अंबरीश सात्त्विक हे भारतातील अवघ्या ७० निष्णात व्हॅस्क्युलर सर्जन्सपैकी एक. मराठीभाषक असूनही जन्माने दिल्लीकर, पण शिक्षण आणि उमेदवारीचा काळ महाराष्ट्रात. वैद्यकीय व्यवसायात नैपुण्यातून येणारे समाधान आणि ‘व्यावसायिक यश’ या दोन वेगळय़ा गोष्टी असल्याचे ओळखून या सर्जनने व्यावसायिक शील पाळले आहे.. त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेत, पण त्या साहित्यिकाला शोभणाऱ्या!
व्हॅस्क्युलर सर्जरीत नैपुण्य संपादन करणाऱ्या देशातील मोजक्याच डॉक्टरांमध्ये समावेश होत असलेले डॉ. अंबरीश सात्त्विक यांनी तरुण वयातच इंग्रजी साहित्य क्षेत्रात आपल्या वेगळ्या शैलीमुळे ठसा उमटविला आहे. साहित्य आणि शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य संपादन करण्यात सतत व्यस्त असले तरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांना ‘व्यावसायिक’ यश महत्त्वाचे वाटत नाही.
७० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून उज्जनमार्गे दिल्लीत दाखल झालेले अनंत सात्त्विक हे अंबरीश यांचे आजोबा. दिल्लीतील पहिल्या पिढीतील मराठी पत्रकार. दिल्लीत इंडियन एक्स्प्रेस, हिंदूुस्थान टाइम्ससह या विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली. आजी आशा नूतन मराठी शाळेत संगीत शिकवायच्या. दिल्लीतील फाळणीच्या दिवसांचे, राजकीय उलथापालथीचे सात्त्विक दांपत्य साक्षीदार ठरले. करोलबाग आणि कॅनॉट प्लेसमध्ये राहणाऱ्या अनंत सात्त्विकांना अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून पंदारा रोडवर सरकारी निवासस्थान लाभले. तोपर्यंत मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले त्यांचे पुत्र डॉ. अनिल सात्त्विक यांचा, नागपुरातील हनुमान नगरात राहणारे डॉ. मुजुमदार यांच्या कन्या डॉ. वर्षां यांच्याशी विवाह होऊन वैद्यकीय व्यवसायात जम बसला होता. नागपुरातून एमबीबीएस केल्यानंतर डॉ. वर्षां यांनी लेडी हार्डिग्ज कॉलेजातून मायक्रोबॉयोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींवर टीका केल्यामुळे अनंत सात्त्विकांना सरकारी निवासस्थान गमवावे लागले. सात्त्विक यांच्या सुदैवाने पत्रकार म्हणून दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्कमध्ये मिळालेला भूखंड दिल्लीतील त्यांच्या अस्तित्वाचा आधार ठरला. अंबरीश यांचा जन्म त्याच कालखंडातला. १८ मे १९७६चा. सात्त्विक दांपत्याचे जनसंघाचे बडे नेते व तत्कालीन खासदार जगन्नाथराव जोशी यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. गुलमोहर पार्कमध्ये घर बांधेपर्यंत जोशी यांच्या सरकारी बंगल्यात, २७ फिरोजशाह रोड येथे सात्त्विक कुटुंबीय वास्तव्याला होते. पण जगन्नाथराव जोशी यांची खासदारकी गेल्याने त्यांना सरकारी बंगला सोडावा लागला. त्या वेळी सात्त्विकांनी गुलमोहर पार्कमधील भूखंडावर बांधलेले दोन मजली घर भाडय़ाने दिले होते. पण सात्त्विकांना घराची गरज होती, तेव्हा भाडेकरूंनी घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर अडगळीचे सामान ठेवण्यासाठी बांधलेल्या बरसातीच्या दोन खोल्यांमध्ये आजी, आजोबा, आईवडील, अंबरीश आणि त्यांची धाकटी बहीण (आता आभा आगरकर, पुण्यातील दंतरोगतज्ज्ञ ) तसेच जगन्नाथराव जोशी अशा सात जणांना दोन खोल्यांत गुजराण करण्याची वेळ आली. भाडेकऱ्यांकडून दोन मजले सोडवून घ्यायला सात्त्विकांना बरीच वर्षे लागली. ब्रिटिशांनी बांधलेल्या ल्युटेन्स दिल्लीत, पण मराठी संस्कारात अंबरीश लहानाचे मोठे झाले. बालपणी त्यांना गीत रामायण ऐकल्याशिवाय झोप येत नसे. पु. ल. देशपांडे यांच्या बहुतांश ध्वनिफिती त्यांना मुखोद्गत झाल्या होत्या. वयाच्या सातव्या वर्षांपासून ते तबला वाजवायला शिकले. घरातील मराठी वातावरणाशी भिन्न अशा दिल्लीतील नावाजलेल्या भारतीय विद्याभवन आणि मदर्स इंटरनॅशनल स्कूलमधील इंग्रजी वातावरणात शिकून अंबरीश यांनी १९९३ साली मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांची एक वर्षांने ज्युनियर असलेल्या डेहराडूनच्या रुमाशी मैत्री झाली. वाचन आणि लिखाणातील, विशेषत: ऐतिहासिक कादंबऱ्यांमधील रुची वाढली. एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी