सूक्ष्म नामसाधनेनं मन सूक्ष्म होतं आणि असं सूक्ष्म मन श्रीसद्गुरूंच्या सूक्ष्म जाणिवेत सहज स्थित होतं. आता मन सूक्ष्म होणं म्हणजे काय? तर मुळात मन सूक्ष्मच असतं, मात्र स्थूल, भौतिक, दृश्य जगाशी चिकटल्यानं ते स्थूल होतं. मनाची सूक्ष्म धारणेची शक्ती ओसरते. त्यामुळे सद्गुरूंचा बोध अंत:करणात स्थिरावत नाही. उलट स्थूल, दृश्य, भौतिक जगाचा प्रभाव इतका पडतो की परमतत्त्व जाणून त्यानुसार जगण्याची मनाची शक्तीही हरपते.

श्रीसमर्थानी ‘अनुतापयुक्त प्रार्थने’त म्हटलं आहे की, ‘‘नेणतां जन्मलों आम्हीं। चुकतां दुख पावलों। फावलों बहुतां लोकां। कावलों मनिच्या मनीं।।’’ आम्ही मुळात जन्मलोच का, हे जाणत नाही. जन्मानं लाभलेला हा अनंत क्षमतांनी युक्त असा अद्भुत देह आणि तितक्याच अनंत क्षमतांनी युक्त असं हे मन मला कशासाठी लाभलं, हे जाणत नाही. का जन्मलो हेच कळत नाही त्यामुळे कसं जगावं हेही कळत नाही! मग ज्या परमप्राप्तीसाठी जन्म लाभला आहे, त्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता संकुचिताच्या हव्यासात आम्ही अडकतो. त्या संकुचितलाच व्यापक मानतो. त्या संकुचिताच्या प्राप्तीत, ते संकुचितच टिकवण्यात आणि वाढविण्यात आमचा जीव अडकतो. या चुकीमुळे भवदु:खच वाटय़ाला येतं.

‘‘चुकतां दुख पावलों!’’ लोकांकडून अक्षय सुख मिळेल, मोठा आधार मिळेल, या हेतूनं आपल्या भासणाऱ्या आणि हव्याशा वाटणाऱ्या लोकांचं मन राखण्याची धडपड सुरू होते. त्यानं लोकांचं फावतं, पण आपलं मन मात्र अपेक्षा, इच्छा, कामनांनी फोफावतं. त्यातूनही अपेक्षाभंगाचे चटके आणि आघात वाटय़ाला येतात. त्यातून मनच अस्थिर होतं.. विषण्ण होतं.

‘‘फावलों बहुतां लोकां। कावलों मनिच्या मनीं।।’’ ही स्थिती होते. त्यामुळे मुळात सूक्ष्म असलेलं, अनंत सूक्ष्म क्षमतांनी युक्त असलेलं मन अशाश्वत अस्थिर, नश्वर अशा बाह्य़ परिस्थितीत, माणसांमध्ये आणि वस्तुमात्रांमध्ये गुरफटल्यानं ते शंकाकुल, भयाकुल आणि अस्थिर होतं. अशा मनाची सूक्ष्म धारणाशक्ती जागी करायची असेल तर जो सूक्ष्म पण सर्वव्यापी अशा परमतत्त्वाशी एकरूप आहे त्याचाच आधार घ्यावा लागतो. तो आधार म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम आणि त्या नामात व्यापलेलं त्यांचं स्मरण हाच आहे! हे नाम-स्मरण साधत गेलं की जगण्याची रीत बदलेल.. अशाश्वत जगाचं खरं रूप जाणवू लागेल. या अशाश्वतातलं शाश्वत काय याची उमज वाढू लागेल. मनातली तळमळ, खळबळ ओसरू लागेल.

अपेक्षा, इच्छा ओसरू लागतील. त्यामुळे हट्टाग्रह, दुराग्रह कमी होतील. या सर्वामुळेच टिकून असलेलं आणि वाढत असलेलं भवदु:ख कमी होईल. तर जेव्हा सद्गुरूंच्या सांगण्यानुसार साधना सुरू होते आणि त्या ‘साजिरे’ साधनेला साजेसं जीवन जगू लागतो तेव्हा भवदु:खाचं मूळच नष्ट होतं. समर्थ म्हणतात, ‘‘करी मूळ निर्मूळ घेता भवाचे!’’ आपण एखादं झाड तोडलं.. त्याचं प्रत्येक पान, प्रत्येक फांदी तोडली तरी जोवर मुळापासून ते तोडत नाही तोवर ते पुन्हा-पुन्हा उगवणारच! तसंच भवाचं मूळ निर्मूळ होत नाही तोवर ‘कैवल्य साचे’ ही स्थिती लाभू शकत नाही. केवळ एका परमतत्त्वाशी एकरूपता साधत नाही. आता या प्रक्रियेची सुरुवात समर्थ पुन्हा एकवार ८९व्या श्लोकात सांगत आहेत.

त्याची सुरुवातच आहे.. जनीं भोजनीं नाम वाचे वदावें, अती आदरें गद्य घोषे म्हणावें, हरी चिंतनें अन्न जेवीत जावें! हा अत्यंत व्यापक श्लोक जेवताना काय करावं, हे सांगत नाही तर जीवनात काय करावं, हे सांगतो! त्या श्लोकाकडे आता वळू.

चैतन्य प्रेम

Story img Loader