिजे. आज अध्यात्माच्या क्षेत्रात जो धुडगूस सुरू आहे तो पाहता असा खरा सद्गुरू मिळणं आणि ओळखता येणं कठीणच आहे म्हणा.. पण त्याला ओळखता येणं सोपं नसलं तरी त्याला ओळखण्याच्या काही खुणा मात्र आहेत. त्यातली पहिली खूण म्हणजे त्यांच्या सहवासात मन सहज स्थिर होतं आणि परमात्म्याविषयी प्रथमच क्षीण का होईना, पण प्रेमभाव मनात जागा होतो. नि:स्वार्थीपणा, निर्मोहीपणा आणि सर्वावर सहज अकारण अहेतुक आणि समान प्रेम; हा त्यांचा स्वभावच असतो. त्याचाही संस्कार आपल्या मनावर झाल्याशिवाय राहात नाही.
जर असा खरा सद्गुरू प्राप्त झाला नसेल, तर आपल्या बुद्धीनं तो शोधायचा प्रयत्न आधी करू नये. त्यात बुद्धीभ्रम होऊन फसगत होण्याचीच भीती अधिक. त्यापेक्षा होऊन गेलेले जे संतसत्पुरुष आहेत किंवा सद्गुरू रूपं आहेत त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचं चरित्र, त्यांचा बोध याचं सतत चिंतन मनन करणं हादेखील श्रेष्ठ उपाय आहे.
‘गुरूचालीसा’मध्ये म्हटलं आहे की, ‘‘प्रभु तव चरित सकल व्यवहारा॥ अतुलित रूचिर गूढ अविकारा॥’’ सद्गुरूंचं चरित्र कसं आहे? त्यांचं सर्व चरित्र, सर्व व्यवहार हा अतुलनीय आहे, रसमय आहे.. मधुर आहे, गूढ आहे, पण या जोडीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अविकारी आहे! त्यांच्या कृतीला सूक्ष्मसादेखील स्वार्थ चिकटलेला नाही.
सद्गुरू म्हणजे लोकांवर छाप पाडेल असं बोलणारा उत्तम वक्ता नव्हे.. अध्यात्म उत्तम बोलणारे, सांगणारे आणि लिहिणारे खूप जण आहेत. अध्यात्म खरं जगणारे किती जण आहेत? खरा सद्गुरू उत्तम बोलत किंवा लिहित असेलही, पण त्यापेक्षा त्याच्या जगण्यातच अध्यात्म ओतप्रोत भरून असतं आणि तीच त्याची खरी खूण असते. त्यांच्या जीवनातले प्रसंग ऐकताना आपल्या अंत:करणावर सहज संस्कार होतात. त्या संस्कारांमुळे, आपल्या मनातली जगाची आसक्ती सुटावी, जगाचा प्रभाव उरू नये, अशी इच्छा मनात चमकून जाते. तिची तीव्रता कमी-अधिक असते, पण हळूहळू ती स्थिरावू लागते. वृत्तीत सुधारणा घडताना दिसतंच असं नाही, पण वृत्ती बिघडण्याचं प्रमाण संथ गतीनं का होईना, पण खालावू लागतं. मग सद्गुरूंच्या चरित्राच्या परिशीलनाची गोडी निर्माण होते. सद्गुरूंच्या मुखातून जो काही बोध ऐकायला मिळतो त्यात तल्लीनता येते. श्रीगोंदवलेकर महाराजांकडे बाळंभट म्हणून एक पुजारी होते. रोज एक आण्याचा गांजा महाराजांनी त्यांना द्यायचा या अटीवर ते गोंदवल्यास आले होते. एकदा महाराजांनी काय केलं की नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे गांजा पाठवला नाही. त्यामुळे संतापून जाब विचारायला ते आले तर श्रीमहाराज लोकांशी सुख-दु:खाच्या गोष्टी बोलत होते. त्या ऐकताना बाळंभट तल्लीन झाले तशी त्यांच्याकडे पाहात महाराज ताडकन उठले आणि म्हणाले, ‘‘अरे बाळंभट, तुमचा गांजा आणायला माणूस पाठवायला विसरलोच की! आता मीच आणतो पहा!!’’ महाराज हाती पिशवी घेऊन निघताच बाळंभटांनी धावत जाऊन त्यांच्या पायांना मिठी घातली आणि म्हणाले, ‘‘मला यातून सोडवा महाराज.’’ बाळंभटाप्रमाणे कथेत तल्लीनता आली की मगच सद्गुरूंची खरी थोरवी जाणवून जगाच्या आसक्तीनं गांजण्याचं व्यसन आतातरी सुटावं, अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते! आणि बाळंभटाप्रमाणेच आपल्यालाही सद्गुरूच त्यातून सोडवू शकतात. – चैतन्य प्रेम