कराडमध्ये जनरल सर्जरीत एम. एस. केले. त्याच वेळी रुमा यांनी सोलापूर मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी. केले. २००२मध्ये दोघांनीही शिवाजी विद्यापीठात सुवर्णपदकासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीला परतून वर्षभरानंतर विवाह करण्याचे ठरविले. दिल्लीत नोकरी मिळणे किती कठीण आहे, याची अंबरीश आणि रुमा यांना प्रचीती आली. अंबरीशना २००३ ते २००५ पर्यंत राम मनोहर लोहियामध्ये सीनिअर रेसिडेंट आणि त्यानंतर तिथेच कन्सल्टंट (जनरल सर्जरी) म्हणून संधी मिळाली. पण जनरल सर्जरीमध्ये समाधान न मानता अंबरीश यांनी दिल्लीतील नावाजलेल्या सर गंगाराम इस्पितळात व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये डीएनबी करण्याचे उद्दिष्ट साध्य केले. तेव्हापासून ते गंगाराम हॉस्पिटलमध्ये व्हॅस्क्युलर आणि एन्डोव्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. शरीरातून हृदयाकडे अशुद्ध रक्त आणणाऱ्या वाहिन्या आणि हृदयापासून शरीराकडे शुद्ध रक्त नेणाऱ्या वाहिन्यांचे प्रवाह बाधित झाल्याने निर्माण होणाऱ्या समस्या भिन्न आहेत. त्यावर अतिशय गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य गेल्या सहा वर्षांत डॉ. अंबरीश यांनी साधले आहे. शरीरातील रक्तवाहिन्यांशी संबंधित अॅन्जिओप्लास्टी करण्यात तरबेज असलेल्या भारतातील अवघ्या ७० व्हॅस्क्युलर सर्जनमध्ये त्यांचा आज समावेश होतो. त्यांच्या मते गंगाराम रुग्णालयात भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्हॅस्क्युलर विभाग तसेच सर्वात मोठी आणि सशक्त टीम आहे. ‘आज जगात असे काहीही नाही, जे आम्ही करीत नाही,’ असा दावा अंबरीश करतात. मेंदू, यकृत, मूत्रपिंड आणि पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज उघडून शस्त्रक्रियेद्वारे त्यांना पूर्ववत करण्यासाठी लागणारे कसब त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी संपादन केले आहे. फ्रान्सच्या स्ट्रॉसबर्गमध्ये रोबोटिक व्हॅस्क्युलर सर्जरीचेही विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. लोकल अॅनेस्थेशिया देऊन मेंदूला पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी उघडून रुग्णाशी बोलता बोलता ते शस्त्रक्रिया करतात. जयदेव, एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर यांची गाणी ऐकत ते शस्त्रक्रियेशी एकाग्रचित्त होतात. शल्यचिकित्सेचे काम एखाद्या कसलेल्या कलावंताइतकेच कौशल्याचे असते, असे त्यांचे मत आहे.
आपल्या क्षेत्रात यशाचे एक एक शिखर सर करताना त्यांनी कुठलेही लक्ष्य ठेवलेले नाही. जशी आव्हाने येतील तसे त्यांना सामोरे जायचे, असे त्यांचे धोरण आहे. मिरजमधून एमबीबीएस झाल्यानंतर नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हिसव्हळ खुर्द या आदिवासी भागात अंबरीश यांना वर्षभराची इंटर्नशिप करावी लागली. तिथेच त्यांच्यातील लेखकाला चालना मिळाली. हिसव्हळला असताना ते कविता आणि कथा-कादंबऱ्या लिहायचे. नामवंत लेखक मुकुल केशवन आणि जयपूर बुक फेस्टिव्हलच्या आयोजक नमिता गोखले यांना आपले लिखाण दाखवायचे. त्यांच्या लेखनशैलीमुळे नमिता प्रभावित झाल्या. मुकुल केशवन यांनी साहित्याला वाहून घेतलेल्या ‘सिव्हिल लाइन्स’ या नियतकालिकात शशी थरूर, अमिताव घोष, खुशवंत सिंह आदी नामवंत लेखकांच्या लेखांसोबत अंबरीश यांच्या कविता प्रसिद्ध केल्या. नमिता गोखलेंनी १९९९-२००० मध्ये अंबरीश यांच्या लिखाणाविषयी पेंग्विन बुक्सचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड डेव्हिदार आणि रवी सिंह यांच्याशी चर्चा केली. पेंग्विनने अंबरीश यांच्याशी करार करण्याची इच्छा दर्शविली. पण  अंबरीश हिसव्हळमध्ये असल्याने संपर्क साधणे अवघड होते. तेव्हा मोबाइल नव्हते, नजीकचा दूरध्वनी १६ किलोमीटरवर मनमाडला होता. पण हिसव्हळ हे रेल्वेचे सिग्नलचे स्थानक होते. मनमाड रेल्वे स्थानकाचे अधीक्षक रवी सिंह यांच्या परिचयाचे होते. त्यांनी तिथून हिसव्हळच्या सिग्नलवाल्याशी संपर्क साधून अंबरीश यांच्यासाठी निरोप ठेवला. ‘दोन आठवडय़ांनी आम्ही मुंबईला येतो. तिथे भेटून पुस्तकासाठी करार करू’!
