नेते आणि अभिनेते यांत तसा फारसा फरक नसतो. अभिनय दोघांनाही करायचा असतो. आभास दोघांनाही निर्माण करायचा असतो. फारतर त्यांचा पट भिन्न असतो. या साम्यामुळेच बहुधा नेते आणि अभिनेते यांना एकमेकांबद्दल खूपच ओढ असते. त्यात आकर्षणाचा भाग असतो. तशीच स्वार्थपरायणताही असते. त्यामुळेच काही नेते चित्रपटांत चमकतात. मोठा, धनश्रीमंत नेता असेल, तर तो चित्रपट वा गेलाबाजार नाटक वगैरे काढून त्या प्रांतातील चमकोगिरीची हौस भागवून घेतो. जमल्यास त्यात एखाद्या प्रसंगापुरता आपला रंगवलेला चेहरा दाखवून अभिनयाची खुमखुमीही भागवून घेतो. या अशा हौसेला मोल नसते, पण तिला नाव नक्कीच असते. चित्रपटकलेची वा रंगदेवतेची सेवा, असे तिचे नाव असते. परंतु ते सांगण्यापुरतेच, हे सगळ्यांनाच माहीत असते. तेव्हा या गोष्टी लोकही नाक मुरडून सोडून देतात. नट वा नटय़ांच्या बाबतीत मात्र तसे करता येत नसते. नट वा नटीची लोकप्रियता ही जर चित्रपट वा नाटकांमुळेच असेल, तर दुसऱ्या क्षेत्रात जाऊन ती लोकप्रियता, आपली पडद्यावरील प्रतिमा मोडून खाण्याचा त्यांना कोणताही हक्क नसतो. आपल्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा करून घेणे म्हणजे रसिकांच्या प्रेमाशी प्रतारणाच आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी. पण तसे कोण करतो? अनेकांचे पाठकणे पिचलेलेच असतात. म्हणूनच निवडणुकीचे ढोल-ताशे वाजू लागले, की अशा नट-नटय़ांची पावले राजकीय पक्षांच्या दिशेने पडू लागल्याचे दिसते. याचे ताजे उदाहरण म्हणजे स्वघोषित महागुरू सचिन पिळगावकर यांचा मनसे प्रवेश. सचिन पिळगावकर हे हल्ली चित्रवाणी कार्यक्रमांत महागुरू म्हणून जे काही करतात, ते अनेकांच्या डोक्यांत तिडीक उठवणारे असले तरी ते एक चांगले व यशस्वी अभिनेते-दिग्दर्शक आहेत. ते एक बरे गायक आणि नर्तकही आहेत. पण एवढेच. ते कार्यकर्ते, विचारवंत, सामाजिक बांधीलकीवाले आहेत, असा आरोप मात्र कोणीही करू शकणार नाही. हृदयनाथ मंगेशकर किंवा वहिनीप्रिय भावोजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर यांचे नावही या संदर्भात घेता येईल. वस्तुत: अशी अनेक नावे आहेत. नितीश भारद्वाज, अरुण गोविल, दीपिका चिखलिया, झालेच तर धर्मेद्र, रझा मुराद ते नगमा, ही त्यातील काही नामी नावे. दक्षिणेत तर त्यांचा ‘सुकाळु’च म्हणावा लागेल. त्यातील एमजीआर, जयललिता, एनटीआर अशा काहींनी तर तेथे राजकीय पक्षही चालविले. पण ती जमात आणखी वेगळी. येथे मुद्दा आहे तो नेत्यांच्या वळचणीला जाणाऱ्या नट-नटय़ांचा. एक नागरिक म्हणून कोणत्याही पक्षात जाण्याचा त्यांना अधिकार आहेच. त्यावर टीका करण्याचे कारणच नाही. पण प्रश्न असा आहे की, ते एक नागरिक म्हणून पक्षप्रवेश करतात का? तर तसे मुळीच नसते. ते नट म्हणूनच येतात आणि अखेपर्यंत नट म्हणूनच वावरतात. बांदेकर हे शिवसेनेच्या व्यासपीठांवरही भावोजी ही प्रतिमा लेवूनच असतात. हा लोकांच्या भावनांशी खेळ झाला आणि म्हणून तो टीकास्पद आहे. राजकारणाला हल्ली आभासी रूप येऊ लागले आहे. यास जबाबदार माध्यमेही असतील, परंतु वास्तवाकडून ते तद्दन मनोरंजनाकडे वळले आहेत की काय, अशी कुशंका येऊ लागली आहे. सचिन पिळगावकर यांच्यासारख्यांचा पक्षप्रवेश हा त्याच मनोरंजनाचा भाग आहे.
अभिनेत्यांची नेतागिरी
नेते आणि अभिनेते यांत तसा फारसा फरक नसतो. अभिनय दोघांनाही करायचा असतो. आभास दोघांनाही निर्माण करायचा असतो. फारतर त्यांचा पट भिन्न असतो.
First published on: 11-12-2013 at 02:58 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actors sachin pilgaonkar aadesh bandekar