एका कवीच्या गद्यलेखनाचं हे पुस्तक त्याचा काळ, त्यातील माणसं, त्यांची जगण्याची धडपड आणि कला टिकवण्याची कलावंतांची तगमग यांचा आलेख काढत नैमित्तिक लिखाणाच्या मर्यादा ओलांडतं. जवळपास अर्धशतकाचा साक्षीदार ठरलेलं हे लिखाण त्या काळातच अडकून पडत नाही.
काळानं माणसाला भोगलं की माणसानं काळाला, यावर माणसाचं मोठेपण ठरत असेल तर आदिल जस्सावाला मोठेच ठरतील. हा इंग्रजी कवी मुंबई, लंडन आणि पॅरिस अशा तीन शहरांत जगला, तिथले वर्तमानकाळ आणि त्यामागचे भूतकाळ अंगावर घेत लिहीत राहिला. इतर लेखकांचं/ कवींचं/ समीक्षकांचं म्हणणं समजून घेतल्यावरही लिहिताच राहिला. कुणाबद्दल आदर, कुणाबद्दल असूया, स्पर्धा, कधी फजिती, कधी करुणेचं आपल्याला काहीच करता येत नसल्याची दुखरी जाणीव.. असे कितीतरी हल्ले काळानं इतर माणसांप्रमाणेच जस्सावाला यांच्यावरही केले. पण ते असल्या क्षणिक हल्ल्यांमुळे बंद पडले नाहीत. उलट, माणूस म्हणून आपल्या वाटय़ाच्या काळाला भोगत असताना काळाकडून मिळालेल्या प्रत्येक क्षणाची जखम ही बक्षिसी मानून तिला पुन्हा माणूसपणाच्या कक्षेत आणण्याचं काम जस्सावालांनी केलं. कसं? त्याची दीर्घ, शतखंडित गोष्ट म्हणजे हे पुस्तक. जवळपास ४७ वर्षांच्या कालखंडात ‘कवी’ जस्सावालांनी केलेल्या गद्य लिखाणाचं.
मुंबईच्या धुवाधार पावसात, दंगल सुरू झाल्याच्या रात्री जस्सावालांना काही किलोमीटर चालत घरी परतावं लागणार आहे. चिंब ओल्या दाढीवाल्या जस्सावालांना एक पावभाजीवाला, त्याच्या गाडीवर भाजी आणि पाव दिसत असतानाही सांगतो- खतम हो गया, बंद करेगा अभी. ‘दाढीमुळे मी मुस्लीम दिसतो म्हणून तो तसं म्हणाला असावा’ हे पारशी सभ्यपणानं लेखक समजून घेतो आणि पुढे जातो. शहराचे कुसंस्कार अद्याप न झालेल्या एका पोरगेल्या मुलाच्या मदतीनं खायला मिळवतो. पॅरिसमध्ये हाच लेखक दया पवारांचं आगतस्वागत करतो, तीन दिवस त्यांना पॅरिस दाखवतो. पवारांच्या प्रेमापोटी त्यांच्या हातातलं ‘बलुतं’चं फ्रेंच भाषांतर स्वत:च्या ओळखीतल्या एका फ्रेंच प्रकाशकाकडे नेतो. पवार ते परत मागतात. हे लेखकाला लागून राहतं. ज्या अर्थी एका मराठी पुस्तकाचं फ्रेंच भाषांतर तयार झालेलं असतं त्या अर्थी कोणीतरी प्रकाशक ठरलेलाच असला पाहिजे, हे साधं गणित पॅरिसकर जस्सावालांना सुचत नाही.. पण त्या तीन दिवसांची आठवण मात्र प्रेमळ अनाग्रही शब्दांतूनच चारपाच पानं भरून पाझरते. लंडनकडे अगदी तरुणपणी बोटीनं प्रवास करताना समुद्रातल्या वावटळीनं जस्सावाला शहारतो. अशक्यतांचा उद्रेक इतका प्रत्यक्षपणे समोर येऊ शकतो, याची जाणीव तो त्या सागरी वावटळीतून जपून ठेवतो. १९५० ते ६० या काळातलं लंडन ते. वंशभेद, वर्णभेद हाडीमासी खिळलेली माणसं आणि उत्तरवसाहतिक जाणिवा जाग्या झालेलीसुद्धा माणसंच! हे दोन्ही प्रकार माणसाचेच आहेत, हे जस्सावालांना कळल्याची खूण वर्णभेदाच्या त्यांनी केलेल्या वर्णनांमध्ये ताजी राहते.. पुढे पॅरिसमध्ये स्थलांतरित मोरोक्कन आणि ज्यूंविरुद्ध झालेल्या दंग्याच्या वर्णनात तीच जाणीव पाझरते. मग गवंडीकाम करणारे आणि महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी करणंसुद्धा शक्य नसणारे लोक हेदेखील ‘माणूस’च, असं मुंबईच्या कफ परेड भागात पंधराव्या मजल्यावर राहणाऱ्या जस्सावालांना वाटतं. म्हणून ते त्यांच्या अंधाऱ्या झोपडीत जाऊन बसतात, त्यांच्याशी संवाद साधतात. ‘तुम्ही जर वर्गणी काढलीत, त्यातून मोठा फंड उभा राहिला तर त्याच्या व्याजातून सुटतील आमचे खर्च’ असं एक तरुणसा केरळी वीजतंत्री जस्सावालांना सुनावतो तेव्हा मात्र त्यांना सरसरून वाटतं- अरे! क्रांतीची भाषा का नाही करत हा? मला वर्गशत्रू का नाही मानत हा? वर्ग आहेत, कप्पे आहेत, पण हे सगळं जणू स्वीकारायचंच असतं असं ठरवलेली माणसं इथं जगताहेत. त्यांची वर्णनं अन्यत्रही येतात. ती गद्य आहेत, चित्रदर्शी आहेत. पण त्यातून ‘जिवंततेतील मरण हुडकण्या’ची किंवा ‘हे जीवन कसले ही मरणांची माला’ हा घाव वर्मी वागवणारी (या दोन टोकांच्या कुठेतरी मधली) आधुनिक काळातील-अभिजात कविजाणीव जस्सावालांमध्ये किती पराकोटीची जिवंत आहे, हेच दिसत राहतं. धर्माविषयीच्या एका निबंधात तर ‘व्हेअर इज द लाइफ वी हॅव लॉस्ट इन द लिव्हिंग?’ या टी. एस. इलियट यांच्या कवितेतल्या प्रश्नाला जस्सावाला एक आत्मनिष्ठ उत्तर देऊ पाहतात.. ‘श्रद्धावंत असण्यातच जिवंतता आहे.. ही श्रद्धा धार्मिकच असते असं नव्हे.. कवितेवर, कवितेच्या शक्तीवर असलेली श्रद्धा एखाद्याचं जिवंतपण सांभाळतेच’!
एकच विचारप्रणाली, ठोस आदर्श, स्पष्ट संकल्पना अशा गद्यगुणांचा अभाव जस्सावालांच्या या विपुल गद्यलिखाणात का आहे, हे इथं कळतं.. आणि त्यानं काहीही बिघडत नाही, हेही. हेच या लिखाणाचं वेगळेपण, हेही. उदाहरणार्थ, व्यक्तिचित्रणं म्हणता येणार नाहीत; पण व्यक्तीचा अर्क बरोब्बर कळेल, असं लिखाण जस्सावालांनी अनेकदा केलं आहे. निस्सीम इझिकेल यांच्या अतिवार्धक्याचा, स्मृतिभ्रंशाचा काळच त्यांना टिपावासा वाटतो, एके काळी अथांग सांस्कृतिक ऊर्जा असलेल्या त्या निस्सीम कवीची ही अवस्था पाहायला गेलेल्या तिघांचं अवघडलेपण, त्यांचं गप्प राहणं आणि यातून वाचकाला होणारी त्यांच्या बुभुक्षितपणाचीच जाणीव, असं कानकोंडं- कसनुसं वातावरण आहे इथे. म्हणजे रूढार्थानं, व्यक्ती राहिली बाजूला; पण इझिकेल यांच्या त्या स्थितीशी वाचकाचं तादात्म्य साधण्यासाठी इलाजच नसावा दुसरा. वाचकाचं तादात्म्य व्यक्तीशी साधण्यासाठी अन्य कितीतरी घटक व्यक्तिचित्रात येऊ देणं, हा गुण पुन्हा, हिला वकील आणि डोसन वकील या दोघी जराजर्जर वृद्ध भगिनींशी झालेल्या भेटीच्या वर्णनातही येतो. ‘थ्री आर्ट्स सर्कल’ ही मुंबईतली महत्त्वाची कलासंस्था या दोघींच्या भल्यामोठय़ा बंगल्यात चालायची आणि त्या संस्थेतर्फे इब्राहीम अल्काझींनी नाटकांच्या तालमी इथं घेतल्या होत्या. या दोघींनी स्वातंत्र्यपूर्व काळ फक्त पाहिलाच नाही तर त्याच्या त्या अप्रत्यक्ष लाभार्थीही आहेत. पारशी हा समाज ब्रिटिशकाळात ‘सक्रिय- सक्षम मध्यमवर्ग’ कसा होता आणि पुढे तो कसा राहिला नाही, हे स्वत:ची आई, स्वत:चे वडील आदींच्या व्यक्तिचित्रणांतूनही जस्सावालांनी (थेट न सांगता) मांडलेलं आहेच.