ब्रिटिशांचा पर्यायी इतिहास लिहण्यासाठी अंबरीश योग्य माध्यम शोधत होते. दिल्लीत आल्यावर अडीच वर्षे नॅशनल आर्काइव्ह्जमध्ये त्यांनी संशोधन केले. त्यातून २००७ साली ‘पेरीनियम : नेदर पार्ट्स ऑफ द एम्पायर’ या वादग्रस्त कादंबरीचा त्यातून जन्म झाला. ‘पेरीनियम’ म्हणजे शरीराचा, मांडय़ांदरम्यानचा मलमूत्र विसर्जन करणाऱ्या अवयवांचा भाग. १३ भागांची मालिका असलेल्या या पुस्तकातील प्रत्येक कथेत तत्कालीन इतिहास हा शरीराच्या त्या भागामुळे घडला, असा ‘निष्कर्ष’ काढताना अंबरीश यांनी आपल्या वैद्यकीय पाश्र्वभूमीचा आणि वैद्यकशास्त्रातील भाषेचा तिरकसपणे वापर केला आहे. अपरिचित माहितीच्या आधारे लिहिलेल्या या पुस्तकातील रॉबर्ट क्लाइव्ह ते महंमद अली जिनांपर्यंत ब्रिटिश राजचा इतिहास त्यांनी जाणीवपूर्वक १९ व्या शतकातील भाषेत उलगडून दाखविला आहे. या पुस्तकातील पात्रे खरीखुरी; पण कथानक काल्पनिक आहे. या वादग्रस्त साहित्यकृतीचे साहित्यविश्वात भरपूर कौतुकही झाले. २०१० साली तुरीन पुस्तकमेळ्यात ‘पेरीनियम’च्या इटालियन भाषांतराचे डॉ. अंबरीश यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. देशातील सर्व प्रमुख प्रकाशकांशी मैत्री असलेले अंबरीश आता हार्पर कॉलिन्ससाठी पुढच्या वर्षी दुसरे पुस्तक लिहिण्याची तयारी करीत आहेत.
त्यांचे साहित्य नेहमीचे व्यावसायिक साहित्य नाही. त्यांनी स्वत:ची वेगळी शैली विकसित केली आहे, शरीरशास्त्राच्या भाषेवर आधारित. ते दिल्लीतील विविध वृत्तपत्रे, आउटलूक, तहलका, टाइम आउटसाठी लिखाण करतात. अर्थात, हे सगळं शनिवार आणि रविवारीच. आपण कॅलेंडरमधील ‘रेड लेटर डे’ लेखक आहोत, असे ते गमतीने सांगतात. राजकारणात प्रचंड स्वारस्य असलेले अंबरीश मोबाइलद्वारे राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. सदैव वाचन करणे, ऐकणे, संपर्कात राहणे आणि पाच वर्षांचा चिरंजीव रुद्र आणि कुटुंबीयांना वेळ देणे त्यांना आवडते. महाराष्ट्रात दहा वर्षे राहिल्यामुळे अनेक खेडय़ांशी, तालुक्यांशी, जिल्ह्य़ांशी त्यांचा संपर्क आला. कोल्हापूरचे अमित गुलांडे, मुंबईतील शशांक जोशी आणि सोलापूरचे कुमार विंचुरकर असे मित्र भेटले.
वैद्यकीय क्षेत्रात सतत यशाच्या शिखराकडे वाटचाल करणारे अंबरीश यांनी साहित्यक्षेत्रात लिखाणाचा नवा आविष्कार साधण्याचा ध्यास बाळगला आहे. अंबरीश यांना ‘त्या’ अर्थाने सर्वात यशस्वी डॉक्टर व्हायचे नाही. त्यांना खूप रुग्णांनाही हाताळायचे नाही. पण आपण करू ते उपचार आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम उपचार असतील, या प्रेरणेने ते झपाटले आहेत. व्यावसायिक यशापेक्षा नैपुण्याला महत्त्व देताना व्हॅस्क्युलर सर्जरीच्या क्षेत्रात भारतात आणि जगात सर्वोत्तम ठरायचे, असा ध्यास त्यांनी बाळगला आहे. पुढे जाऊन लेखनशैलीत बदल करायचाच झाला तर तो बदल आतूनच आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. साहित्य क्षेत्रातही रूढार्थाने ‘व्यावसायिक’ यश मिळविण्यापेक्षा शैलीचे शील जपणे त्यांना महत्त्वाचे वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा