महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत. काही बोली तर खूपच मर्यादित भौगोलिक अवकाशात बोलल्या जातात. ही माणसे आणि त्यांचे जगणे आपल्या गावीही नसते. महासत्तेच्या स्वप्नरंजनाचे विभ्रम न्याहाळण्यात आपण मश्गूल असतो , मात्र या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या समूहांच्या जगण्याकडे आपले साफ दुर्लक्ष होत असते..
भाषा हे संवादाचे माध्यम. एक पूलच जणू भाषा बांधते, जोडते सगळ्यांना. कोणताही माणूस व्यक्त होतो तो भाषेद्वारे. भाषा पुस्तकातही असते लिपीमध्ये बद्ध झालेली, पण केवळ अशी अक्षरे म्हणजे भाषा नाही. पुस्तकांच्या पानाबाहेरचे खूप मोठे जग या भाषेत सामावलेले आहे. ज्यांना अक्षरे लिहिता-वाचता येत नाहीत अशी माणसेही भाषेच्या जवळच असतात. भाषा त्यांना सांभाळते, सावरते. या माणसांच्या जगण्यापासून ती वेगळी काढता येत नाही. एखाद्या झाडाची साल जशी घट्ट बिलगलेली असते किंवा आपल्या शरीरालाच आपली त्वचा जशी गच्च लपेटलेली असते तशी ही भाषा. बऱ्याचदा आपल्याला वाटते पुस्तकातली भाषा शुद्ध, प्रमाण आणि लोकांची भाषा अशुद्ध, ग्राम्य. पण भाषेला असे सोवळेपण बहाल करता येत नाही. एखाद्या तांडय़ावर, आदिवासी वाडय़ावर, नदीच्या काठावर, घाटमाथ्यावर, जंगलात, समुद्रकिनारी, अशा सर्वच ठिकाणी भाषेचा वावर असतो. पाण्याच्या ठिकाणी माणसे वस्ती करतात तशी भाषाही वस्ती करते माणसांच्या जवळच. भाषेला जेव्हा जेव्हा मखरात बसविण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती गुदमरते. संकोच होतो तिचा. वाहत्या पाण्यासारखी भाषा या मुलखातून त्या मुलखात जाते. जिथे छापील अक्षरांचा गंधही नाही अशा ठिकाणी भाषेचे हे जिवंतपण नजरेत भरते. पुस्तकातली भाषा व्याकरण महत्त्वाचे मानते आणि ही लोकांची भाषा अंत:करण.
ही भाषा रेल्वेरुळांसारखी सरळ आणि एका रेषेत जात नाही. डांबरी सडकांप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी पोहोचवत नाही. किती तरी अपरिचित वाटा या भाषेत दडलेल्या असतात. लोकांच्या भाषेत वाहत्या झऱ्यासारखा नाद असतो आणि एखादा पहाड कोसळल्यानंतर होणारा भयंकारी आवाजही. या भाषेत जसा सर्वाना कवेत घेणारा ओलावा असतो तसा जन्माचा उभा दावा करून टाकणारा विखारही. कधी अनोळखी माणसालाही जोडणारा धागा आणि कधी जवळच्या, रक्ताच्या नात्यांच्या माणसांची ताटातूटही करते भाषा. झाडांच्या पानांची सळसळ, वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला तरीही तो जाणवेल अशी सजगता, कधी चिरेबंदी दगडाची न भेदता येणारी तटबंदी असे सगळेच काही असते या भाषेत. या भाषेला जशी चव असते तसाच गंधही. लोकांचे अंत:करण उकलणारी ही भाषा म्हणूनच सुख, दु:खात आणि कोणत्याही प्रसंगात जवळची वाटते त्यांना. एक अभिन्न असे नातेच असते लोकांचे ते ज्या भाषेतून व्यक्त होतात त्या भाषेशी.
ज्या परिसरात ही भाषा व्यवहारात असते त्या परिसरातील स्थानिक संदर्भ भाषेत असतात. जणू त्या मातीचे गुणधर्म घेऊनच ही भाषा अवतरते. ज्या समूहात ही बोली बोलली जाते त्या समूहाच्या असंख्य परंपरा, रूढी, चालिरीती, संकेत यांना घेऊनच भाषेचा संसार चाललेला असतो. भाषा भेदभाव नाही करीत किंवा आपल्या अवकाशात कोणी शिरू नये म्हणून दारेही बंद करून ठेवीत नाही. बऱ्याच गोष्टी पोटात सामावून ती वाहत असते नदीच्या पुरासारखी. वाहत्या पुरात जशा असंख्य गोष्टी असतात. किनाऱ्यावरचे आत ओढले जाते आणि प्रवाह तसाच पुढे जात राहतो तसे भाषेच्या पोटात काय काय सामावलेले असते. भाषा बारा कोसांवर बदलते असे म्हणतात, पण ती जिथे बदलते तिथे कुठली सीमारेषा असते असे नाही आणि बदलाची कोणतीच दृश्य अशी ठळक खूणही आढळत नाही. वाहत्या हवेसारखेच जणू सगळे काही. कुठे रेघ मारता येत नाही आणि भेदही करता येत नाहीत.