कवी म्हणून जगताना पडलेले अनेक प्रश्न जस्सावालांनी गद्यातून हाताळले आहेत. विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे आणि उदर्ू कवी-लेखक अली सरदार जाफरी यांच्या पंचाहत्तऱ्या अवघ्या सहाआठ महिन्यांच्या कालखंडात साजऱ्या झाल्यानंतर जस्सावालांना प्रश्न पडतो : माझे साहित्यिक शेजारी कोण? या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते आधार घेतात गुजराती कवी सीतांशू यशश्चंद्र यांच्या मताचा. पण हे सीतांशू यांचं मत मुळात यू. आर. अनंतमूर्तीच्या निरीक्षणावर आधारीत आहे. गुजराती, मराठी, कन्नड या ‘मातृ’भाषा, तर हिंदी आणि इंग्रजी या ‘पितृ’भाषा, असं ते निरीक्षण आणि पुढे, ‘मातृभाषेत गूढगुंजन करता येतं, पण वैश्विक आशय सांगावासा वाटत नाही..’ असं सीतांशूंचं मत! जस्सावाला अर्थात विरुद्ध बाजू मांडतात, पण कवीची ‘महाकवी न होता गूढगुंजनच करण्याची’ आकांक्षा मात्र अधिक खरी आहे, हेही समजून घेतात. विलास सारंग, अरुण कोलटकर, अरविंद कृष्ण मेहरोत्रा, सलमान रश्दी, दिलीप चित्रे अशा इंग्रजीतल्या समकालीन (आणि जस्सावालांना थोडेबहुत समवयस्क) कवी-लेखकांवर ते प्रेमादरानं लिहितात आणि विक्रम सेठसारख्या ‘यशाकडून यशाकडे’ जाणाऱ्या लेखकाबद्दल वाचकालाच आत्मपरीक्षण करायला लावतात. हाच आत्मपरीक्षणाचा आरसा ‘द मेनी मर्डर्स ऑफ दत्ता सामंत’ या अगदी कमी आकाराच्या स्फुटलेखातूनही जस्सावाला दाखवू शकतात, हे विशेष. एखाद्याबद्दल असोशीनं, आकळून लिहिणं म्हणजे त्याची बाजू घेणं नव्हे, हा संस्कार जस्सावालांच्या वाचकावर सहज होत राहतो.
कुलाब्याच्या दारूच्या गुत्त्यापासून ते वांद्रय़ापर्यंतची मुंबईच मुंबई, शिवाय व्हेनिस, पॅरिस, लंडन, पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतरांगांतलं खेडं, फ्रँकफर्ट इथल्या अनुभवांतून लेखकानं काय काय घेतलं? आर्किटेक्ट होण्यासाठी लंडनमध्ये घेतलेलं शिक्षण त्याला कसं उपयोगी पडलं? ‘डेबोनेर’ या मासिकाचे संपादक, किमान सात दैनिकांत चालणाऱ्या स्तंभांचे लेखक, त्यापूर्वी काही दैनिकांत पुस्तक-परीक्षण पानांचे समन्वयक, भारतीय इंग्रजी साहित्याच्या ‘अँथॉलॉजी’चे संपादक आणि त्यानंतर ग्रंथपुरस्कारांचे परीक्षक म्हणून केलेलं काम लिखाणाशी कसं जोडलं गेलं? या प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळतातच. पण पुस्तक वाचून झाल्यावर काही काळानंही आठवतच राहते, ती ‘साहित्य मरू घातलंय’ अशा काळावर जस्सावालांनी केलेली मात, किंवा काळाला मात देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. पुस्तकाचं शीर्षक झरिना हाश्मींच्या एका चित्र-प्रदर्शनातून घेतलं आहे. अमावास्या आणि पौर्णिमा ही दोन्ही वास्तवं स्वीकारणारा मर्त्य चंद्र आणि आपापल्या कला टिकवण्यासाठी काळाबरोबर राहताना काळाची शिकार होणं नाकारलंच पाहिजे याची जाणीव झालेली माणसं, यांच्यात तसा फारसा फरक असतोच कुठे!
मॅप्स फॉर अ मॉर्टल मून : आदिल जस्सावाला यांचे
निवडक गद्यलेखन – संपा. जेरी पिंटो,
अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने : ३४०, किंमत : ४९५ रुपये.

Story img Loader