पुस्तकातल्या भाषेवर कारागिरी होते. या भाषेला कधी कधी सजवले जाते, पण पुस्तकाबाहेरची ही लोकजीवनाला परिचित असलेली भाषा आपले मूळ रूप कायम ठेवते. तिच्या मूळ रूपात कोणताच बदल करावा लागत नाही. या भाषेला कोणताच आकर्षक असा अंगरखा चढविण्याची गरज नसते. या भाषेत कोणताच अभिनिवेशही नसतो. पूर्णपणे  नसíगक आणि जगण्यालाच समांतर असलेली ही भाषा बरीच उघडी-वाघडी आणि ओबड-धोबड. त्यामुळे ती कधी कधी प्रमाणभाषेच्या लिपीपासून बाजूला उभी असते. श्लील-अश्लील, शिष्ट-अशिष्टतेच्या आपल्या कल्पनाही कधी कधी या भाषेला लिपीत येण्यापासून मज्जाव करतात. लिपीचा तट ओलांडता येत नाही अनेकदा लोकभाषेला. तरीही तिचे थेट आणि रांगडे स्वरूप तिला जिवंत ठेवते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत. हे वैविध्य भाषेला खरीखुरी समृद्धी बहाल करते. आज असंख्य बोली आणि वेगवेगळ्या समूहात बोलल्या जाणाऱ्या भाषांची खुमारी येऊ लागलेली आहे. छोटय़ा छोटय़ा समूहांच्या भाषेतूनही कलाकृती व्यक्त होत आहे. या भाषेला जी माणसे जवळची आहेत त्या माणसांचे जगणे जणू या भाषेतून जिवंत स्वरूपात आपल्यासमोर येत आहे.  
खूप छोटय़ा छोटय़ा समूहांच्या भाषा आहेत आपसात व्यक्त होण्याच्या. ही माणसे त्यांच्यातल्या त्यांच्यात केवळ याच भाषेत बोलतात. या भाषेनेच त्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवलेले असते. काही बोली तर खूपच मर्यादित भौगोलिक अवकाशात बोलल्या जातात. ही माणसे आणि त्यांचे जगणे आपल्या गावीही नसते. कुठल्या परिस्थितीत हे लोक जगतात आणि आजच्या व्यवस्थेने त्यांच्या अस्तित्वात पुढेच काय काय वाढवून ठेवले आहे याबद्दल जराही विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही आपल्याला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतल्या जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चालला आहे. अनेक भागांत अजूनही शिक्षणाचा गंध पोहोचला नाही. या लोकांची फसवणूक चालूच आहे. आपल्या तथाकथित लोकशाही व्यवस्थेतले कोणतेही लाभ या समूहापर्यंत अजूनही पोहोचलेले नाहीत. जगण्यासाठी, काही मूलभूत प्रश्नांसाठी या लोकांनी जर संघर्ष उभा केला तर त्यातले काहीच आपल्यापर्यंत पोहोचतही नाही. महासत्तेच्या स्वप्नरंजनाचे विभ्रम न्याहाळण्यात आपण मश्गूल असतो, मात्र या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या समूहांच्या जगण्याकडे मात्र आपले साफ दुर्लक्ष होत असते. बऱ्याचदा चिंता करतो आपण या भाषा कशा राहतील? या भाषाच नष्ट झाल्या तर मग संस्कृतीचे काय? बदलाच्या वेगवान रेटय़ाखाली त्या टिकतील काय याची चिंताही असते आपल्याला. या भाषा जी माणसे बोलतात त्यांच्याबद्दलचीच काळजी करण्याची खरे तर वेळ आली आहे. भाषा मृत्युपंथाला लागण्याचे दु:ख करण्याऐवजी या माणसांच्या जगण्याभोवतीचे आवळत जाणारे काच कमी करण्याची गरज आहे. भाषा ही व्यक्त होण्याच्या निकडीत जन्म घेते. माणसे जगली तरच ती व्यक्त होतील. त्यामुळे आधी अशी माणसे जगणे महत्त्वाचे. मग त्यांची भाषाही जगेल. शेवटी आधी माणूस महत्त्वाचा आणि नंतर भाषा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा